शिराळ्यात उमेदवारीचा तिढा सुटणार? राजकीय समीकरणांविषयी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:01 AM2019-01-23T00:01:02+5:302019-01-23T00:02:59+5:30

शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे

Shiray will be contesting candidacy? Discussion about political equations | शिराळ्यात उमेदवारीचा तिढा सुटणार? राजकीय समीकरणांविषयी चर्चा

शिराळ्यात उमेदवारीचा तिढा सुटणार? राजकीय समीकरणांविषयी चर्चा

Next
ठळक मुद्देमतदारसंघात उमेदवारीवरून तर्कवितर्क सुरू

अशोक पाटील ।
इस्लामपूर : शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांचीही भर पडली आहे. येथील राजकीय समीकरणे बदलत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले. आता सर्वच पक्ष सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी उभे राहतील आणि उर्वरित सव्वा वर्षासाठी देशमुख यांना विधानपरिषदेवर संधी देतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचाही तिढा सुटणार आहे.

सांगली जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम या नेत्यांनी काँग्रेस रुजवली. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी असा प्रवास करून इस्लामपूर मतदार संघाबरोबर जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम केली. पतंगराव कदम यांनीही ताकदीने काँग्रेस रुजवली. त्याचेच फलित म्हणजे आमदार मोहनराव कदम आणि आमदार विश्वजित कदम राजकीय पटलावर कार्यरत आहेत.

वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या वादाचे राजकारण आजही धुमसत आहे. याचा फायदा मोदी लाटेत भाजपला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना झाला आणि भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. सांगलीत भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून वसंतदादा घराण्याला म्हणजेच काँग्रेसला धक्का बसला. विटा-खानापूर मतदार संघातही आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण पेलून सदाशिव पाटील यांची मक्तेदारी मोडून काढली. त्यांनतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपला यशही मिळाले.

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाताहत होत असतानाच, आर. आर. पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम यांच्यासारखे खंदे आणि ज्येष्ठ नेतृत्व हरपले. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी जिल्ह्यात पोरकी झाली. या आघाडी काँग्रेसला उभारी येण्यासाठी राष्ट्रवादीतून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील, काँग्रेसमधून मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना राजकीय वारसदार ठरवताना कोणतेही अडसर निर्माण झाले नाहीत.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील तीन खंदे नेतृत्व हरपले असताना, डोंगरी भागाशी निगडित असलेल्या शिराळा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व आमदार शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला एकनिष्ठेने जपले. गेली १० वर्षे शरीर साथ देत नसतानाही डोंगरी भागाशी सततचा संपर्क आणि विकासाचा ध्यास ठेवत अखेरच्या श्वासापर्यंत शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसचा वसा जपला. त्यामुळे सर्वच पक्षांनी एकत्र येऊन सत्यजित देशमुख यांना विधानपरिषदेवर घेऊन डोंगरी भागातील नेतृत्व अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा सामान्यांतून उमटत आहे. त्यामुळे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचा तिढाही आपसूकच सुटणार आहे.

नवी राजकीय समीकरणे
सत्यजित देशमुख यांना विधानपरिषद मिळाली, तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटेल. परंतु दुसरीकडे आमदार शिवाजीराव नाईक यांना शिराळा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघात पेठनाक्यावरील महाडिक गटाचा सवतासुभा नवी राजकीय समीकरणे घडविण्याच्या इराद्याने संपर्क ठेवून आहे. त्यामुळे आमदार शिवाजीराव नाईक आणि महाडिक गटातील दुरावा कोणाच्या पथ्यावर पडणार, यावर शिराळा मतदारसंघात ऐन थंडीत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Shiray will be contesting candidacy? Discussion about political equations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.