रत्नागिरी : पाच एकरवर फुलली केळीची बाग, धामणीतील शेतकऱ्यांचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:32 AM2018-04-06T11:32:34+5:302018-04-06T11:32:34+5:30

पेम संस्थेचे सतीश कामत यांनी धामणीतील गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळेच या गावातील शेतकऱ्यांनी काजूची १५० झाडे लावली असून, पाच एकर क्षेत्रावर केळीची बाग फुलविली आहे. याशिवाय काही क्षेत्रात पालेभाज्या व अन्य भाज्या तसेच कलिंगडाचे पीकही घेत आहेत.

Ratnagiri: Use of five acres of banana plant, banana plantation | रत्नागिरी : पाच एकरवर फुलली केळीची बाग, धामणीतील शेतकऱ्यांचा प्रयोग

रत्नागिरी : पाच एकरवर फुलली केळीची बाग, धामणीतील शेतकऱ्यांचा प्रयोग

googlenewsNext
ठळक मुद्देपाच एकरवर फुलली केळीची बागधामणीतील शेतकऱ्यांचा प्रयोगसमूह गटाचा झाला साऱ्यांना फायदा

रत्नागिरी : महिलांचा बचत गट असतो, मग पुरूषांचा बचत गट का असू नये, या संकल्पनेतूनच श्री गणेश शेतकरी उत्पादक गट, धामणीची स्थापना करण्यात आली. गटातर्फे समूहशेती करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी पेम संस्थेचे सतीश कामत यांनी धामणीतील गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळेच या गावातील शेतकऱ्यांनी काजूची १५० झाडे लावली असून, पाच एकर क्षेत्रावर केळीची बाग फुलविली आहे. याशिवाय काही क्षेत्रात पालेभाज्या व अन्य भाज्या तसेच कलिंगडाचे पीकही घेत आहेत. त्यांच्या समूहशेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून, आता आणखी दहा एकर जागा पिकाखाली आणण्याचा निर्धार केला आहे.

कोकणातील शेती तुकड्यामध्ये विभागली गेली आहे. भातवगळता उर्वरित दिवसात जमीन पडिक असते. त्यामुळे काही मंडळी रोजगारासाठी शहराकडे गेली आहे. समूहशेतीसाठी सुरूवातीला २० ते २१ मंडळी एकत्र आली. त्यांना सतीश कामत यांच्यासह अमोल लोध यांचे सहकार्य मिळत आहे.

सुरूवातीला १५० काजू लावण्यात आल्यानंतर नगदी पिकाची लागवड करण्याचे ठरले. चिपळूण येथील खानविलकर यांची केळीची बाग पाहिल्यानंतर केळी लागवड करण्याचे निश्चित झाले. जळगाव येथून टिश्यू कल्चर जी-९ जातीची रोपे आणण्यात आली. केळी लागवडीसाठी दहा लाखाचा प्रोजेक्ट तयार करण्यात आला. मात्र पैसे कसे उभारावे, हा प्रश्न होता.

शेतकऱ्यांनी स्वत:कडून अडीच लाख गोळा केले. सतीश कामत यांनी पुणे येथील बासुरी फाऊंडेशनकडे संपर्क साधला. फाऊंडेशनने साडेसात लाख देण्याचे ठरविले. त्यामध्ये पाच लाख बिनव्याजी, तर अडीच लाख संस्थेने देणगीस्वरूपात दिले.

गेली तीन वर्षे केळीचे विक्रमी उत्पादन घेण्यात येत असून, केळीसाठी चिपळूण, रत्नागिरीतील स्थानिक विक्रेत्यांकडे विकण्यात आल्यामुळे फायदा झाला. गेल्या तीन वर्षात गटाने बिनव्याजी पाच लाख रूपयांचे कर्ज फेडले आहे.

केळीबरोबर काही क्षेत्रावर भाजीपाला, तर काही क्षेत्रावर कलिंगड लागवड केली आहे. स्थानिक बाजारपेठेतच विक्री होत असल्यामुळे गटाला उत्पादन विक्रीसाठी फारसे श्रम घ्यावे लागले नाहीत. शिवाय उत्पादनाचा दर्जा चांगला असल्यामुळे खपही चांगला होत आहे.

कामाची विभागणी केल्याने ताण येत नाही

बचत गटाची संकल्पना सुचली तरी त्याला मूर्त स्वरूप सतीश कामत यांनी दिले. शेती व पूरक व्यवसाय सुरू करीत असताना ती कशी करावी, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याबाबत सहकार्य लाभलेच, परंतु आर्थिक बळ बासुरी फाऊंडेशनव्दारे मिळवून दिल्यामुळेच गटाच्या सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

गटाने दहा वर्षाच्या भाडेकराराने जागा घेतली असून, केळी उत्पादनाचे यावर्षीचे चौथे वर्ष आहे. कामाची विभागणी केल्यामुळे ताणही येत नाही. शिवाय या गटातील सदस्यांची संख्यादेखील वाढत आहे.
- प्रकाश रांजणे,
माजी सरपंच, धामणी,
ता. संगमेश्वर
 

बासुरी संस्थेची मदत...

एका झाडाला दोन व त्यापेक्षा अधिक मुनवे फुटत असल्यामुळे चांगल्या मुनव्याची लागवड केली जाते. धामणी येथे डोंगरावरील पडिक जागा ओलिताखाली आणली आहे. श्रमदानाने पाणी योजना बनविली असून, त्यासाठी दहा लाख रूपये खर्च झाला. बहुतांश काम श्रमदानाने पूर्ण केले असले तरी ८ लाख रूपये बासुरी संस्थेने शेतकऱ्यांना दिले आहेत.

चारा लागवडीचा संकल्प

पाच एकरच्या जागेत एक हजार चौरसफुटाचा गोठा बांधण्यात आला असून, तीन देशी व तीन संकरित जातीच्या गाई आहेत. जनावरांसाठी बारमाही चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चार एकरवर चारा लागवड करण्याचे ठरविण्यात आले आहे.

गांडूळखत निर्मिती सुरु

नगदी पिकात केळी, हंगामी पिकात भाजीपाला, कलिंगडाची शेती तर त्याला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यसाय सुरू केला आहे. दूध विक्रीबरोबर शेणखत, गोमूत्र विक्री, पालापाचोळ्यापासून गांडूळखत निर्मिती सुरू केली आहे.

दुग्धउत्पादनासाठी डेअरी

समूह गटातील शेतकऱ्यांची संख्या वाढली. लागवडीसाठी जागाही उपलब्ध झाली आहे. दहा एकर अधिक जागा मिळाली आहे. त्या जागेत कडधान्य, भाजीपाला, शिवाय दुग्धउत्पादनासाठी डेअरी उभारण्याचे ठरविले आहे.

Web Title: Ratnagiri: Use of five acres of banana plant, banana plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.