गणेशोत्सवात वेळापत्रक कोलमडले : पावसाची कृपा असूनही गाड्या विलंबाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:30 PM2018-09-17T14:30:27+5:302018-09-17T14:33:15+5:30

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भक्तांचे हाल होत आहेत. उत्सव काळातील गाड्यांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी करूनही गणेश चतुर्थीपासून चौथ्या दिवसापर्यंत मार्गावरील वाहतूककोंडी कायम आहे.

The schedule collapsed in Ganesh Festival: Despite the grace of the trains, the trains are delayed | गणेशोत्सवात वेळापत्रक कोलमडले : पावसाची कृपा असूनही गाड्या विलंबाने

गणेशोत्सवात वेळापत्रक कोलमडले : पावसाची कृपा असूनही गाड्या विलंबाने

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवात वेळापत्रक कोलमडले : कोकण रेल्वेची वाहतूककोंडी पावसाची कृपा असूनही गाड्या विलंबाने

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भक्तांचे हाल होत आहेत. उत्सव काळातील गाड्यांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी करूनही गणेश चतुर्थीपासून चौथ्या दिवसापर्यंत मार्गावरील वाहतूककोंडी कायम आहे.

विशेष गाड्या मूळ ठिकाणाहून निर्धारित वेळेपेक्षा दोन ते तीन तास उशिराने सुटत आहेत. त्या मधल्या स्थानकांवर पुन्हा दोन-दोन तास उभ्या करून ठेवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेचे नियोजन हे गेल्या चार महिन्यांपासून सुरू होते. गेल्या महिनाभरात तर नियोजनाच्याच बातम्या सातत्याने दिल्या जात होत्या. गतवर्षी गणेशोत्सव काळात २५० फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, गतवर्षी अधिक गाड्या सोडल्यामुळे एकेरी मार्गावरून गाड्यांना क्रॉसिंग करताना खूप वेळ गेला.परिणामी मार्गावर वाहतूककोंडी झाली व वेळापत्रक बिघडले, असे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर २०१८मधील गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे व्यवस्थापनाकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. गाड्यांची संख्या कमी करून यंदा वाहतूककोंडी टाळता येईल, असा कोकण रेल्वेचा दावा होता. त्यानुसार यंदा उत्सव काळात २०५ फेऱ्याच सोडण्याचे ठरले.

या गाड्यांच्या बोगींची संख्या वाढविण्यात आली. मात्र, गाड्यांची संख्या कमी करून मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या काही सुटली नाही. परंतु, रेल्वेची वाहतूक सुरक्षित असल्याच्या चांगल्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.

अर्धा ते चार तासांचा विलंब

काही लांबपल्ल्याच्या गाड्या रविवारी २ ते ४ तास विलंबाने धावत होत्या. रविवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या रेल्वे वेळापत्रकाचा आढावा घेतला असता, ०१००२ सावंतवाडी-सीएसटीएम विशेष गाडी ३१ मिनिटे उशिराने धावत होती. ०१०३५ पनवेल-सावंतवाडी ही विशेष गाडी ५४ मिनिटे उशिराने धावत होती. ०१४५० रत्नागिरी-पुणे स्पेशल १ तास १४ मिनिटे, जेबीपी-सीबीई-एसएफ स्पेशल ३ तास ५१ मिनिटे, १०१०४ मांडवी एक्सप्रेस ४१ मिनिटे, १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २ तास ५४ मिनिटे, १२६१८ मंगला लक्षदीप एक्सप्रेस १ तास ४ मिनिटे, ५०१०५ दिवा-सावंतवाडी पॅसेंजर २ तास ४६ मिनिटे तर अन्य गाड्या अर्धा ते पाऊणतास उशिराने धावत होत्या.

स्पेशलचे सर्वकाही स्पेशल!

गणेशोत्सव स्पेशल म्हणून ज्या गाड्या धावत आहेत, त्यांना वेळापत्रक नसल्याचे दिसत आहे. या गाड्या २ ते ४ तास उशिराने सोडल्या जात आहेत. त्यात काही स्थानकांवर स्पेशल गाड्या साईड ट्रॅकवर २ ते ३ तास उभ्या करून ठेवल्या जात आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजता निघालेली अहमदाबाद एक्सप्रेस गणेशोत्सव स्पेशल गाडी ८.३० वाजता निवसर स्थानकात आली. त्यानंतर २ तास गाडी तेथेच उभी होती.

रिक्षाचालकांकडून लूट

गाड्या उशिरा धावत असल्याने त्याचा रिक्षाचालकांना मोठा फायदा होत आहे. मुंबईतून रेल्वेने प्रवास करण्यासाठी जेवढा खर्च येत नाही, त्यापेक्षा कितीतरीपट जास्त खर्च रिक्षाभाड्यासाठी होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

गावी जाताना मोठा त्रास

रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी गाडीच्या शौचालयांमध्ये बसून प्रवास करीत आहेत. सणाच्या दिवसांत रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडल्याने त्याचा परिणाम गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला आहे. त्यामुळे गाड्या दोन-चार तास उशिराने धावत आहेत. गाड्या वेळेवर नसल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत राहावे लागते. गाड्या उशिरा दाखल होत असल्याने ग्रामीण भागात जाणाºया मुंबईकरांना गावी जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: The schedule collapsed in Ganesh Festival: Despite the grace of the trains, the trains are delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.