महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊ नये : रामदास आठवले 

By संतोष भिसे | Published: March 18, 2024 04:57 PM2024-03-18T16:57:56+5:302024-03-18T16:58:42+5:30

'संविधान बदलाची भाषा करणाऱ्या हेगडेंचा निषेध'

Mahavikas Aghadi should not take Balasaheb Ambedkar along says Ramdas Athavale | महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊ नये : रामदास आठवले 

महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊ नये : रामदास आठवले 

सांगली : बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीत जातील असे वाटत नाही. आघाडीनेही त्यांना घेऊ नये. ते मोदींविरोधात असले, तरी मी मोदींच्या पाठीशी ठाम आहे. बाळासाहेब यांनी विरोधी भूमिका घेता कामा नये असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

सांगलीत ते पत्रकार बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, राहुल गांधी यांना बघायला लोक येतात. त्याचे रुपांतर मतात होणार नाही. त्यांना पंतप्रधानपद मिळेल कि नाही हे माहिती नाही. मनमोहन सिंग यांच्यावेळीच पंतप्रधान बनवायला हवे होते. काँग्रेसचे युग संपलेले नाही, पण चांगले दिवस येण्याची शक्यता नाही. केरळमध्ये त्यांना एकही जागा मिळणार नाही. या निवडणुकांत आम्ही उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये एकही उमेदवार उभा करणार नाही. तेथे भाजपला पाठबळ देऊ.

आठवले म्हणाले, राहुल गांधींना भारत जोडण्याची आवश्यकता नाही, ते काम मोदींनी यापूर्वीच केले आहे. त्यांना फार जागा मिळणार नाहीत. मोदी मुस्लिमविरोधी नाहीत. त्यांनी राबविलेल्या योजनांचा फायदा सर्व जातीधर्मांना होत आहे. भाजप यावेळी ३७० पेक्षा जास्त जागा मिळवेल. रिपब्लिकन पक्ष मोदींच्या मागे ताकदीने उभा आहे. पण मोदींनी जागावाटपात आम्हाला डावलू नये. आमचा मतदार कमी असला तरी निर्णायक आहे. जिल्हा पातळीवर नियोजन समिती किंवा स्थानिक समित्यावर आमच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. 

ते म्हणाले, लोकसभेसाठी शिर्डी व सोलापूरच्या जागा मिळाव्यात अशी पत्रे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, जे. पी. नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहेत. मला शिर्डी किंवा सोलापूर मिळाले तर तेथे लढेन. निवडणुकीमुळे आमच्या पक्षाला मान्यता मिळेल. फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. आम्हाला जागा नाही दिल्या तर समाजात नाराजी पसरेल. जागा मिळणे हा आमचा हक्क आहे. जुन्या मित्रांना विसरू नये अशी भाजपला विनंती आहे.

यावेळी रिपाईंचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सचिव सुरेश बारशिंगे, सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, जगन्नाथ ठोकळे, अण्णा वायदंडे, श्वेतपद्म कांबळे, सचिन सवाखंडे आदी उपस्थित होते.

हेगडेंवर कारवाईची मागणी

आठवले म्हणाले, कर्नाटकचे भाजप नेते अनंतकुमार हेगडे नेहमीच दलितविरोधी भूमिका मांडतात. पण भाजप व मोदी यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. संविधान बदलण्याचा अधिकार कोणाला नाही. ज्यांना बदलायचे आहे, त्यांनी देशात राहू नये. संविधान बदलाची भाषा करणाऱ्या हेगडेंचा मी निषेध करतो. त्यांच्यावर कारवाईसाठी नड्डा यांना पत्र पाठवू.

.. तर आमचे १०-१२ मंत्री असते

आठवले म्हणाले, शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली होती. पण बाळासाहेब आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आम्ही एकत्र आलो असतो, तर शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात आमचे १०-१२ मंत्री होऊ शकले असते.

Web Title: Mahavikas Aghadi should not take Balasaheb Ambedkar along says Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.