सोळाशे किलो रोट्या अन् ७५० किलो वांग्यांच्या भाजीची महापंगत, सांगलीतील घोटी खुर्दमध्ये तुकाराम बीजोत्सव उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:09 PM2024-03-28T12:09:45+5:302024-03-28T12:10:43+5:30

चार पिढ्यांची अखंड परंपरा : भाविकांनी लुटला शाकाहारी यात्रेचा आनंद

Sixteen hundred kilos of roti and 750 kilos of brinjal vegetable Mahapangat, Tukaram Beetsavam in the spirit of Ghoti Khurd in Sangli | सोळाशे किलो रोट्या अन् ७५० किलो वांग्यांच्या भाजीची महापंगत, सांगलीतील घोटी खुर्दमध्ये तुकाराम बीजोत्सव उत्साहात

सोळाशे किलो रोट्या अन् ७५० किलो वांग्यांच्या भाजीची महापंगत, सांगलीतील घोटी खुर्दमध्ये तुकाराम बीजोत्सव उत्साहात

दिलीप मोहिते

विटा : मुखी हरिनामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या निनादावर दहा ते बारा हजारांहून अधिक रोट्या तयार करीत सांगली जिल्ह्यातील घोटी खुर्द (ता. खानापूर) येथे बुधवारी तुकाराम बीजोत्सव साजरा करण्यात आला.

सुमारे एक हजार ६०० किलो पीठाच्या रोट्या अन् पाऊण टन म्हणजेच ७५० किलो वांग्यांच्या भाजीवर ताव मारत हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला. घोटी खुर्द येथील ग्रामदैवत श्री राजूबुवा यांची समाधी असलेल्या या गावात दरवर्षी तुकाराम बीजोत्सव साजरा केला जातो. तत्पूर्वी आठवडाभर अगोदर भजन-कीर्तन, प्रवचनाचा सप्ताह असतो. या सप्ताहाची सांगता होळी दिवशी केली जाते. गेल्या चार पिढ्यांपासूनची ही परंपरा घोटीकर ग्रामस्थांनी आजही जोपासली आहे. 

त्यानंतर तुकाराम बीजेदिवशी दुपारी १२ वाजता संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी झाल्यानंतर ‘वांगे-रोटी’ हा महाप्रसाद होतो. तुकाराम बीजेदिवशी सकाळी गावातील सर्व कुटुंबातील महिला एकत्रित येऊन मंदिराच्या पटांगणात तीन दगडांची चूल मांडून हरिनामाचा गजर व त्याला अभंगाची जोड देत रोट्या बनविण्यास सुरुवात करतात. दहा हजारांहून अधिक रोट्या बनविल्या जातात. प्रत्येक कुटुंबातील महिला या सोहळ्यात सहभागी होतात.

एकाद्या कुटुंबातील महिला आली नाही तर दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबातील प्रमुखाकडून दंडाची रक्कम वसूल केली जाते, हे या यात्रेतील संघटनकौशल्याचे खास वैशिष्ट्य आहे. पुरुष मंडळींना वांग्याची भाजी तयार करण्याचे, तर काही पुरुषांना पाणी भरण्याचे काम दिले जाते. ग्रामदैवत राजूबुवा मंदिराच्या परिसरात मोठ्या काहिलीत वांग्याची पातळ भाजी तयार केली जाते. पुरुष मंडळी रोट्या एकत्रित करतात. त्यानंतर भाविकांना वांगे-रोटीचा महाप्रसाद दिला जातो. हा महाप्रसाद घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी घोटी खुर्द येथे बुधवारी गर्दी केली होती.

कीर्तन-प्रवचन कार्यक्रमांचा आनंद

सध्या यात्रा म्हटले की, तमाशा, ॲार्केस्ट्रा, लावण्या, आदी मनोरंजनाच्या कार्यक्रमाची रेलचेल असते. परंतु, घोटी खुर्दला कीर्तन-प्रवचनाद्वारे यात्रा साजरी केली जाते. ही परंपरा गावकऱ्यांनी आजही कायम जोपासली आहे.

Web Title: Sixteen hundred kilos of roti and 750 kilos of brinjal vegetable Mahapangat, Tukaram Beetsavam in the spirit of Ghoti Khurd in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली