लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेएकंद : कुमठे (ता. तासगाव) येथे संपूर्ण गावात दारूबंदी व्हावी, दारूच्या विळख्यातून समाज व भावी पिढी मुक्त व्हावी यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. आज मंगळवार, दि. १२ रोजी मतदानातून ‘बाटली आडवी’ करून ऐतिहासिक क्रांती गावच्या रणरागिनी करणार आहेत.
महिलांच्या या विधायक कार्याला युवकांतून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर ग्रामस्थ, बंधू-भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व पक्षीय राजकीय मंडळींनीही पाठिंबा दिला आहे. दारूबंदी अभियानअंतर्गत दारूबंदी कृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांकडून गेल्या दोन महिन्यांपासून प्रबोधन केले जात आहे. सर्व गावातील महिलांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुमारे दोन हजार पाचशे महिला मतदान यादीत समाविष्ट आहेत. सुमारे सत्तर टक्क्याहून अधिक महिला सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भावी पिढीच्या दृष्टीने चांगला निर्णय असल्याने ऐतिहासिक, क्रांतिकारक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठीच महिला वर्गातून उत्साह बळावला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या लढ्याला पाठबळ देऊन कुमठेकर बाटली आडवी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.