Lok Sabha Election 2019 - सांगली जिल्हा परिषद सदस्यांकडून विधानसभेची पेरणी-लोकसभेच्या मैदानात उजळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:01 AM2019-03-26T00:01:51+5:302019-03-26T00:03:52+5:30

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघाचे दौरे करून लोकसभेच्या मैदानात विधानसभेची पेरणी सुरु केली आहे. भाजप उमेदवार आणि दोन्ही काँग्रेस आघाडीच्या संभाव्य उमेदवारांनी जिल्हा

Lok Sabha Election 2019 - Legislative Assembly sowing of Members of Sangli Zilla Parishad - Parliamentary Review | Lok Sabha Election 2019 - सांगली जिल्हा परिषद सदस्यांकडून विधानसभेची पेरणी-लोकसभेच्या मैदानात उजळणी

Lok Sabha Election 2019 - सांगली जिल्हा परिषद सदस्यांकडून विधानसभेची पेरणी-लोकसभेच्या मैदानात उजळणी

googlenewsNext

- अशोक डोंबाळे ।
सांगली : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघाचे दौरे करून लोकसभेच्या मैदानात विधानसभेची पेरणी सुरु केली आहे. भाजप उमेदवार आणि दोन्ही काँग्रेस आघाडीच्या संभाव्य उमेदवारांनी जिल्हा परिषदेतील काही नाराज सदस्यांचा धसका घेतला आहे. सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवारच नसल्यामुळेही सदस्य द्विधा मन:स्थितीत आहेत.
मंत्रालयात पोहोचण्याची पायरी म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. सांगली जिल्हा परिषदेतून आजवर १६ सदस्य संसद-विधिमंडळात पोहोचले आहेत.

आता सहा विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. माजी आमदार संपतराव देशमुख यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे. सध्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांच्या भेटीगाठी चालू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातूनही ते गावोगावी भेटी देत असले तरी, बऱ्यापैकी त्यांची विधानसभा निवडणुकीची तयारी चालू असल्याचे दिसत आहे.

उमदी (ता. जत) जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले विक्रम सावंत यांनी मागील विधानसभा निवडणूक लढविली. त्यांचा निसटता पराभव झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणीला लागले आहेत. लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवारच नसल्यामुळे त्यांनी सर्वाधिक लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रित केले आहे. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनीही जतचे भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य सत्यजित देशमुख यांनीही शिराळा विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणूक लढविली आहे. सध्या ते जिल्हा परिषदेत असले तरीही, त्यांची शिराळा विधानसभा मतदारसंघात नव्याने मोर्चेबांधणी चालू आहे. मागील निवडणुकीतील चुका दुरुस्त करून मिनी मंत्रालयातून मंत्रालयाची ते सध्या रणनीती आखत आहेत. सलग तीनवेळा जिल्हा परिषदेत निवडून येऊन शिवाजी डोंगरे यांनी हॅट्ट्रिक केली आहे. त्यांच्याकडे माधवनगर, बुधगाव, बिसूर, कवलापूर परिसरात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. या जोरावर भाजपकडून बुधगाव मतदारसंघातून पत्नी विद्या डोंगरे आणि कवलापूर जिल्हा परिषद गटातून स्वत: शिवाजी डोंगरे निवडून आले आहेत. कार्यकर्त्यांनीच त्यांना सांगली विधानसभा मतदारसंघातून लढविण्यासाठी आग्रह धरला आहे.

बोरगाव (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले काँग्रेसचे जितेंद्र पाटील यांनीही मागे वाळवा विधानसभा निवडणूक लढविली आहे. पुन्हा त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी ठेवली आहे.लोकसभा निवडणुका लागल्यापासून पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे फिरकणेच बंद केले आहे. मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेण्यावरच भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच ते जिल्हा परिषदेत येण्याची शक्यता आहे.

परंपरा झेडपीची : राज्यात झळकण्याची
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये राजकारणाची सुरुवात करणाºया सोळाजणांना पुढे आमदारकीची संधी मिळाली. त्यातील चौघे मंत्री झाले. माजी मंत्री शिवाजीराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यपातळीवर कामाचा ठसा उमटविला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर सध्या कार्यरत आहेत. या ज्येष्ठांच्या पावलावर पाऊल टाकत विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनीही तयारी सुरु केली आहे.

तीन माजी झेडपी सदस्यांचीही तयारी
माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांनी इस्लामपूर विधानसभा, तर त्यांचे बंधू सम्राट महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी मागील विधानसभा निवडणूक लढविली होती. पण, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यानुसार त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019 - Legislative Assembly sowing of Members of Sangli Zilla Parishad - Parliamentary Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.