सांगली : जिल्ह्यातील चार खासगी आणि बारा सहकारी अशा १६ साखर कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधित ५० लाख टन उसाचे गाळप केले असून, आजअखेर (शुक्रवार) ५८ लाख क्विंटल साखर पोती तयार झाली आहेत. दुष्काळी पट्ट्यातील काही साखर कारखान्यांनी वजन झाल्यानंतर जाग्यावर पैसे देऊन (काटापेमेंट) मिरज, तासगाव तालुक्यातील ऊस तोडीला प्राधान्य दिल्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासदांच्या उसाला तुरे आहेत. शिल्लक सर्व ऊस गाळपाचे कारखाना प्रशासनासमोर मोठे आव्हान सध्या तरी दिसत आहे.
दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर, मिरज पूर्वभागामध्ये म्हैसाळ, टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचल्यामुळे तेथे उसाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात ७४ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी क्षेत्र वाढले आहे. यातच साखर कारखान्यांनी ऊसदराचा तिढा सुटला नसल्यामुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाले आहेत. तासगाव, निनाईदेवी (दालमिया शुगर) कारखान्यांचे गळीत हंगाम बंद आहेत. तसेच वसंतदादा कारखानाही पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे जिल्ह्यातील उसाचे वेळेत गळीत होणार का? याविषयी शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. १६ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५० लाख ३४ हजार ८९ टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून ५८ लाख क्विंटल साखर पोती तयार झाली आहेत.
आतापर्यंत ४० हजार हेक्टरपर्यंत उसाच्या तोड झाल्याचा कारखाना प्रशासनाचा अंदाज आहे. येत्या दोन महिन्यांत ३४ हेक्टर क्षेत्रावरील ऊस तोडण्याचे कारखाना प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. हा अंदाज घेऊनच दुष्काळी भागातील साखर कारखान्यांनी तासगाव, मिरज तालुक्यात शिरकाव करून काटापेमेंट देऊन तोडी सुरू केल्या आहेत. याच काही कारखान्यांनी कर्नाटकातूनही उसाच्या तोडी सुरू केल्या आहेत. काटापेमेंटला कारखानदार प्राधान्य देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उसाला एकरकमी १६०० ते १८०० रुपये दर घेऊन शेतकरी गप्प बसत आहेत. या शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याची गरज नसल्यामुळे कारखानदार काटापेमेंटचा ऊस उचलत आहेत. साखर कारखाने कमी दराचा ऊस उचलण्यास प्राधान्य देत असल्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाला तुरे आले आहेत. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील काही ऊस अठरा महिने झाला तरीही तो गाळपास गेला नाही. यामुळे ऊस वेळेत गाळपाला जाणार की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता आहे. (प्रतिनिधी)