Sewerage will be full of hundreds of villages in Sangli district | सांगली जिल्ह्यातील शंभरावर गावात सौरउर्जेने फुलणार शिवार
सांगली जिल्ह्यातील शंभरावर गावात सौरउर्जेने फुलणार शिवार

ठळक मुद्दे४0 मेगॉवॅट वीजेची निर्मिती शक्यशेतकऱ्यांना दिवसाही मिळणार वीज

शरद जाधव

सांगली : विजेच्या मागणीत वाढ होत असताना, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा, भारनियमनाचा झटका सहन करावा लागत आहे. यास समर्थ पर्याय म्हणून जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून २५ प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, त्याव्दारे ४० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्यांना दिवसा विजेची उपलब्धता होणार आहे.

विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील अडचणींमुळे भारनियमनाचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर उद्योगांनाही कमी विजेमुळे त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासन स्तरावरून अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सौरऊर्जेचा पर्याय समोर आला आहे.

राज्यात ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषीसाठी ३० टक्के विजेचा वापर होतो. शेतकऱ्यांना वीज देण्याबरोबरच माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे अनुदानही दिले जाते. शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता करून देण्यासाठी गेल्या वर्षापासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. याच योजनेनुसार जिल्ह्यात २५ ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या ३६ मेगावॅट वीज निर्माण होईल इतकी जागा उपलब्ध झाली असून, अजून ४ मेगावॅटसाठीचे नियोजन होणार आहे.

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी प्राधान्य दिले असून, विविध ठिकाणी प्रकल्पाच्या उभारणीसाठी जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील २४६ हेक्टरवर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीपीपी म्हणजेच जनतेच्या सहभागातून प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी विकासकाच्या नेमणुकीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्यांनाही शासनाकडून सोयी-सवलती मिळणार आहेत.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत : मिळणार अखंडीत वीज

सध्या शेतीसाठी वीज देताना ती रात्री दिली जाते, तर दिवसभर कमी दाबाने वीजपुरवठा असतो. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतीबरोबरच पाणी योजनांसाठीही सौर ऊर्जेचा वापर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

सध्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होत असल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याने यातून त्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज दिल्यानंतर शिल्लक वीज उद्योगांना पुरविण्यात येणार असल्याने त्यांचीही विजेची मागणी काहीअंशी पूर्ण होणार आहे.
 

सौर ऊर्जा निर्मितीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. पूर्वभागात तर यासाठीचे सर्वोत्कृष्ट स्थान असल्याने प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी २१० एकरहून अधिक जागा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांची विजेची मागणी लक्षात घेऊन प्रकल्पाची उभारणी करणार असल्याने त्यांना फायदा होणार आहे.
-विजयकुमार काळम-पाटील,
जिल्हाधिकारी


Web Title: Sewerage will be full of hundreds of villages in Sangli district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.