स्मशानातील औषधांतून गरिबाघरचे उपचार; सांगलीच्या प्रमोद महाजन यांचे १८ वर्षांपासून कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:51 PM2018-08-19T23:51:52+5:302018-08-19T23:51:56+5:30

Cure of mortuary treatment through cemeteries; Sangli's Pramod Mahajan has been working for 18 years | स्मशानातील औषधांतून गरिबाघरचे उपचार; सांगलीच्या प्रमोद महाजन यांचे १८ वर्षांपासून कार्य

स्मशानातील औषधांतून गरिबाघरचे उपचार; सांगलीच्या प्रमोद महाजन यांचे १८ वर्षांपासून कार्य

Next

सचित लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की, त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले जातात. त्याचे ज्या खाटावर निधन झाले, तो खाट काढून घेतला जातो. पण त्याची औषधे मात्र स्मशानभूमीत कचरा म्हणून फेकून दिली जातात. हीच औषधे गोळा करून गोरगरिबांच्या उपचारासाठी ती सेवाभावी ट्रस्टला देऊन समाजसेवेचा सेतू बांधण्याचे काम ढवळी (ता. वाळवा) येथील प्रमोद महाजन हे करीत आहे. गेल्या १९ वर्षांपासून त्यांचे हे कार्य अखंडितपणे सुरु आहे.
स्मशानभूमीतून गोळा केलेल्या या चांगल्या औषधांचा उपयोग गोरगरिबांना व्हावा, या हेतूने ही औषधे कुंभोज (ता. हातकणंगले) येथील जगवल्लभ पार्श्वनाथ सेवा संघाच्या रुग्णालयास ते देत आहेत. वयाची पन्नाशी पार केलेले प्रमोद महाजन यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. मुंबईत एसटी बसवर वाहक म्हणून, तसेच सातारा येथे एका कंपनीत सुपरवायझर म्हणून त्यांनी काम केले. पण या दोन्ही नोकरीत मन न रमल्याने त्यांनी गावाकडे येऊन शेती केली. गावातील त्यांचा एक मित्र लष्करात जवान होता. त्याची एक किडनी खराब झाली होती. या मित्रास महाजन यांनी स्वत:ची एक कडनी दान केली. एकदा का दवाखाना मागे लागला, की त्या कुटुंबाचे काय हाल होतात, हे त्यांनी जवळून पाहिले आहे. गोरगरिबांना तर हजार-पाचशे रुपयांची औषधे खरेदी करण्यासही पैसे नसतात. हा विचार करुन त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेऊन गोरगरीब रुग्णांची सेवा सुरु केली.
महाजन एक दिवस गावातील एका मृत व्यक्तीच्या रक्षाविसर्जनास गेले होते. तिथे मृतांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात औषधे फेकून दिलेली त्यांना दिसून आली. त्या औषधांची त्यांनी तपासणी केली. त्यावेळी सर्व औषधे चांगली असल्याचे दिसून आले. तेव्हापासून त्यांनी स्मशानभूमीत मृतांची उर्वरित फेकून दिलेली औषधे गोळा करण्याचे कार्य सुरु केले. जी औषधे पॅकबंद आहेत, तीच ते गोळा करतात. पातळ औषधाची बाटली फोडलेली असेल, तर ते त्यामधील औषध फळझाडांना घालतात. पॅकबंद बाटली असेल तरच घेतात.
ही सर्व औषधे संकलित करुन ते महिन्यातून एकदा कुंभोजच्या जगवल्लभ पार्श्वनाथ सेवा संघाच्या रुग्णालयास नेऊन दान करतात. महिन्याला १५ ते २० हजाराची औषधे गोळा होतात. महाजन हे गावात ‘दादा’ नावाने प्रसिद्ध आहे.
निधनाची पहिली खबर : महाजनांना
सध्या गावात कोणाचेही निधन झाले की, ‘दादा कुठे आहे’, असे म्हणून पहिली खबर महाजन यांना दिली जाते. महाजन लगेचच संबंधित मृत व्यक्तीच्या अंत्यविधीच्या कार्यात सहभागी होतात. स्मशानात सरण रचण्यापासून ते मृतदेह पूर्णपणे दहन होईपर्यंत ते तेथे थांबतात. त्यांचे हे कार्य पाहून ग्रामस्थ एखाद्या घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर, त्या व्यक्तीची राहिलेली औषधे महाजन यांना घरी बोलावून देत आहेत. पण अजूनही काहीजण स्मशानातच औषधे फेकून देतात. ती गोळा करण्याचे महाजन यांचे कार्य अद्यापही सुरूच आहे. याशिवाय देहदान व अवयव दान चळवळ समाजात रुजविण्यासाठीही ते प्रबोधन करीत आहेत. स्वत: त्यांनी देहदान व अवयव दानाचा संकल्प केला आहे.
शेतात मजुरी करून बनविली लोखंडी तिरडी
गावात कोणाचे निधन झाले तर तिरडी बांधण्यासाठी बांबू व चिवाट्या मिळत नसत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असे. ही बाब लक्षात येताच महाजन व त्यांच्या पत्नीने दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजुरी केली. त्यातून दीड हजार रुपये मजुरी मिळाली. या रकमेतून महाजन यांनी लोखंडी तिरडी बनवून घेतली व ती ग्रामपंचायतीस दान केली. आजही गावात महाजन यांनी दिलेल्या तिरडीवरूनच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जातो.

Web Title: Cure of mortuary treatment through cemeteries; Sangli's Pramod Mahajan has been working for 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.