Lok Sabha Election 2019 लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी जिल्हा बॅँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:32 PM2019-04-18T23:32:05+5:302019-04-18T23:32:22+5:30

सांगली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार हे सांगली जिल्हा बँकेचे संचालक असून, अन्य संचालकांपैकी ९० टक्के संचालक ...

District Bank at the center of Lok Sabha elections | Lok Sabha Election 2019 लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी जिल्हा बॅँक

Lok Sabha Election 2019 लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी जिल्हा बॅँक

Next

सांगली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार हे सांगली जिल्हा बँकेचे संचालक असून, अन्य संचालकांपैकी ९० टक्के संचालक हे या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा बॅँक लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आली आहे.
भाजपचे खासदार व उमेदवार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील हे दोघेही जिल्हा बॅँकेचे संचालक आहेत. दोघेही प्रमुख उमेदवार असल्यामुळे जिल्हा बॅँकेचे संचालकही या दोन्ही उमेदवारांमध्ये विभागले गेले आहेत. एक खासदार, दोन आमदार, दोन माजी आमदार, एक जिल्हा परिषद अध्यक्ष अशी दिग्गज राजकीय मंडळी या बॅँकेत आहेत. याशिवाय अन्य संचालकांमध्येही ताकदीचे राजकारणी असल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे सर्वजण महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. दिलीपतात्या पाटील हे बॅँकेचे अध्यक्ष व राष्टÑवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघातील प्रचाराची धुरा त्यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे संपूर्ण संचालक मंडळच या ना त्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीशी बांधले गेले आहे.
कॉंग्रेस आघाडी आणि भाजप अशा दोन गटात संचालक विभागले गेले आहेत. जिल्हा बँकेतील सत्ताधारी शेतकरी पॅनेलमध्ये सर्वच पक्षांचा भरणा आहे. विरोधी रयत पॅनेलमध्ये बहुतांश कॉंग्रेसचे संचालक आहेत. तरीही लोकसभा निवडणुकीत पॅनेलचा विचार न राहता स्वतंत्र पक्षीय विचार घेऊन संचालक स्वतंत्रपणे वाटचाल करीत आहेत. सध्या बँकेत संचालकांचा वावरही कमी झाला आहे. जे संचालक येतात, त्यांच्यातही राजकीय विषय चर्चेचा बनला आहे. जिल्हाभर वेगवेगळ््या मतदारसंघातून आलेले संचालक त्या त्या ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेत दिसत आहेत. प्रत्येक संचालकाचे निवडणुकीतील योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याने सातत्याने दोन्ही उमेदवार त्यांच्या गटातील संचालकांशी संपर्कात आहेत. उमेदवारांनी त्यांच्याकडे जबाबदाऱ्याही सोपविल्या आहेत.
कोण कोणाकडे आहे...
भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे सध्या आ. अनिल बाबर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, चंद्रकांत हाक्के आदी, तर विशाल पाटील यांच्याकडे आ. मोहनराव कदम, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विलासराव शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, महेंद्र लाड, विक्रम सावंत, गणपती सगरे, प्रा. शिकंदर जमादार, बाळासाहेब होनमोरे आदी संचालक आहेत.

अध्यक्ष-उपाध्यक्षही विभागले
जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात चांगली मैत्री आहे. संचालक मंडळातील संघर्ष पेटला असतानाही हे दोन्ही पदाधिकारी एकमेकांना साथ देत होते. लोकसभा निवडणुकीत दोघेही विभागले गेले आहेत. देशमुख भाजपच्या बाजूने मैदानात असून, दिलीपतात्या पाटील कॉँग्रेस-राष्टÑवादी-स्वाभिमानी आघाडीच्या बाजूने आहेत.
महायुतीपेक्षा महाआघाडीचे बाहुबल अधिक
जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात महायुतीपेक्षा आघाडीचे बाहुबल अधिक आहे. एकूण संचालकांपैकी ५७ टक्के संचालक आघाडीकडे, ३८ टक्के महायुतीकडे, तर पाच टक्के म्हणजेच एक संचालक तटस्थ दिसून येतो.

Web Title: District Bank at the center of Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.