होय! मुलांची मानसिकता बदलते आहे, स्पर्धा परीक्षांना वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:48 PM2018-07-09T15:48:53+5:302018-07-09T15:53:51+5:30

आजवर स्पर्धा परीक्षांमध्ये रत्नागिरीतील तरूणांचा सहभाग कमी होता. मात्र, आता तो वाढू लागला आहे. त्याबाबत आता विद्यार्थी सकारात्मक आहेत आणि पालकही.

Yes! Children's mentality is changing, increasing response to competitive examinations | होय! मुलांची मानसिकता बदलते आहे, स्पर्धा परीक्षांना वाढता प्रतिसाद

होय! मुलांची मानसिकता बदलते आहे, स्पर्धा परीक्षांना वाढता प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देहोय! मुलांची मानसिकता बदलते आहे, स्पर्धा परीक्षांना वाढता प्रतिसादरत्नागिरीतील विद्यार्थी, पालक परीक्षांबाबत होत आहेत सकारात्मक

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण रत्नागिरीतील संकेत देवळेकर या तरूणाची राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती... रिझवाना ककेरी झाली रत्नागिरीतील पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक... गेल्या महिन्यातील या दोन घटनांनी रत्नागिरीला अभिमान मिळवून दिला आणि प्रकर्षाने पुढे आली ती तरूणांची आणि पालकांची विचारांची बदललेली दिशा.

आजवर स्पर्धा परीक्षांमध्ये रत्नागिरीतील तरूणांचा सहभाग कमी होता. मात्र, आता तो वाढू लागला आहे. त्याबाबत आता विद्यार्थी सकारात्मक आहेत आणि पालकही.

कोकणात बुद्धिमत्ता असूनही कोकणातील तरूण स्पर्धा परीक्षांच्या वाट्याला जात नव्हते. टक्केवारीत वरच्या स्तरावर असलेली आणि स्पर्धा परीक्षांचे ध्येय बाळगणारी मुले शिक्षणासाठी बाहेरगावी जात होती. अजूनही जात आहेत. मात्र रत्नागिरीत राहूनच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचे प्रमाण अल्प होते. आता त्यात बदल होत आहे.

अरूअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीसारख्या काही संस्थांनी मार्गदर्शन केंद्रांवर भर दिला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे.

स्पर्धा परीक्षा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि लोकसेवा आयोग, हीच बहुतांकांची संकल्पना. फार तर बँकांच्या परीक्षा. पण त्याहीपलिकडे असंख्य परीक्षा देऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळवता येऊ शकते, याची कल्पना तरूणांना नसते.

त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या वाट्याला फारजण जात नाहीत, असा रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांचा अनुभव. मात्र आता त्यात बदल होऊ लागला आहे. विद्यार्थी - पालक दोघांमध्येही हा बदल दिसत आहे. रत्नागिरीतच राहून परीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली आहे.
 

रत्नागिरीतील मुलांमध्ये बुद्धीमत्ता आहे. मात्र, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि ध्येयाने एखादी गोष्ट करण्याची तयारी कमी पडते. फक्त लिपिक पदासाठीच्या परीक्षा देण्यापेक्षा मुलांनी अधिकारी पदाच्या परीक्षांवर भर द्यायला हवा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता त्याला यशही येऊ लागले आहे.
- अ‍ॅड. इंदुमती मलुष्टे
समन्वयक, अरूआप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी


