शेतकरीवाद निर्माण झाला पाहिजे

By admin | Published: April 16, 2017 10:47 PM2017-04-16T22:47:08+5:302017-04-16T22:47:08+5:30

बच्चू कडू : कऱ्हाड येथे ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रेचे स्वागत; सभेत डागली तोफ

Feminism should be created | शेतकरीवाद निर्माण झाला पाहिजे

शेतकरीवाद निर्माण झाला पाहिजे

Next



कऱ्हाड : ‘शेतात दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सरकारकडून भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्याने पिकवलेला माल देखील त्याला विकता येत नाही. शेतकऱ्यांविरोधी धोरण ठेवणाऱ्या या सरकारविरोधीही आज शेतकऱ्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. या भांडवलशाही सरकारविरोधात आता कट्टर शेतकरीवाद निर्माण झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू-पाटील यांनी केले.
शेतकरी, शेतमजूर, विधवा आणि सैनिकांच्या हक्कासाठी शेतकरी शेतमजुरांची आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढलेली ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा रविवारी कऱ्हाड येथे दाखल झाली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, चंद्रकांत यादव, विक्रम थोरात, साजीद मुल्ला, दीपक पाटील, विश्वास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार बच्चू कडू म्हणाले, ‘या देशाला चांगल्या नेत्याची नाही तर चांगल्या कार्यकर्त्याची गरज आहे. जो इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवेल. शेतकऱ्यांना एकत्रित करू शकेल. आसूड यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना एकत्रिक करण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकरी हिताविरोधी निर्णय घेणाऱ्या या सरकारला निर्णय बदलायला लावण्यास भाग पाडणार आहे. आसूड यात्रा हा आमचा ‘ट्रेलर’ असून, पिक्चर अभी बाकी है. सध्याचे मोदी सरकार हे शेतकरी हिताविरोधी निर्णय घेत आहे. या देशात पिकविणाऱ्याचा विचार न करता खाणाऱ्याचा विचार करणारे हे सरकार आहे.’
यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर कर्जमाफी झालीच पाहिजे. सध्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सरकारविरोधी शेतकरी असा संघर्ष निर्माण होतोय. एकीकडे राज्यातील काही आमदार एसीच्या गाडीतून संघर्ष यात्रा काढत आहेत. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू उन्हातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ‘सीएम टू पीएम’ अशी आसूड यात्रा काढत आहेत. हे सर्व राज्यांतील शेतकरी बघत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाच्या बाजूने लढा उभा करायचा हे त्यांनी ठरवावे.’
दरम्यान, ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरापासून सुरू झालेली आसूड यात्रा दि. २१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील वडनगर येथील घरी जाणार आहे. ही आसूड यात्रा रविवारी कऱ्हाड येथे आली. यावेळी कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दत्त चौकात आमदार बच्चू कडू यांचे बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी स्वागत केले. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे आ. बच्चू कडू यांची सभा पार पडली. (प्रतिनिधी)
प्रशासनातील बोक्यांवर आसूड उगारा !
‘सहपालकमंत्री सदाभाऊ खोत हे प्रशासनाच्या वारंवार बैठका घेऊन शेतकऱ्यांना पाणी देण्याचे आश्वासन देत आहेत. एकीकडे या प्रशासनाने मार्च २०१२ पासून पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना साधे विजेचे कनेक्शनसुद्धा दिलेले नाही. अशा प्रशासनाबरोबरच सदाभाऊ बैठका घेत आहेत. या प्रशासनातील बोक्यांवर आता आसूड उगारण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर एकदा आसूड उगारलाच पाहिजे,’ असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्याच्या आसुडाचा आवाज चौकात घुमला
आमदार बच्चू कडू यांची रविवारी ‘सीएम टू पीएम’ ही आसूड यात्रा कऱ्हाड येथील दत्त चौकात आली असताना या ठिकाणी एका शेतकऱ्याने आमदार बच्चू कडू यांचे आसूड उगारून स्वागत केले. यावेळी संबंधित शेतकऱ्याने उगारलेल्या खऱ्या अर्थाने आसूड यात्रा पार पडली असल्याची चर्चा उपस्थित लोकांमध्ये केली जात होती.

Web Title: Feminism should be created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.