रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प लादल्याचा राजापूरच्या आमसभेत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:50 PM2018-04-13T16:50:30+5:302018-04-13T16:50:30+5:30

विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला.

Ratnagiri: Prohibition of refinery project in Rajapur Sabha | रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प लादल्याचा राजापूरच्या आमसभेत निषेध

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प लादल्याचा राजापूरच्या आमसभेत निषेध

Next
ठळक मुद्देघरकुलाच्या निकषात बदल करण्याची संजय सुतार यांनी केली मागणीग्रामीण भागात जाणाऱ्या काही बंद गाड्या पूर्ववत सुरु करण्याची मागणीअपुरे असलेले वायरमन, गंजलेले वीजखांब, वाढीव वीजबिलांबाबत मुद्दा उपस्थित.

राजापूर : विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला.

गुरुवारी येथील श्री मंगल कार्यालयात राजापूर पंचायत समितीची आमसभा पार पडली. सभेच्या प्रारंभी नाणार परिसरातील जनतेचा प्रचंड विरोध असतानादेखील शासनाने रिफायनरी प्रकल्प लादल्याने याचा जोरदार निषेध करण्यात आला.

तालुक्यातील महावितरणच्या समस्या या सभेत मांडण्यात आल्या. त्यामध्ये अपुरे असलेले वायरमन, गंजलेले वीजखांब, वाढीव वीजबिले याविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यातील उन्हाळे हे गाव पर्यटन क्षेत्रात येते. मात्र, तेथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून अनेक कलमांच्या बागा बेचिराख झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याबाबत यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले.

यावेळी उपस्थित जनतेने तलाठ्यांच्या कामाबाबत तक्रारी मांडल्या. तलाठी भेटत नसल्याने कामे होत नाहीत, तसेच वेळेवर सातबारे उतारे मिळत नाहीत. वर्ष उलटले तरी साध्या नोंदी तलाठी घालत नाहीत, या मुद्द्यावरुन तलाठ्यांच्या कामाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.

येथील तलाठी हे साक्षात जिल्हाधिकारी असल्याच्या थाटात वावरतात, असे आरोप जनतेकडून करण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतही यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तालुक्यात अनेकांना शौचालये बांधायला सांगण्यात आले. परंतु, त्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्याची गंभीर बाब यावेळी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देण्यात आली.

जर लोकांना वेळेवर पैसे दिले नसतील तर हा तालुका हागणदारीमुक्त कसा काय झाला? असा प्रश्न दीपक बेंद्रे यांनी केला. रमाई घरकुल योजनेंतर्गत मागास महिलेला घरकुल मंजूर झाले असेल व ती ७० वर्षांची असेल तर तिला जातीचा दाखला काढताना अडचणी येतात. अशा महिलेला घरकुलाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे घरकुलांबाबतच्या निकषात बदल व्हावेत, अशी मागणी मूरचे सरपंच संजय सुतार यांनी केली.

यावर आपण योग्य ती माहिती घेऊन कार्यवाही करु, असे आश्वासन आमदार राजन साळवी यांनी दिले. ग्रामीण भागात जाणाऱ्या काही गाड्या बंद आहेत, त्या पूर्ववत सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 

Web Title: Ratnagiri: Prohibition of refinery project in Rajapur Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.