भारंभार पुस्तकं वाचणे, फक्त पाठांतर करणे यापेक्षा प्रश्नपत्रिका नेमकी कशी असते, कुठल्या पुस्तकांआधारे प्रश्न येतात, याचा विचार करून नेमकेपणाने अभ्यास करायला हवा. मी शाळेत होतो, तेव्हापासूनच काही गोष्टी मनाशी ठाम होत्या. चार भिंतींमध्ये महिलांना होणारी मारहाण, महिलांवरील अत्याचार याविषयीची चीड लहानपणापासून होती. त्यामुळे युनिफॉर्मवाली पोस्ट मिळवणे ही खूप काळ मनात रूजलेली गोष्ट होती. त्यादृष्टीनेच मी पहिल्यापासून प्रयत्न केले आणि मला युनिफॉर्म मिळवण्यात यश आले. माझ्याबाबत माझे बाबा नथुराम देवळेकर, आई नीता, मावशी सुनीता सावर्डेकर, काका महादेव सावर्डेकर आणि सुनील आडिवरेकर यांनी या परीक्षेसाठी सर्व प्रकारचा पाठिंबा दिला. त्यामुळेच माझा मार्ग सुकर झाला.
- संकेत देवळेकर,
राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक



परिस्थिती गरिबीची असतानाही आई-वडील आपल्याला शिकवत आहेत तर त्यांच्या कष्टाचं चीज व्हायला पाहिजे, असं शाळेत असल्यापासूनच वाटायचं. तेव्हाच ठरवलं होतं, आपण अधिकारी व्हायचं. कॉलेजला गेल्यापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरूवातीला कोणीही सोबत नव्हतं. अभ्यास काय करायचा, कसा करायचा, कुठली पुस्तकं वाचायची, याबाबत कसलीच माहिती नव्हती. मात्र, स्वत:च त्याबाबतची माहिती घेत घेत मी शिकत गेले. त्यादरम्यान ज्या काही कार्यशाळा झाल्या त्या चुकवल्या नाहीत. १२-१३ तास अभ्यास करायची सवय लावून घेतली. त्यामुळे हे ध्येय गाठता आलं. अधिकाधिक मुलं स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. मुळात आपल्याला काय व्हायचंय, हे ध्येय निश्चित करून घ्यायला हवं आणि त्यानंतर त्यासाठी तेवढाच अभ्यास करायला हवा.
- रिझवाना ककेरी,
पोलीस उपनिरीक्षक


३८ मुले नोकऱ्यांमध्ये

गेल्या चार वर्षात रत्नागिरीतील १५00हून अधिक मुलांनी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला आहे. त्यातील ३८ मुले वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीत रूजू झाली आहेत. सद्यस्थितीत ही टक्केवारी खूप मोठी वाटत नसली तरी ही चांगली सुरूवात आहे. त्यातून पुढच्या मुलांना सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. आता अशा परीक्षांचे महत्त्व मुलांना कळू लागले आहे. त्यामुळे ही टक्केवारी येत्या दोन वर्षात खूप वाढेल, असा विश्वास अ‍ॅड. इंदुमती मलुष्टे यांनी व्यक्त केला.

वर्षभरात महाभरती

राज्य सरकारने २०१९पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन महाभरतीचे नियोजन सुरू केले आहे. तसा शासन निर्णयही जाहीर झाला आहे. या मोहिमेमध्ये यंदा आणि पुढील वर्षी मिळून राज्यात विविध खात्यांमध्ये ६० ते ७० हजार इतकी पदे भरली जातील. त्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एकच मार्ग आहे.

नगर परिषदा, महिला बालकल्याण यासह सर्वच खात्यांमधील रिक्त होणाºया पदांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य वेळेतच स्पर्धा परीक्षेकडे वळावे, असे मत अ‍ॅड. इंदुमती मलुष्टे यांनी व्यक्त केले.

आॅनलाईन प्रक्रियेमुळे विश्वासार्हता

स्पर्धा परीक्षांबाबत विशेषत: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत काही वर्षे संभ्रमाची स्थिती होती. तक्रार केली तर त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. योग्य माहिती मिळत नव्हती. मात्र, आता सर्व प्रक्रिया आॅनलाईन असल्यामुळे ती अधिक सुकर झाली आहे. विश्वासार्ह झाली आहे. या परीक्षांकडे विद्यार्थी वळण्यामध्ये हे एक महत्त्वाचे कारण आहे.

Web Title: Yes! Children's mentality is changing, increasing response to competitive examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.