वातावरणातील बदलाने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:34 PM2017-10-30T17:34:11+5:302017-10-30T17:41:30+5:30

मागील आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या वातावरण बदलाचा फटका द्राक्षबागायतदारांना बसत असून, त्यांना हवामानाचा वेध घेत चोवीस तास बागेतच थांबावे लागत आहे.

Due to the change in the environment, the vines can be scorched | वातावरणातील बदलाने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती

वातावरणातील बदलाने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती

Next
ठळक मुद्देदुष्काळात तेरावा..घाटमाथ्यावरील स्थिती हवामान बदलाने द्राक्षबागायतदार हवालदिलपावसाने वक्रदृष्टी दाखविल्याने पाण्याची तीव्र टंचाई

घाटनांद्रे ,दि. ३० :  मागील आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या वातावरण बदलाचा फटका द्राक्षबागायतदारांना बसत असून, त्यांना हवामानाचा वेध घेत चोवीस तास बागेतच थांबावे लागत आहे.


घाटमाथ्यावरील नागज, कुची, जाखापूर, कुंडलापूर, वाघोली, गर्जेवाडी, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात पोषक व पूरक वातावरण असल्यामुळे बळीराजाने नगदी पीक म्हणून द्राक्ष उत्पादनावर भर दिल्याने या भागात द्राक्षक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षापासून घाटमाथ्यावर एकही दमदार पाऊस न झाल्याने अद्यापही तलाव, ओढे, नाले, बंधारे कोरडे ठणठणीत आहेत.

कूपनलिका, विहिरीही जेमतेमच आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वेळोवेळी सहन करावा लागत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागाही काढून टाकल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी टॅँकरच्या पाण्याद्वारे बागा कशातरी जगविल्या. घाटमाथ्यावर पावसाने वक्रदृष्टी दाखविल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

निसर्गाचा लहरीपणा, तसेच खते व औषधांच्या वाढत्या किमतीला सामोरे जात पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या द्राक्षबागा, निसर्गात सध्या अचानक होणाऱ्या वातावरण बदलाने पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत.

अशा भीषण काळातही शेतकऱ्यांनी बागा जगविल्या. पण गेल्या आठवड्यापासून दिवसा कडक ऊन, कधी तर पावसाचा शिडकावा, रात्री थंडी व पहाटेच्या वेळी धुके, यामुळे भुरी, दावण्या, मिलिबग्ज यासारख्या रोगांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून शेतकºयांना चोवीस तास हवामानाचा वेध घेत बागेतच थांबावे लागत आहे.
सध्या जवळजवळ सर्वच बागांची फळछाटणी झाली असून, काही बागा फुलोऱ्यात आहेत.

त्याचबरोबर आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांचे मणी मऊ पडू लागले आहेत. तेथे माल तयार होऊ लागला आहे. अशा द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या बागा हातून जातात की काय, याचा विचार करत शेतकरी रात्रं-दिवस बागांवर औषध फवारणी करत आहे.


दुष्काळात तेरावा..

हवामानातील बदलांचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. दुष्काळी स्थितीत पाण्याची सोय करून द्राक्षबागा जगविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यानंतर हवामानातील बदलांचा फटका बसून बागा हातच्या जाऊ लागल्याने दुष्काळात तेरावा महिना, अशीच अवस्था बागायतदारांची झाली आहे. द्राक्षबागायतदार या हवामान बदलाने चांगलाच हवालदिल झाला आहे. ​

Web Title: Due to the change in the environment, the vines can be scorched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.