भौगोलिक मानांकनाने ‘सांगलीची हळद’ ब्रँड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:29 PM2018-06-13T23:29:03+5:302018-06-13T23:29:03+5:30

Geographical brand will be the 'Sangli turmeric' brand | भौगोलिक मानांकनाने ‘सांगलीची हळद’ ब्रँड होणार

भौगोलिक मानांकनाने ‘सांगलीची हळद’ ब्रँड होणार

Next
ठळक मुद्देदरामध्ये वाढ शक्य : बाजारात चांगली मागणी; शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला लोकप्रतिनिधींचेही पाठबळ हवे

सांगली : भौगोलिक मानांकन (जिआॅग्राफिकल इंडेक्स : जीआय) हा दर्जा मिळाल्यास ‘सांगलीची हळद’ असा ब्रँड म्हणून बाजारात विकला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जीआय मानांकन असलेल्या मालाविषयी शंका घेतली जात नसून, दरही चांगला मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच शेतकरी हळदीला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सांगलीच्या बेदाण्यास जीआय मानांकन मिळाल्यास गेल्या दोन वर्षांपासून द्राक्षबागायतदारांना त्याचा फायदा होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगलीच्या बेदाण्याचा ‘जीआय’ कोड नंबर केंद्र शासनाकडून मिळाला असून, त्यावरच बेदाण्याची विक्री होत आहे. याचा जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना फायदा झाला आहे.

देशातील बेदाण्यापेक्षा सांगलीच्या बेदाण्याला २० ते २५ टक्के जादा दर मिळत आहे. बेदाण्याचा चांगला अनुभव लक्षात घेऊनच जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरीही जीआय मानांकन घेण्यासाठी पुढे आले आहेत.पुण्यातील ‘जीआय’ विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे म्हणाले की, सांगली परिसरात पिकणाºया हळदीला मानांकन मिळाल्यास आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सांगलीची हळद म्हणून मान्यता मिळेल. ही मान्यता केंद्र सरकारकडून मिळते. त्यामुळे हा सांगलीचा ब्रॅँड म्हणून कायमस्वरुपी बाजारात विकला जाऊ शकतो. जगातील आजवर १६० देशांनी या जीआय मानांकनास मान्यता दिली आहे. ते मानांकन असलेल्या मालाविषयी शंका घेतली जात नाही. शिवाय हे मानांकन मिळण्यास त्या त्या परिसरातील पिकांची गुणवैशिष्ट्ये मानली जातात.

सांगली परिसराचे हवामान, येथील मातीचा गुण, साठवणुकीची पद्धत आणि हळदीचा केशरीया रंग या वैशिष्ट्याने देशभर तसेच आंतरराष्टÑीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यावर जीआय मानांकनाने शिक्कामोर्तब होणार आहे. म्हणूनच जीआय मानांकन मिळविण्यासाठी शेतकºयांचे प्रयत्न चालू आहेत.

‘जीआय’मुळे बेदाण्याच्या दरात २० टक्के वाढ
जीआय मानांकन बेदाण्यास मिळाल्यामुळे शेतकºयांना त्याचा खूप फायदा झाला आहे. जीआय मानांकनाचा एक कोड असून, तो जिल्ह्यातील ३०० शेतकºयांना दिला आहे. बेदाणा पेटीवरच जीआय कोड छापला आहे. परदेशात ज्यावेळी तो विक्रीला जातो, त्यावेळी सांगलीचा बेदाणा अशीच तेथे ओळख निर्माण झाली आहे. देशातील अन्य भागातील बेदाण्यापेक्षा २० ते २५ टक्के जादा दर सांगलीच्या बेदाण्यास मिळत आहे. पेटीवर कोड दिला असल्यामुळे कुणीही बेदाण्यात भेसळ करू शकत नाही. यापुढे सांगली जिल्ह्यातील सर्व द्राक्षबागायतदारांना आम्ही जीआय मानांकनाचे सभासद करून घेऊन सांगलीचे नाव जगात आदर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी दिली.

जीआय मानांकनामुळे होणारे फायदे
शेतीमालास प्रतिष्ठा
शेतीमालाची नेमकी ओळख
गुणवत्तेची खात्री
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी

Web Title: Geographical brand will be the 'Sangli turmeric' brand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.