एसटी बचावच्या लढ्यात सहभागी होऊ : संग्रामसिंह देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:13 AM2018-12-20T00:13:22+5:302018-12-20T00:14:29+5:30

साथी बिराज साळुंखे यांनी कायम अन्यायाविरोधात संघर्ष केला. गरिबांची एसटी वाचविण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. याच चळवळीचा भाग म्हणून एसटी वाचविण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून एसटी

 Sangram Singh Deshmukh will participate in the fight against ST defenses | एसटी बचावच्या लढ्यात सहभागी होऊ : संग्रामसिंह देशमुख

एसटी बचावच्या लढ्यात सहभागी होऊ : संग्रामसिंह देशमुख

Next
ठळक मुद्दे‘साथी बिराज साळुंखे’ सभागृहाचा नामकरण सोहळा

सांगली : साथी बिराज साळुंखे यांनी कायम अन्यायाविरोधात संघर्ष केला. गरिबांची एसटी वाचविण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. याच चळवळीचा भाग म्हणून एसटी वाचविण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून एसटी कामगारांबरोबर रस्त्यावरील लढाई लढण्यास तयार आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी एसटी कामगारांना दिली.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने सांगलीत बांधलेल्या कामगार भवनमधील सभागृहाचे ‘साथी बिराज साळुंखे सभागृह’ असे नामकरण बुधवारी करण्यात आले. यावेळी आयोजित एसटी कामगार मेळाव्यात देशमुख बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार शरद पाटील, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, विभागीय सचिव विलास यादव, बिराज साळुंखे यांच्या पत्नी उर्मिला साळुंखे आणि दोन कन्याही उपस्थित होत्या.

देशमुख पुढे म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये एसटीचे फार मोठे योगदान आहे. सावित्रीच्या लेकी शिकल्या, त्याही एसटीमुळेच हे आपणास विसरुन चालणार नाही. बिराज साळुंखे यांनी एसटी वाचविण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढा दिला. या एसटीचे भविष्यातही खासगीकरण होऊ नये, यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जातील. प्रसंगी एसटीचे खासगीकरण रोखण्यासाठी मी पक्ष बाजूला ठेवून कामगारांबरोबर रस्त्यावर उतरेन.

शरद पाटील म्हणाले, एसटीवर खासगीकरणाचे संकट घिरट्या घालत आहे. आपला शत्रू प्रबळ असला तरी, कामगारांनी संघटितपणे लढा दिल्यास यश निश्चितच आपले आहे यात शंका नाही. एसटीचे सार्वत्रिकीकरण हे जनतेसाठी आहे, हे सर्वांनीच ध्यानात घेणे गरजेचे आहे. कामगारांनी संघटित लढा दिल्यास खासगीकरण रद्द झाल्याशिवाय राहणार नाही.

अ‍ॅड्. शिंदे म्हणाले, एसटीचे खासगीकरण करण्याचा शासनाचा डाव आहे. सामान्य जनतेने देखील कामगारांनी पुकारलेल्या लढ्यात सहभागी होणे गरजेचे आहे.यावेळी संघटनेचे एम. बी. पठाण, अशोक खोत, कॉ. विकास मगदूम, डी. पी. बनसोडे, शमू मुल्ला, सतीश मेटकरी, शकील शेख आदी उपस्थित होते. एसटी बँकेचे संचालक नारायण सूर्यवंशी यांनी स्वागत केले. एसटी कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष विलास यादव यांनी प्रास्ताविक केले.

संघटनेची शक्ती कमी करण्याचा उद्योग : ताटे
एसटी महामंडळामध्ये राज्यात एक लाख कर्मचाऱ्यांची संख्या असून त्यापैकी ७० हजार कर्मचारी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत. एवढ्या मोठ्या संघटनेची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडून चालू आहे. पण, आमची कर्मचारी संघटना कर्मचाºयांच्या हितासाठीच जन्माला आली असल्यामुळे संघटना कधीच संपणार नाही, असे हनुमंत ताटे म्हणाले. राज्यातील एसटीचे कधीही खासगीकरण होऊ देणार नाही, यासाठी आमचा लढा चालूच राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Sangram Singh Deshmukh will participate in the fight against ST defenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.