व्यावसायिकावर पैलवानांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:17 AM2017-09-18T01:17:17+5:302017-09-18T01:17:17+5:30

Palanwan attack on the businessman | व्यावसायिकावर पैलवानांचा हल्ला

व्यावसायिकावर पैलवानांचा हल्ला

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : दुकानगाळ्याचा ताबा घेण्यावरून सांगलीतील पैलवानांनी कुपवाडमध्ये दहशत माजवून हणमंत तुकाराम सरगर (वय ३०, रा. खारे मळा, कुपवाड) यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी पाच लाखांची खंडणीची मागणी करून दमदाटी व मारहाण करून फिर्यादीकडील रोख पस्तीस हजार, मोबाईलसह एकूण ३८ हजारांचा मुद्देमाल पळवून नेला. याप्रकरणी संशयित दीपकसिंग स्वामिनाथन सिंग (वय २३, फौजदार गल्ली, सांगली) याच्यासह चौघाजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. इतर सहा पैलवान फरार झाले आहेत. अटक केलेल्या पैलवानांवर कुपवाड पोलिसांकडून दरोडा, खंडणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून अटक केलेल्या इतर संशयितांमध्ये शिवाजी ऊर्फ शिवा लक्ष्मण इंडी (२०), सचिन बाबा करचे (२२, रा. दोघेही फौजदार गल्ली, सांगली) आणि रोहित बंडू कटारे (२३, रा. गणेशनगर) यांचा समावेश आहे. त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कुपवाड पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे; तर इतर सहा हल्लेखोर पैलवान फरार झाले आहेत. तसेच ज्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला ते बामणोलीचे उपसरपंच अंकुश मारुती चव्हाण, दत्ता पवार आणि शहाजी पाटील (दोघेही रा. सांगलीवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. कुपवाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका गर्ल्स हायस्कूलसमोरील दुकानगाळ्याच्या ताब्यावरून हणमंत सरगर आणि बामणोलीचे उपसरपंच अंकुश चव्हाण यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. हा वाद न्यायालयात सुरू असतानाच गणेशोत्सवादरम्यान सांगलीतील दत्ता पवार यांना चव्हाण यांनी दुकानगाळ्याचा ताबा दिला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर बरेच दिवस वाद सुरूच
होता. तसेच मिटवामिटवीचे प्रयत्नही झाले होते. त्यानंतर रविवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संशयित दीपकसिंग स्वामिनाथन सिंग याच्यासह इतर नऊ हल्लेखोर पैलवान सरगर यांच्या दुकानगाळ्यात घुसले. त्यानंतर सिंगसह इतर पैलवानांनी, दुकानगाळा खाली कर, नाही तर पाच लाख रुपये दे, अशी मागणी फिर्यादीस केली. त्यानंतर त्यांनी दुकानातील साहित्य दुकानाबाहेर फेकून देऊन नुकसान केले. यावेळी त्यांनी सरगर यांच्या खिशातील रोख पस्तीस हजार आणि इतर साहित्यासह एकूण अडतीस हजारांचा मुद्देमाल पळविला. हल्लेखोर हल्ला केल्यानंतर कार (क्र. एमएच १०, बी. यू. ९१०२)सह एक वडापची गाडी आणि मोटारसायकलवरून पळून गेले. पोलिसांना ही माहिती समजताच त्यांनी पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक अशोक कदम यांना ही माहिती दिली. उपअधीक्षक पाटील आणि निरीक्षक कदम यांच्या नेतृत्वाखालील फौजफाटा घटनास्थळी हजर झाला. त्यादरम्यान, सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयित दीपक सिंगसह चौघांना अटक केली. त्यानंतर त्यांनी चौघांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. कुपवाड पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.
हा हल्ला अंकुश चव्हाण, दत्ता पवार आणि शहाजी पाटील यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचे कुपवाड पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावरही कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या संशयितांवर कुपवाड पोलिसांनी दरोडा, खंडणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा नोंद झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक अशोक कदम तपास करीत आहेत.
दादागिरी मोडीत काढणार - धीरज पाटील
शहरात दिवसाढवळ्या दहशत माजविण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गुंडांची दादागिरी आणि दहशत मोडीत काढली जाईल. यापूर्वी गुंड म्हमद्या नदाफसह इतर गुंडांची दहशत पोलिसांनी संपविली होती. त्याप्रमाणे यांचीही दहशत मोडीत काढू. शहरात इतर कोणी अशाप्रकारचे गुन्हे करीत असतील, तर नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन मिरजेचे पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी केले आहे.
संशयित आरोपींना पोलिसांनी
घटनास्थळी फिरविले...
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दीपक सिंगसह चौघाजणांना अटक केली. त्यानंतर त्यांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संशयितांना घटनास्थळांची माहिती घेण्यासाठी दुकानगाळ्यासमोरून फिरविले. संशयितांनी यावेळी पोलिसांना सविस्तर घटनाक्रम सांगितला. याठिकाणी बघ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

Web Title: Palanwan attack on the businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.