Police force in Sangli district! The police chief's meeting today | सांगली जिल्ह्यातील पोलिस गॅसवर! पोलिस प्रमुखांची आज बैठक

ठळक मुद्देवाढत्या गुन्हेगारीवर अधिकाºयांशी होणार चर्चा नागरिकांमध्ये पोलिसांच्या कामाबद्दल प्रचंड नाराजी

सांगली : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे व प्रलंबित गुन्ह्यांचा छडा का लागत नाही, याचा आढावा घेण्यासाठी नूतन जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पोलिस अधिकाºयांची बैठक आयोजित केली आहे. शर्मा यांची ही पहिलीच बैठक असल्याने पोलिस अधिकारी गॅसवर आहेत. ते नवीन काय आदेश देतात, याकडे सर्व पोलिस अधिकाºयांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या दोन महिन्यात शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे. खून, खुनाचा प्रयत्न, वाटमारी, मारामारी हे गुन्हे दररोज घडू लागले आहेत. ‘धूम’ टोळीचा अजूनही शहरात धुमाकूळ सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी भरवस्तीत कर सल्लागार सुहास देशपांडे यांच्या बंगल्यावर दरोडा पडला. ज्यादिवशी सुहेल शर्मा यांनी नूतन पोलिसप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली, त्याचदिवशी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाटमारीतून एकाचा खून झाल्याचे उघडकीस आले होते.

दोन दिवसांपूर्वी शहर ठाण्याच्या हद्दीत २४ तासात गुंड छोट्या बाबर टोळीने चौघांवर खुनीहल्ला केला. मंगळवारी रात्री बुधगाव-कुपवाड रस्त्यावर एकाला भोसकून लुटण्यात आले. घरासमोर लावलेल्या दुचाकी लंपास केल्या जात आहेत. आठवडा बाजारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मुख्य बसस्थानकावर प्रवासी महिलांना टार्गेट करून त्यांचे दागिने लंपास केले जात आहेत. सर्वसामान्यांना सुरक्षेची भावना वाटत नसल्याचे सध्याचे शहरातील चित्र आहे.

नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन, गुन्हेगारांची धरपकड, गुन्हेगारांची तपासणी हे काम पूर्ण बंद आहे. पोलिस कुठेही रस्त्यावर दिसत नाहीत. याचा गुन्हेगारांनी फायदा उठविला आहे. शहरात दररोज कुठे ना कुठे घरफोडी, चेनस्नॅचिंग, वाटमारी किंवा दुचाकी चोरीचे गुन्हे घडत आहेत. केवळ घडलेला गुन्हा दाखल करण्याशिवाय पोलिसांचे काहीच काम दिसत नाही. सुहेल शर्मा यांनी पोलिसप्रमुख पदाची सूत्रे घेऊन शुक्रवारी पंधरा दिवस होत आहेत. यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील चित्र पाहिले आहे. वाढती गुन्हेगारी समाजाच्याद्दष्टीने घातक असल्याचे दिसत असल्याने त्यांनी गुरुवारी पोलिस अधिकाºयांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत गुन्हेगारीचा आढावा, प्रलंबित गुन्ह्यांना छडा लावणे याविषयी चर्चा होणार आहे. तसेच शर्मा नवीन काय आदेश देतात? अधिकाºयांचे खांदेपालट करतील काय? या भीतीने अधिकारी गॅसवर आहेत.

सुहेल शर्मा यांच्या भूमिकेकडे लक्ष
सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखा कागदावरच आहेत. प्रत्यक्षात त्यांची कोणतीही ठोस कामगिरी नाही. खबºयांचे ‘नेटवर्क’ नसल्याचे नवीन गुन्हेगारांची माहिती मिळत नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागही निष्क्रिय झाला आहे. वर्षभरात केवळ एकच घरफोडी उघडकीस आणण्यात एलसीबीला यश आल्याची कबुली खुद्द पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली होती. पोलिस अधिकारीही नवीन असल्याने वाढत्या गुन्हेगारीबद्दल तेही काहीच बोलण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कामाबद्दल प्रचंड नाराजी आहे. यावर सुहेल शर्मा गुरुवारच्या बैठकीत कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.