खासदार फंडातील कामे निविदेआधीच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:16 AM2018-02-26T00:16:35+5:302018-02-26T00:16:35+5:30

MP fund works already completed | खासदार फंडातील कामे निविदेआधीच पूर्ण

खासदार फंडातील कामे निविदेआधीच पूर्ण

Next

दत्ता पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : खासदार संजयकाका पाटील यांच्या फंडातून जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील दोन, खानापूर तालुक्यातील एक आणि आटपाडी तालुक्यातील एक अशा चार कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र निविदा प्रक्रिया सुरू असतानाच तासगाव आणि खानापूर तालुक्यातील काही कामे पूर्ण झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. निविदेआधीच काम पूर्ण झाल्यामुळे ठेकेदारीबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे.
निविदा मॅनेजची चर्चा जोर धरत असून, बांधकाम विभागाचे अधिकारी कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या खासदार फंडातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात चार ठिकाणी एकूण २४ लाख ७१ हजार रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी येथे मारुती मंदिरासमोरील ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत अभ्यासिका बांधण्यासाठी ५ लाख ७७ हजार रुपये, खानापूर तालुक्यातील मौजे खंबाळे (भा.) येथील मारुती मंदिरापासून उत्तर बाजूला दशरथ ईश्वरा सुर्वे यांच्या घरापर्यंतचा रस्ता कॉँक्रिटीकरण करण्यासाठी ४ लाख रुपये, तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील कब्रस्थानसाठी संरक्षक भिंत बाधण्यासाठी ९ लाख ९४ हजार रुपये आणि तासगाव नगरपालिका हद्दीतील तासगाव-सांगली रोडपासून श्री धारेश्वर कोल्ड स्टोअरेजकडे जाणारा रस्ता कॉँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातील आंबेवाडीचे काम सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी, तर उर्वरीत तीन कामे मजूर सहकारी संस्थेसाठी आहेत.
चार कामांसाठी ३ मार्चला निविदा उघडण्यात येणार असल्या तरी, ठेकेदारीचा अजब कारभार तासगाव आणि खानापूर तालुक्यात चव्हाट्यावर आला आहे. निविदा प्रक्रिया सुरू असतानाच, काही ठेकेदारांनी संबंधित काम पूर्ण करण्याची किमया केली आहे. तासगाव नगरपालिका हद्दीतील, तासगाव ते सांगली रस्त्यावरील धारेश्वर कोल्ड स्टोअरेजकडे जाणाºया रस्त्याचे कॉँक्रिटीकरण, तसेच खानापूर तालुक्यातील मौजे खंबाळे येथील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
निविदा प्रक्रिया आॅनलाईन असतानादेखील निविदा दाखल करण्यापूर्वीच कामे पूर्ण कशी झाली? याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. दाखल झालेल्या निविदा तीन तारखेला खुल्या करून सर्वात कमी दराने निविदा दाखल केलेल्या ठेकेदाराला हे काम मिळणे आवश्यक होते. कामासाठीचा ठेकेदार निश्चित झाल्यानंतर, शाखा अभियंता, उपअभियंत्यांच्या नियंत्रणाखाली हे काम पूर्ण होणे आवश्यक होते.
मात्र निविदा निघण्यापूर्वीच काम पूर्ण करण्याचा अजब कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. ठेकेदारीच्या लालसेपोटी ठेकेदाराकडून ही कामे करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र यानिमित्ताने ठेकेदारी आणि ई-टेंडरिंग प्रक्रियाच संशयाच्या भोवºयात सापडली आहे.
ई-निविदा : विश्वासपात्र आहे का?
कामाची निविदा निघण्यापूर्वीच ठेकेदारांकडून काम पूर्ण करण्यात आले आहे. काम करत असताना, बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या परस्परच कारभार झाला आहे. मुळातच नियमबाह्यपणे झालेले काम, अधिकाºयांच्या नियंत्रणाशिवाय झाल्यामुळे दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र त्याहीपेक्षा पारदर्शी कारभार केल्याचे सांगून शासनाने जुनी निविदा प्रक्रिया मोडीत काढली. त्याऐवजी ई-टेंडरिंगची पध्दत अंमलात आणली. त्यामुळे निकषात बसणाºया परवानाधारक कोणत्याही ठेकेदाराला निविदा दाखल करण्याचे अधिकार मिळाले. मात्र अशा पारदर्शी प्रक्रियेला गुंडाळून ठेवत बेकायदा काम करण्याचा कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला असून, ई-टेंडरिंगवर प्रक्रियेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: MP fund works already completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.