सांगली-पेठ रस्ता आता प्राधिकरणाकडे जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:54 PM2017-10-25T23:54:49+5:302017-10-25T23:59:22+5:30

Now go to the authority of Sangli-Peth Road | सांगली-पेठ रस्ता आता प्राधिकरणाकडे जाणार

सांगली-पेठ रस्ता आता प्राधिकरणाकडे जाणार

googlenewsNext

सांगली : वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सातत्याने चर्चेत असलेला पेठ-सांगली रस्ता नव्याने होण्याची शक्यता धूसरच आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत, पॅचवर्कवरच नागरिकांना समाधान मानावे लागणार आहे. सध्या या रस्त्यावर पॅचवर्कचे काम सुरू असून ते शनिवारपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला. त्यामुळे नागरिकांना आणखी काही वर्षे तरी वारंवार पडणाºया खड्ड्यांतूनच मार्ग शोधावा लागेल.
सध्या सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांवरून सामाजिक संघटनांसह नागरिकांनी आंदोलन हाती घेतले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून दररोज अपघात होत आहेत. यापूर्वी याच रस्त्यावर खड्डे चुकविताना काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. रस्ता बचाव कृती समितीने दिवाळीच्या पहिल्यादिवशी या रस्त्यावरील खड्ड्यांत दिवे लावून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने या रस्त्याच्या पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले. सध्या समडोळी फाटा ते तुंगपर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क सुरू आहे. कृती समितीने पॅचवर्कचा फार्स न करता नव्याने रस्ता करण्याची मागणी लावून धरली आहे. पण सध्या तरी नवीन रस्त्याची शक्यता कमीच दिसत आहे.
काही महिन्यांपूर्वी सांगली-पेठ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्त्वत: मंजूर झाला आहे. महामार्ग प्राधिकरणानेही या रस्त्याचा सर्व्हे केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ता हस्तांतरण करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यावर चर्चाही झाली आहे. पण अद्याप त्याला मूर्त स्वरुप प्राप्त झालेले नाही. बांधकाम विभाग तर, हा रस्ता हस्तांतरण करून आपल्या गळ्यातील घोंगडे कधी बाजूला होते, याचीच वाट पाहत आहे. सामाजिक संघटना, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे बांधकाम विभागाने पॅचवर्कचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी चार युनिटद्वारे काम सुरू केले आहे. समडोळी फाटा ते कसबे डिग्रज फाट्यापर्यंत बांधकाम विभागाकडून, तर कसबे डिग्रज फाटा ते तुंगपर्यंत ठेकेदारांकडून पॅचवर्क केले जात आहे.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण होणार असल्याने सध्या तरी प्रवासी, वाहनधारक, नागरिकांना पॅचवर्कच्या कामावरच समाधान मानावे लागेल. राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण झाल्याने नव्या रस्त्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे दिसते. पण, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा कितीप्रमाणात रेटा आहे, यावरच नविन रस्ता होणार आहे. जनता आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला नाही तर रस्त्याची दुरुस्तीची केवळ दुरुस्तीच होणार आहे.
सहापदरी रस्त्याचे : काय झाले?
जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जोड देत सांगली-पेठ रस्त्याच्या सहापदरीकरणास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी वर्षभरापूर्वी हिरवा कंदील दाखवला. या रस्त्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची सूचना त्यांनी केली. त्यासाठी आ. सुधीर गाडगीळ यांनी प्रयत्न केले होते; पण त्यानंतर या रस्त्याचे घोंगडे भिजतच पडले आहे. अजूनही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण करून रस्ता सहापदरी करण्याचा प्रस्ताव दिला होता; पण सहापदरी सोडा, आहे तो रस्ताही धड राहिलेला नाही. सहापदरी रस्त्याचे काय झाले? असा सवालही उपस्थित होत आहे.
तब्बल ८० हजार टन भार
पेठ ते सांगली हा रस्ता सुमारे ४० किलोमीटर अंतराचा आहे. सहापदरीकरणाअंतर्गत दोन्ही बाजूस १५ मीटर अंतराचा अंतर्भाव होण्याची शक्यता होती. शासकीय नोंदीनुसार सांगली-पेठ रस्त्यावर प्रतिदिन ७५ ते ८० हजार टन वाहतुकीचा भार आहे. वाढती वाहने, त्यांचा भार याबाबतचा विचार केल्यास सहापदरीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Web Title: Now go to the authority of Sangli-Peth Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.