तंतुवाद्यांच्या कच्च्या मालावर जीएसटीची कु-हाड, निर्मिती व्यवसायाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 08:27 PM2017-09-12T20:27:19+5:302017-09-12T20:27:19+5:30

राज्यात एकमेव असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सतार, तंबोरा, सरोद ही तंतुवाद्ये वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) वगळण्यात आली आहेत; मात्र सतार व तंबोरा या तंतुवाद्यांसाठी लागणारे लाकूड, तारा, प्लॅस्टिक, रंग यासह इतर कच्च्या मालावर जीएसटी आकारण्यात येत असल्याने तंतुवाद्याच्या किमती वाढल्या आहेत.

Fossil gastrointestinal trawl damage to GST manufacturing plant | तंतुवाद्यांच्या कच्च्या मालावर जीएसटीची कु-हाड, निर्मिती व्यवसायाला फटका

तंतुवाद्यांच्या कच्च्या मालावर जीएसटीची कु-हाड, निर्मिती व्यवसायाला फटका

Next

- सदानंद औंधे

मिरज, दि. 12 - राज्यात एकमेव असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सतार, तंबोरा, सरोद ही तंतुवाद्ये वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) वगळण्यात आली आहेत; मात्र सतार व तंबोरा या तंतुवाद्यांसाठी लागणारे लाकूड, तारा, प्लॅस्टिक, रंग यासह इतर कच्च्या मालावर जीएसटी आकारण्यात येत असल्याने तंतुवाद्याच्या किमती वाढल्या आहेत. अगोदरच अडचणीत असलेल्या तंतुवाद्य निर्मिती व्यवसायास दरवाढीचा फटका बसला आहे.  
तंतुवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेत तंतुवाद्य निर्मिती कारागीरांच्या पाच पिढ्या या व्यवसायात आहेत. मिरजेतील तंबोरा व सतार या दर्जेदार तंतुवाद्यांनी संपूर्ण देशात व परदेशात लौकिक मिळविला आहे. तंतुवाद्याचा मधुर व सुरेल आवाज, टिकावूपणा, सुबकता यामुळे मिरजेतील सतार व तंबो-यांना विविध मानसन्मान मिळाले आहेत. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतकला टिकविण्याचे श्रेय तंतुवाद्य कारागीरांनाही आहे; मात्र विविध अडचणींमुळे मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती कारागीरांची संख्या घटत आहे. 
महागाई, तंतुवाद्य निर्मितीतून मिळणारे अपुरे उत्पन्न, इलेक्ट्रॉनिक वाद्यांचे आक्रमण अशा विविध कारणांमुळे अडचणीत असलेली तंतुवाद्य निर्मिती कला कच्च्या मालावर जीएसटी आकारणीमुळे आणखी अडचणीत आली आहे. इलेक्ट्रॉनिक तानपु-याच्या आक्रमणामुळे तंतुवाद्य निर्मिती व्यवसायाला मोठा फटका बसला. तंतुवाद्यांची घटलेली मागणी, कच्च्या मालाचे वाढत्या दरामुळे तंतुवाद्य कारागीरांची संख्या कमी होत आहे. अत्यंत कष्टाचे काम व तुटपुंज्या उत्पन्नामुळे कारागीरांची संख्या कमी होऊन नवी पिढी व्यवसायात येण्यासाठी इच्छुक नाही. या पार्श्वभूमीवर कच्च्या मालावर जीएसटी आकारणीमुळे तंतुवाद्यांची दरवाढ होऊन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे. राज्य शासनाने तंतुवाद्य निर्मितीस हस्तकलेचा दर्जा देऊन  तंतुवाद्य निर्मिती व्यवसायासाठी मिरजेत क्लस्टर मंजूर केले आहे. 
क्लस्टर योजनेअंतर्गत तंतुवाद्य कारागीरांना विमा, दुकाने, संशोधन व निर्मितीसाठी शासनाच्या जागेत सामुदायिक सुविधा केंद्र निर्मितीसाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. क्लस्टर योजनेसाठी सुमारे दोनशे तंतुवाद्य कारागीरांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र क्लस्टर योजनेअंतर्गत शासनाचे अनुदान व सुविधा मिळविण्यासाठी २० टक्के रक्कम भरण्याची अट असल्याने ही योजना रखडली आहे. तंतुवाद्य निर्मितीसाठी शासनाचे प्रोत्साहनाचे धोरण असताना, दुस-या बाजूला कच्च्या मालावर जीएसटी आकारणीमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे तंतुवाद्य कारागीरांनी सांगितले. 

कर आकारणी रद्द करण्याची मागणी...
देशातील अनेक दिग्गज कलाकार मिरजेत तयार झालेल्या सतार व तंबो-याचा वापर करतात. मिरजेच्या सतार व तंबो-यास परदेशातही मागणी आहे. विशिष्ट, मजबूत, टिकाऊ भोपळ्यामुळे मिरजेतील सतार, तंबो-याचा देशात लैकिक आहे. कच्च्या मालाच्या दरात जीएसटीमुळे वाढ झाल्याने वाद्यांच्या दरात पंधरा टक्के वाढ होणार आहे. मिरजेतील तंतुवाद्यांना कोलकाता व लखनौ येथील स्वस्त दराच्या तंतुवाद्याशी स्पर्धा करावी लागते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या तंतुवाद्य व्यवसायासाठी लागणा-या कच्च्या मालावरील जीएसटी आकारणी रद्द करण्याची मागणी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर यांनी केली.

Web Title: Fossil gastrointestinal trawl damage to GST manufacturing plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.