मगरींच्या मुक्त वावरामुळे कृष्णाकाठावर धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:25 PM2017-12-31T23:25:22+5:302017-12-31T23:26:15+5:30

Krishna Vanarakatha scared of the free flow of the grave | मगरींच्या मुक्त वावरामुळे कृष्णाकाठावर धास्ती

मगरींच्या मुक्त वावरामुळे कृष्णाकाठावर धास्ती

Next

सोमनाथ डवरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. वीसहून अधिकजण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एखादी घटना घडली की वन विभाग जागा होतो. कागदी घोडे नाचविले जातात. प्राणीमित्रांचे ‘प्रबोधन’ सुरू होते.
आतापर्यंत अनिकेत कदम (कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ नोव्हेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ एप्रिल २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) या सातजणांचा मगरींच्या हल्ल्यात बळी गेला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत अंकलखोप, ब्रह्मनाळ, कसबे डिग्रज, सांगली, तुंग या ठिकाणी नदीवर अंघोळीसाठी, मासेमारीसाठी, वैरणीसाठी गेलेल्या सुमारे ४० जणांवर मगरींनी जीवघेणे हल्ले केले आहेत. नदीवर विविध कारणांनी जावेच लागते. वाळू उपशामुळे मगरींची आश्रयस्थाने उद्ध्वस्त झाली आहेत. पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगर सर्वेक्षणात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आढळल्या. मगर एकावेळी ४०-५० पिलांना जन्म देते. यापैकी ४-५ जरी प्रौढ झाल्या, तरी मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
२५ नोव्हेंबरला तुंग येथे एक मगर मृत आढळली, तर इनाम धामणी येथे दोन चार-पाच फुटी मगरींची हत्या झाल्याचे आढळले. तसेच २५ डिसेंबर रोजी कसबे डिग्रज बंधारा जॅकवेलजवळ दहाफुटी मगरीची हत्या केलेले शीर आढळले. मात्र तिचे बाकीचे धड सापडले नाही. हे प्रकरण प्रसारित होऊ नये, यासाठी वन विभाग प्रयत्न करताना दिसून येत आहे. सध्या या प्रकरणाचा शोध सुरू आहे. पोलिसात प्रकरण दाखल आहे, पण अद्याप याबाबत ठोस माहिती पुढे येत नाही.
मगरींची शिकार, तस्करी होतेय का?
सध्या मानवबळीनंतर आता मगरहत्यांची मालिका सुरू होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मगरींची शिकार किंवा तस्करी होते का? याबाबत शोध घेणे गरजेचे आहे. संशय कुणावर घ्यायचा, हा प्रश्न आहे. वनखाते कागदी घोडे नाचवित आहे. मगरतचे दर्शन, भीती कायमच आहे. मगरी पकडण्याबाबत ठोस धोरण गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे संरक्षक जाळी, नदीवर वीज व्यवस्था याबाबतची चर्चा वन विभाग करतो. महाजाळी कितपत योग्य ठरते, हे महत्त्वाचे आहे. प्राणीमित्रांच्या प्रबोधनाचा कितपत उपयोग होतो, हाही प्रश्न आहेच.

Web Title: Krishna Vanarakatha scared of the free flow of the grave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली