सांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:39 PM2018-10-15T18:39:58+5:302018-10-15T18:42:56+5:30

स्त्री ही जशी प्रेमळ, वात्सल्याची मूर्ती, सहनशील असते, तसेच कणखर बाण्याची, वेळप्रसंगी कर्तव्यकठोर, भावनांना मुरड घालून सोशिकतेचा परमोच्च बिंदू गाठून , त्यागाची परिसीमा गाठणारी, अतुलनीय शौर्यालाही सहजतेने लीलया गाठणारी असते. नेमकी याचीच प्रचिती देत सांगली येथील ख्यातनाम दिवंगत उद्योजक गणपतराव आरवाडे यांची नात म्हणून मेघना कोरे यांनी शिक्षण व उद्योग जगतात कर्तृत्वाचा ठसा उमटविताना विचारांचा वारसाही जपला आहे.

Sangli's Meghna Kore's passion for innovation ... | सांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा...

सांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा...

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा...शिक्षण व उद्योग जगतात कर्तृत्वाचा ठसा

स्त्री ही जशी प्रेमळ, वात्सल्याची मूर्ती, सहनशील असते, तसेच कणखर बाण्याची, वेळप्रसंगी कर्तव्यकठोर, भावनांना मुरड घालून सोशिकतेचा परमोच्च बिंदू गाठून , त्यागाची परिसीमा गाठणारी, अतुलनीय शौर्यालाही सहजतेने लीलया गाठणारी असते. नेमकी याचीच प्रचिती देत सांगली येथील ख्यातनाम दिवंगत उद्योजक गणपतराव आरवाडे यांची नात म्हणून मेघना कोरे यांनी शिक्षण व उद्योग जगतात कर्तृत्वाचा ठसा उमटविताना विचारांचा वारसाही जपला आहे.

सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यवसाय अशा विविधांगी क्षेत्रांच्या बीजारोपणातून तयार झालेल्या कुटुंबात मेघना कोरे यांचा जन्म झाला. आजोबा गणपतराव आरवाडे हे मोठे उद्योजक आणि दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळण्याचे, त्यांच्या विचारांच्या छायेत रमण्याचे आणि थोरामोठ्यांच्या सहवासात दरवळणाऱ्या घरातील वैचारिक सुगंधाचा अनुभव घेण्याचे भाग्य त्यांना लाभले.

त्यांच्या आजोबांनी ६० च्या दशकात महावीर आॅईल मिल सुरू केली. महावीर ब्रँडच्या खाद्यतेलाला केवळ महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटकातही मोठी मागणी होती. त्याच काळात त्यांनी हळद पावडरीचा कारखानाही सुरू केला. वडील श्रीकांत यांनी आजोबांचा व्याप सांभाळला. वयाच्या १८ व्या वर्षीच गणपतराव आरवाडे यांचा सहवास सुटला.

आजोबा गेल्यानंतर वडील व मेघनातार्इंच्या मोठ्या भावाने हा व्यवसाय उत्तमरित्या चालविला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्याचवर्षी भावाचे हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली निधन झाले. त्यामुळे वडील श्रीकांत खचले. त्यांनी हळद कारखाना, आॅईल मिलची जबाबदारी मेघनातार्इंवर सोपविली.

लहानपणीच मिळालेले बाळकडू घेऊन मेघना यांचा प्रवास सुरू झाला. कितीही श्रीमंती लाभली तरी, पाय जमिनीवर ठेवून जगायचे, हा मूलमंत्र त्यांनी जपला आणि यशाची अनेक शिखरे सर करीत त्या पुढे गेल्या.

मेघना यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीच्या इम्यॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण ग. रा. पुरोहित कन्या शाळेत झाले. त्यानंतर विलिंग्डन महाविद्यालयात बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण करून त्या मुंबईला गेल्या. तेथे त्यांनी एम.बी.ए. पूर्ण केले. शिक्षणाचे अनेक महत्त्वाचे टप्पे त्यांनी पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय  व्यापार या विषयाचेही त्यांनी शिक्षण घेतले आहे. कधी विज्ञान, कधी वाणिज्य, तर कधी कलेच्या शाखांना स्पर्श करीत त्यांनी शिक्षणातही अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे.

पहिल्यांदा हळद कारखान्यात अत्याधुनिक यंत्रणा बसवली. त्याकाळी हळद कारखाने कामगारांचे संप व मंदीच्या विळख्यात अडकले होते. पण उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर मेघनातार्इंनी कामगारांचा प्रश्न सोडविला. आता सांगलीची हळद दुबईच्या बाजारपेठेत दिमाखात वावरते. त्यामागे मेघनातार्इंचे परिश्रम कारणीभूत आहेत.

मेघनाताई व्यवसाय वाढविण्यात मग्न असतानाच, त्यांचे पती राजीव कोरे यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या बांधकाम व्यवसायाचीही जबाबदारी मेघनातार्इंवर पडली. पण ही जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली.

आज सांगली, मुंबई या दोन्ही ठिकाणचा व्यवसाय त्या समर्थपणे सांभाळत आहेत. सर्व व्यवसाय आॅनलाईनशी जोडले आहेत. एक महिला म्हणून बांधकाम क्षेत्रात काम करताना त्यांनी, त्यांच्या आयुष्याची इमारत ज्या सामाजिक आणि वैचारिक पायावर उभी आहे, त्याचा कधीही विसर पडू दिला नाही. हाच पाया त्यांना यशाची शिखरे चढताना फायद्याचा ठरला.

मेघनातार्इंनी वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्धार केला. पण त्या काळी खासगीकरणातून हा प्रकल्प उभारण्याची सरकारदरबारी तरतूदच नव्हती. त्यासाठी त्यांनी अनेकदा मंत्रालयाच्या चकरा मारल्या. शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यातून सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी या सेंटरची उभारणी केली.

अनेक उद्योगांची उभारणी

सांगलीच्या उद्योग व शिक्षण क्षेत्रातील अध्वर्यू गणपतराव आरवाडे यांची नात व उद्योजक श्रीकांत आरवाडे यांची कन्या मेघनातार्इंनी उद्योगाचा डोलारा केवळ सांभाळलाच नाही, तर कालानुरुप त्यात बदल करून तो वाढविला. एमआरके ग्रुपअंतर्गत दौलत इंडस्ट्रिजमधून मेघनाताई हळद देश-विदेशात एक्स्पोर्ट करतात.

 

महावीर ब्रँडच्या खाद्यतेलाचा कारखाना आहे. सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रोजेक्ट, कृपा कंटेनर्सअंतर्गत बॅरेल बनविण्याचा कारखाना, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स अशा अनेक उद्योगांची त्यांनी उभारणी केली. सांगलीतील आरवाडे हायस्कूल, यंगमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे.
शीतल पाटील,
सांगली

Web Title: Sangli's Meghna Kore's passion for innovation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.