बावडेकर, केळकर यांचे नगरसेवकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:04 AM2017-07-19T00:04:47+5:302017-07-19T00:04:47+5:30

बावडेकर, केळकरयांचे नगरसेवकपद रद्द

Bawdekar, Kelkar's cancellation of corporation term | बावडेकर, केळकर यांचे नगरसेवकपद रद्द

बावडेकर, केळकर यांचे नगरसेवकपद रद्द

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेतील भाजपशी संबंधित नगरसेवक युवराज बावडेकर व स्वरदा केळकर या दोघांचे नगरसेवक पद तीन वर्षासाठी रद्द करण्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी मंगळवारी दिले. याबाबत स्वाभिमानी विकास आघाडीचे माजी गटनेते शिवराज बोळाज यांनी दोन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याबाबत याचिका दाखल केली होती. स्वाभिमानी आघाडीचे वकील अमोल चिमाण्णा यांनी ही माहिती दिली.
स्वाभिमानी आघाडीत शिवसेना, भाजप, मनसे, जनता दल व अपक्ष अशा अकरा नगरसेवकांचा समावेश आहे. महापालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वाभिमानी आघाडीला स्वतंत्र गट म्हणून विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळाली होती. वर्षभरातच स्वाभिमानी आघाडीची शकले झाली असून, या आघाडीतील तीन नगरसेवकांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. आघाडीची सूत्रे शिवसेनेचे गौतम पवार व गटनेते शिवराज बोळाज यांच्याकडे आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान स्वाभिमानीच्या नगरसेवकांत फूट पडली होती. त्यानंतर शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्षही आघाडीत सुरू झाला होता.
गतवर्षी स्थायी समिती सदस्य निवडीवेळी भाजपचे युवराज बावडेकर व स्वरदा केळकर यांनी तत्कालीन गटनेते शिवराज बोळाज यांच्याविरूद्ध भूमिका घेतली होती. स्वाभिमानीची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केल्याने या गटाच्या दोन जागा रिक्त ठेवाव्यात, असा आग्रह त्यांनी महासभेत धरला होता. त्यामुळे स्वाभिमानी आघाडीला धक्का बसला. अखेर स्वाभिमानी आघाडीला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाच्या आदेशानंतर स्थायी समितीच्या निवडी झाल्या होत्या.
या घडामोडीनंतर स्वाभिमानी आघाडीने बावडेकर व केळकर यांचे नगरसेवक पद अपात्र ठरवावे, यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. यात युवराज बावडेकर यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी गटनेता व स्थायी समितीतील एक जागा देण्याची मागणी केली होती. बावडेकर यांची मागणी पक्षविरोधी आहे, यासंदर्भात महापालिका अधिनियम, उच्च व सर्वोच्च न्यायालयातील निकालाचे दाखले देत, त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी बोळाज यांनी केली होती. तसेच स्वरदा केळकर यांनी स्थायी सदस्य निवडीवेळी गटनेत्यांना आव्हान दिले. गटनेत्यांनी दिलेल्या नावाला आक्षेप घेतला. ही कृतीही पक्षविरोधी असल्याचे बोळाज यांनी याचिकेत म्हटले होते.
त्यावर विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी सुरू होती. तत्कालीन विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी झाली. त्यानंतर विद्यमान विभागीय आयुक्त दळवी यांच्यासमोरही सुनावणी झाली. दळवी यांनी या दोन्ही नगरसेवकांना तीन वर्षासाठी अपात्र ठरविण्यात आल्याचे स्वाभिमानी आघाडीचे वकील अ‍ॅड. चिम्माण्णा यांनी सांगितले. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
प्रशासनाला अद्याप आदेश नाहीत
१ युवराज बावडेकर व स्वरदा केळकर यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचे स्वाभिमानी विकास आघाडीचे वकील अमोल चिमाण्णा यांनी सांगितले. याबाबत महापालिका प्रशासनाला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सायंकाळपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नव्हते.
२ तसेच बावडेकर व केळकर यांनाही कारवाईची माहिती नव्हती. त्यांनीही कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे सांगितले. याबाबत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा दूरध्वनी व्यस्त होता.
योग्य तिथे दाद मागू : युवराज बावडेकर
नगरसेवक पद अपात्र ठरविण्यात आल्याचे समजले असले तरी, अद्याप विभागीय आयुक्तांचा आदेश हाती आलेला नाही. विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत आल्यानंतर योग्य त्या ठिकाणी दाद मागू. न्यायालयात जाऊन याविरोधात याचिका दाखल करू. तिथे आम्हाला निश्चित न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया युवराज बावडेकर यांनी दिली. तसेच स्वरदा केळकर म्हणाल्या की, असा कोणताही आदेश आम्हाला प्राप्त झालेला नाही.

Web Title: Bawdekar, Kelkar's cancellation of corporation term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.