सांगली जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत चुरसीच्या सामन्यात जयमातृभूमीची इस्लामपूरवर मात

By घनशाम नवाथे | Published: February 6, 2024 05:46 PM2024-02-06T17:46:42+5:302024-02-06T17:47:25+5:30

महिलात 'शिवाजी वाळवा' विजेते

Sangli District Championship Kabaddi Tournament Jaimatrbhumi beat Islampur | सांगली जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत चुरसीच्या सामन्यात जयमातृभूमीची इस्लामपूरवर मात

सांगली जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत चुरसीच्या सामन्यात जयमातृभूमीची इस्लामपूरवर मात

सांगली : येथील कृष्णाकाठावर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात डोळ्याचे पारणे फेडणारा थरार सांगलीच्या जयमातृभूमी आणि इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या लढतीत पहायला मिळाला. अवघ्या तीन गुणांनी जयमातृभूमीने विजय मिळवत चषकावर नाव कोरले. न्यू उत्कर्ष क्रीडा मंडळ व महापालिका कबड्डी खेळाडूंच्यावतीने आयोजित 71 वी जिल्हा कबड्डी स्पर्धा स्वामी समर्थ घाटावर झाली.

स्पर्धेचा अंतिम सामना सांगलीचा जयमातृभूमी विरुध्द इस्लामपूर व्यायाम मंडळ यांच्यात झाला. दोन्ही तुल्यबळ संघामध्ये चढाई आणि पकडीची चुरस पहायला मिळाली. तसेच बोनससाठीही चढाओढ दिसून आली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना 28-28 असा गुणफलक समान होता. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. एकेक गुणासाठी खेळाडू कौशल्य पणाला लावत होते. जयमातृभूमीने अखेरच्या क्षणी पकडी करत 33-29 अशा चार गुणांनी विजय मिळवत शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

तत्पूर्वी सोमवारी महिलांचा अंतिम सामना शिवाजी वाळवा विरुद्ध प्रोग्रेस आरग यांच्यात झाला. या चुरसीच्या सामन्यात शिवाजी वाळवा संघाने 30-26 असा चार गुणांनी आरग संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीतजय मातृभूमी सांगलीने युवक मराठा सांगलीवाडीचा 26 गुणांनी पराभव केला. जयंत स्पोर्टस इस्लामपूरने स्वराज्य तासगावचा 14 गुणांनी पराभव केला. शिवाजी वाळवा संघाने महालक्ष्मी कुपवाडचा 5 गुणांनी पराभव केला. इस्लामपूर व्यायाम मंडळाने पटेल चौक मंडळाचा 33 गुणांनी पराभव केला.

उपांत्य फेरीत इस्लामपूर व्यायाम मंडळाने शिवाजी वाळवा संघाचा 40-16 असा 24 गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. 

अंतिम सामन्यासाठी राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, जिल्हा बॅंक उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी नगरसेविका आशा पाटील, संयोजन समिती अध्यक्ष नितीन शिंदे, प्रशिक्षक पोपट पाटील, जयवंत पाटील, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.

चुरसीच्या सामन्यात वाद

दुसर्‍या उपांत्य सामन्यात जयंत स्पोर्टस विरुध्द जयमातृभूमी यांच्यातील चुरसीच्या सामन्यात पंचाचा निर्णय अमान्य करत जयंत स्पोर्टसने सामना सोडून दिला. 25-21 असा चार गुणांनी जयमातृभूमी संघ विजयी झाला.

Web Title: Sangli District Championship Kabaddi Tournament Jaimatrbhumi beat Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली