Sangli: आटपाडीत सिनेस्टाईल हत्यारासह टोळक्याची दहशत

By अशोक डोंबाळे | Published: April 4, 2024 06:34 PM2024-04-04T18:34:29+5:302024-04-04T18:35:38+5:30

शहरात भीतीचे वातावरण : पोलिसांचा वचक नसल्याचे स्पष्ट

A gangland horror with cinestyle weaponry in Sangli | Sangli: आटपाडीत सिनेस्टाईल हत्यारासह टोळक्याची दहशत

Sangli: आटपाडीत सिनेस्टाईल हत्यारासह टोळक्याची दहशत

आटपाडी : आटपाडी शहरामध्ये मागील दोन दिवसांपूर्वी चारचाकी गाडी अडवून एका युवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा बदला घेण्यासाठीच मंगळवारी रात्री एका गावातून दोन आलिशान चारचाकीतून आलेल्या सशस्त्र टोळक्याने या युवकावर शोधण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याचा प्रयत्न झाला. हत्यारांसह टाेळके पाहून थरारक घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचा फाळकूट दादांवर वचक नसल्याचे दिसून येत आहे.

आटपाडी बसस्थानक परिसरात मंगळवारी रात्री दहशतीचा थरार नागरिकांनी अनुभवला. मात्र हल्ला होणार असल्याच्या शक्यतेने युवकांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केल्याने मोठा अनर्थ टळला. बसस्थानक परिसरात वादाच्या घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थी बसने ये-जा करत असतात. येथे टवाळखोर युवक सातत्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. काही दुकानदार त्यांना आश्रय देत असल्याने त्यांचे फावले आहे.

काही दिवसांपूर्वीच बाजारपेठेतील रस्त्याच्या कामावरून कामगारांना मारहाण झाली होती. त्यानंतर टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. शाळा, कॉलेजच्या मुली, महिलांना खेटून दुचाकी चालविणे, वेगाने गाडी पळवणे, अश्लील हावभाव करणे, अश्लील भाषा वापरणे असे प्रकार घडतात. पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. बसस्थानक परिसरासह शहरातील सर्वच मुख्य चौकात अशा टवाळखोरांचा त्रास होत आहे.

टोळीचा थरार अनुभवला

बसस्थानकासमोरील एका मोबाइलच्या दुकानामध्ये बसणाऱ्या टोळीचा शोध घेत आलेल्या तरुणांनी तिघांवर प्राणघातक हल्ल्याची तयारी केली होती. सुदैवाने याची चाहूल लागताच तिघा तरुणांनी पलायन केले. याची माहिती आटपाडी पोलिसांना मिळाल्याने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी टोळके वाहनासह पसार झाले.

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज

आटपाडीत गेल्या काही महिन्यांपासून टवाळखोरांची दहशत वाढू लागली आहे. महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत दादागिरी करत असल्याने महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पोलिसांनी वाहतूक शाखेच्या माध्यमातून जरब बसवण्याची गरज आहे. टवाळखोरांचा बंदोबस्त न केल्यास आटपाडी शहरात दहशतीचे राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: A gangland horror with cinestyle weaponry in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.