सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरून संचालकांचे राजीनामा नाट्य

By अशोक डोंबाळे | Published: March 29, 2024 06:26 PM2024-03-29T18:26:35+5:302024-03-29T18:26:47+5:30

राजकीय संघर्ष पेटणार की जयंत पाटील समझोता घडविणार

Resignation drama of director over investigation of Sangli District Bank | सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरून संचालकांचे राजीनामा नाट्य

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरून संचालकांचे राजीनामा नाट्य

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील संचालक मंडळाच्या काळात कलम ८३ अंतर्गत चौकशी समितीचा अहवाल सहकार विभागाकडे सादर झाला आहे. यापुढे आता कलम ८८ अंतर्गत चौकशी होऊन दोषींवर रक्कम निश्चिती व फौजदारी गुन्हे दाखल होऊन वसुली लागण्याची शक्यता आहे. या चौकशीवरून बँकेच्या संचालकांमध्ये राजीनामा नाट्य रंगले आहे. बँकेतील संचालकांतील वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लक्ष घालून समझोता घडविणार का? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

विद्यमान सरकारने स्थगिती उठवून चौकशी करण्याचे आदेश दिले. सदरचा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला. अहवालात बांधकाम, एटीएम मशीन व नोटा मोजणी मशीन खरेदी, फर्निचर यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत. या कामावर चार कोटी ४० लाख ९० हजार ७५४ रुपये खर्च करणे बँकेसाठी निश्चितच योग्य नाही. बँकेच्या निधीची सरळसरळ उधळपट्टी असल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आले आहेत.

केन ॲग्रो, वसंतदादा, महाकाली व स्वप्नपूर्ती साखर कारखान्याचा कर्जपुरवठा, २१ तांत्रिक पदांची भरती, ४०० कनिष्ठ लिपिक पदाची भरती, यशवंत कारखाना विक्री व्यवहार, डिव्हाइन फूडला दिलेले कर्ज, सरफेसी ॲक्टप्रमाणे सहा सहकारी संस्थांचा खरेदी व्यवहार, बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्री, खानापूर तालुका सूतगिरणी विस्तारीकरण, गोपूज साखर कारखान्यास कर्जवाटप, एका संचालकाच्या पेट्रोलपंपास दिलेले कर्ज यासह तक्रारीत करण्यात आलेल्या अन्य मुद्यांची चौकशी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली आहे.

यात सर्वच प्रकारणात मोठ्या प्रमाणात अनियमितता, नियमबाह्य-कमी तारण कर्जवाटप, चुकीची प्रक्रिया आदी दोष आढळले. या चौकशीचा अहवाल ५ मार्च २०२४ रोजी विभागीय सहनिबंधकांकडे सादर झाला आहे. जिल्हा बँकेची चौकशी सुरू असतानाच एका संचालकाच्या राजीनामा नाट्याची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र रंगली आहे. या संचालकाची काही नेत्यांनी समजूत काढून वादावर पडदा पडल्याचीही चर्चा आहे. तसेच बँकेतील दोन आजी-माजी पदाधिकाऱ्यांतील संघर्ष मिटविण्यात जयंत पाटील मध्यस्ती करणार की नाही, अशीही चर्चा सुरू आहे.

कुणीही राजीनामा दिलेला नाही : मानसिंगराव नाईक

जिल्हा बँकेत व्यवस्थित कारभार सुरू आहे. बँकेत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार सुरू आहे. यामुळे शासनाकडून होणाऱ्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास बँकेचे प्रशासन आणि संचालक तयार आहेत. बँकेच्या एकाही संचालकाने राजीनामा दिला नाही आणि त्याची माझ्यापर्यंत कोणतीही तक्रारीही आली नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

संचालकाने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा

जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्यासह बँकेच्या विस्तरासाठीचा खर्च सर्व संचालकांच्या सहमतीने कायदेशीर मार्गानेच केला आहे. कुठेही खर्चामध्ये अनियमितता नाही; पण बँकेचे काही अधिकारी जाणीवपूर्वक माझ्याविरोधात भूमिका घेत आहेत. म्हणूनच ‘त्या’ संचालकाने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा गुरुवारी सभासद व संचालकांमध्ये रंगली होती.

Web Title: Resignation drama of director over investigation of Sangli District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.