लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : तालुक्यातील सिद्धेवाडी येथील पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने २१ लाख ६६ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोलपंप चालक दिना अतुल सोटा (वय ५४, रा. वसई, जि. ठाणे) यांनी याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दिना सोटा यांचा मिरज-पंढरपूर रस्त्यावर सिद्धेवाडी येथे इंडियन आॅईल कंपनीचा पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपावर प्रकाश राधेकांत पांडे (रा. उल्हासनगर, ठाणे) हा व्यवस्थापक म्हणून काम करीत होता.
पेट्रोलपंपावरील आर्थिक व्यवहाराची जबाबदारी प्रकाश पांडे याच्याकडे विश्वासाने सोपविली होती. पांडे याने मार्चपासून सहा महिन्यांच्या कालावधीत इंडियन आॅईल कंपनीकडून पेट्रोल व डिझेल घेऊन पंपावर त्याची विक्री केली. पेट्रोल, डिझेल विक्रीपासून आलेले १९ लाख ५१ हजार रुपये बँक खात्यावर न भरता त्याचा परस्पर अपहार केला.
सांगली व वडगाव येथील पंपांवरुन पांडे याने रक्कम घेतली. याशिवाय सोटा यांनी सही करून दिलेल्या धनादेशाचा वापर करुन पांडे याने मिरजेतील स्टेट बँकेतून २ लाख १५ हजार रुपये काढून घेतले. हिशेबात गोंधळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर पांडे याने हात वर केले. याबाबत दिना सोटा यांच्या तक्रारीवरून प्रकाश पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी पांडे यास अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.