देवस्थान जमीन प्रश्नी सांगलीत सोमवारी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 05:22 PM2024-01-05T17:22:09+5:302024-01-05T17:22:36+5:30

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक

March on guardian minister office in Sangli on Monday over devasthan land question | देवस्थान जमीन प्रश्नी सांगलीत सोमवारी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा

देवस्थान जमीन प्रश्नी सांगलीत सोमवारी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा

सांगली : देवस्थान इनाम वर्ग तीनची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अकोले ते लोणी पायी मोर्चा काढला होता. यावेळी तीन महिन्यात शासनाने प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले असून त्यास नऊ महिने झाले आहे. तरीही शासनाकडून आश्वासनाची पूर्तता झाली नाही, म्हणून सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर दि. ८ जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.

उमेश देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांनी अकोले ते लोणी पायी मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र शासनाकडून तीन मंत्री चर्चेसाठी उपस्थित होते. त्यामध्ये सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा समावेश होता. लेखी आश्वासनात शेतकऱ्यांचा प्रश्न तीन महिन्यात सोडविण्यात येणार असल्याचे म्हटले होते. पण आज नऊ महिने झाले तरीही शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही.

उलट या शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी गुंतागुंतीचे होत आहेत. पिढ्यानपिढ्या जमीन कसत असून देखील हा शेतकरी कागदोपत्री उपरा ठरत आहे. महाराष्ट्रातील सर्व इनामे खालसा केली. परंतु इनाम वर्ग तीन आजही खालसा केले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उभे करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच पालकमंत्री खाडे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या..

  • देवस्थान ईनाम वर्ग तीन खालसा करून कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करा.
  • सात-बारा उताऱ्यावरील कब्जेदार सदरातील नोंदी इतर हक्कात घातल्या आहेत, त्या पूर्ववत कब्जेदार सदरात घ्या.
  • मुस्लीम कुटुंबाना दिलेल्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील वक्फ सत्ता प्रकार ही नोंद रद्द करून शेतकऱ्यांची नोंद कब्जेदार सदरात घ्या.
  • जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच दीर्घ मुदतीची कर्जे उपलब्ध करा.

Web Title: March on guardian minister office in Sangli on Monday over devasthan land question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.