कुपवाड एमआयडीसीत बोगस खत कारखान्यांवर छापे ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:29 AM2017-11-19T01:29:45+5:302017-11-19T01:32:18+5:30

कुपवाड : कृषी विभागाच्या भरारी पथकाने कुपवाड एमआयडीसीतील मायक्रोलॅब व भाटिया भूमिपुतर ट्रेडको या दोन बोगस खत कारखान्यांवर छापा टाकून ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 48 lakhs of ransom seized in Kupwara MIDC on bogus fertilizer factories | कुपवाड एमआयडीसीत बोगस खत कारखान्यांवर छापे ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुपवाड एमआयडीसीत बोगस खत कारखान्यांवर छापे ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देदोन विनापरवाना उत्पादकांवर भरारीपथकाची कारवाईखताचे नमुने तपासणीसाठी

कुपवाड : कृषी विभागाच्या भरारी पथकाने कुपवाड एमआयडीसीतील मायक्रोलॅब व भाटिया भूमिपुतर ट्रेडको या दोन बोगस खत कारखान्यांवर छापा टाकून ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी मायक्रोलॅबचे संचालक साहील अरुण कोठारी आणि भूमिपुतर ट्रेडकोचे संचालक जसपाल सतपाल भाटिया यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस ही कारवाई करण्यात आली.

बोगस खतनिर्मिती रोखण्यासाठी राज्यभर कारवाई सुरू आहे. कुपवाड एमआयडीसीमधील काही कारखान्यांमध्ये विनापरवाना खतनिमिती सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. साहिल कोठारी (रा. सांगली) यांचा मायक्रोलॅब (प्लॉट नं. जी १/ बी) हा खत निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात तीन वर्षांपासून सेंद्रीय खत निर्मिती, विक्री व साठवणूक केली जात होती. याबाबतची तक्रार आली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास छापा टाकण्यात आला. कारखान्याकडे खत निर्मिती, विक्री व साठवणुकीचा परवाना नसल्याचे आढळून आले. तेथे सिलिकॉन खताच्या ५० किलोच्या २४० पिशव्या, मिश्र खताच्या १६० पिशव्या, सेंद्रीय दाणेदार खताच्या ४०९ पिशव्या, निम आॅरगॅनिकच्या ६५ पिशव्या, सेंद्रीय खताच्या २१० पिशव्या यासह दोन मालवाहतूक करणारी वाहने (ट्रक : क्र. एमएच ०४ सीए २६३४ आणि टेम्पो : क्र. एमएच १० एडब्ल्यू ७५८१) असा एकूण २० लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कंपनीतील खताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

एमआयडीसीत प्रणव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या आवारात भाड्याने घेतलेल्या गोदामात दोन वर्षांपासून जसपाल सतपाल भाटिया यांचा भाटिया भूमीपुतर ट्रेडको हा खत कारखाना सुरू आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता या कारखान्यात छापा टाकण्यात आला. येथे सँड सिलिकॉनपासून सिलिकॉनच्या विविध खतांची निर्मिती व साठवणूक केली जाते. मात्र, त्यांच्याकडे या खत उत्पादन आणि विक्रीला कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता नसल्याचे आढळून आले. कृषी विभागाने तेथून सिलिकॉन व सेकंडरी खताची ३४८१ पोती (१६३.१७ टन) असा २७ लाख ८३ हजारांचा खताचा साठा जप्त केला. कारखान्यातील खतांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

कारवाईत पुणे कृषी विभागाचे उपसंचालक के. बी. डेरे, तंत्र अधिकारी बी. सी. मोरे व किरण जाधव यांच्यासह जिल्हा कृषी विभागाचे विकास अधिकारी विवेक कुंभार, मोहीम अधिकारी डी. एम. पाटील, गुण नियंत्रण अधिकारी डी. एस. शिंगे यांच्यासह कुपवाड पोलिस ठाण्यातील हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे सहभागी झाले होते. याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक अशोक कदम तपास करीत आहेत.

कुपवाड एमआयडीसीतील भाटिया भूमिपुतर ट्रेडको खत कारखान्यावर छापा टाकण्यात आला. दुसºया छायाचित्रात मायक्रोलॅब कारखान्याची इमारत.

Web Title:  48 lakhs of ransom seized in Kupwara MIDC on bogus fertilizer factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.