रत्नागिरी : कष्टाला मार्केटिंगची जोड : सोलापूरचे कांदाव्यापारी रत्नागिरीत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 04:45 PM2018-05-31T16:45:53+5:302018-05-31T16:45:53+5:30

शेतीच्या बांधावर आयुष्य काढणाऱ्या या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याची पाळेमुळे रत्नागिरीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचली आहेत. गेली पाच वर्षे सोलापुरातील शेतकरी थेट रत्नागिरीत येऊन कांदा विक्री करत आहेत. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे हे शेतकरी समाधानाने सांगतात.

Ratnagiri: Marketing connectivity to the labor: Onion merchandise of Solapur reached Ratnagiri | रत्नागिरी : कष्टाला मार्केटिंगची जोड : सोलापूरचे कांदाव्यापारी रत्नागिरीत पोहोचले

रत्नागिरी : कष्टाला मार्केटिंगची जोड : सोलापूरचे कांदाव्यापारी रत्नागिरीत पोहोचले

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी : कष्टाला मार्केटिंगची जोड : सोलापूरचे कांदाव्यापारी रत्नागिरीत पोहोचलेगेली पाच वर्षे व्यापारासाठी दाखल, जेव्हा शेतकऱ्यांनी बांधाची वेस ओलांडली

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : मार्केट यार्डमध्ये कांद्याचे कोसळलेले दर, हमाली, दलाली करता करता हातात येणारी तूटपुंजी रक्कम, मिळणाऱ्या नक्की बाकीतून उत्पादन खर्चसुध्दा निघत नाही, शेती सोडवत नाही आणि आलेले उत्पन्न जगू देत नाही, त्यामुळे आत्महत्या वाढत असताना दुसरीकडे सोलापुरातील शेतकरी शेतीपलिकडे पाऊल टाकू लागले आहेत.

शेतीच्या बांधावर आयुष्य काढणाऱ्या या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याची पाळेमुळे रत्नागिरीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचली आहेत. गेली पाच वर्षे सोलापुरातील शेतकरी थेट रत्नागिरीत येऊन कांदा विक्री करत आहेत. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे हे शेतकरी समाधानाने सांगतात.

कोकणात पावसाळ्यापूर्वी साठवणुकीचा कांदा मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जातो. त्यामुळे या काळात कांद्याला मोठी मागणी असते. कांदा पिकतो ते शेत आणि रत्नागिरी यांची नाडी आजपर्यंत कधीच जुळली नव्हती. त्यामुळे रत्नागिरीत कांद्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढलेले होते.

दलाल, हमाली यातून कांद्याचे भाव वाढत होते. या संपूर्ण व्यवहारात कांदा पिकवणारा शेतकरी अन् तो खरेदी करणारा शेवटचा ग्राहक हे दोघेही भरडले जात होते अन् दलाल गब्बर होत होते. अखेरीस शेतकऱ्यांनीच शेताच्या बाहेर पडण्याचे ठरवले. नुसते काळ्या मातीत राबून आपले पोट भरणार नाही तर बाजारपेठेवरही आपला कब्जा पाहिजे, हा विचार सोलापुरात रुजला आणि तो रत्नागिरीपर्यंत अंमलात आला.

पाच वर्षांपूर्वी सोलापुरातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा कांद्यासह रत्नागिरीची सैर केली अन् त्यामध्ये त्यांना पूर्वीपेक्षा चांगला फायदा मिळाला. त्यामुळे हळूहळू हा विचार आणखीन रूजला.

घाऊक बाजारात तीन ते चार रुपये किलोने जाणारा कांदा रत्नागिरीत शेतकऱ्यांकडून ८ ते १० रुपयांना विकला जाऊ लागला. घाऊक बाजारात हमाली, दलाली, वाहतूक खर्च करून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नव्हतं.

एवढंच नव्हे, तर रत्नागिरीकरांनाही हा १० व ५० किलोच्या पिशवीत उपलब्ध असणारा कांदा परवडू लागला. त्यामुळे ग्राहक अन् शेतकरी दोहोंनाही हा व्यवहार सोयीचा होत आहे.

पावसाळा तोंडावर असल्याने कांद्याची साठवणूक केली जाते. त्यामुळे कांद्याला विशेष मागणी आहे. याशिवाय मुस्लिम भाविकांचा रमजान सुरू असल्याने या महिन्यांत कांद्याचा खपही अधिक होतो. बाजारभावापेक्षा कमी किमतीतील कांदा ग्राहकांना परवडत असल्याने शेतकऱ्यांकडील कांदा खरेदी सध्या जोरात सुरू आहे.

शेतकरी-ग्राहक थेट संपर्क

सोलापुरातील ट्रक भाड्याने करतात आणि त्यामध्ये १० व ५० किलोची कांद्याची पोती भरून रत्नागिरीकडे येतात. रत्नागिरी शहर, परिसरात कांद्याची विक्री जोरात सुरु आहे.

मार्केट यार्डमध्ये ३ ते ४ रूपये किलोने कांदा विक्री करण्यापेक्षा हेच शेतकरी ८ ते १० रूपये किलो दराने कांदा विक्री करत आहेत. शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवहार होत असल्याने शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होत आहे.

रत्नागिरीकरांची व्यापाऱ्यांकडून कशी होते लूट

रत्नागिरीकरांची लूट किती होते पहा! कष्ट करून स्वत:च्या शेतात कांदा पिकवणारा शेतकरी हजारो मैल अंतर पार करून थेट ग्राहकाच्या घरापर्यंत कांदा पोहोचवतो, तोही १० रुपये किलो दराने! आणि हाच स्वत:च्या दुकानापर्यंत आलेला कांदा रत्नागिरीतील व्यापारी ग्राहकांना विकतो १५ रुपये किलोने!

म्हणजे शेतकरी शेतीतील कष्ट अन् वाहतूक खर्च करूनही ८ रुपयांनी कांदा विकतो अन् मिळालेल्या पैशात समाधानी राहतो अन् व्यापारी? तो काही न करता स्वत:च्या दुकानात कांदा विक्रीला ठेवून एका किलोमागे कमीत कमी ८ रुपये फायदा कमावतो. यातूनच दलाल गब्बर होतात.

खिचडीवर ताव

दिवसभर ग्राहकांच्या मागे धावल्यानंतर थकलाभागलेला शेतकरी सायंकाळी वळतो तो खिचडीच्या डिशकडे! दिवसभर कांदा विक्री झाली की, सायंकाळी एखाद्या झाडाखाली चूल पेटते अन् त्यावर खिचडी रटरटू लागते. त्यावर यथेच्छ ताव मारून दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कांदा विक्रीत जुंपून घ्यायचं, असा त्यांचा दिनक्रम असतो.

मार्केट यार्डमध्ये कांदा पाठविणे म्हणजे तोट्याचे गणित आहे. त्यामुळे गेली पाच वर्षे रत्नागिरीत येऊन कांदा विक्री करणे सुलभ झाले आहे. मार्केट यार्डला ३ ते ४ रूपये किलो दराने कांदा विक्री होते; परंतु रत्नागिरी शहर व आसपासच्या परिसरात हाच कांदा ८ ते १० रूपये किलो दराने सहज संपतो.

 

गावातील दोन शेतकरी मित्र मिळून एक गाडी भरून कांदा आणतो. आठ ते नऊ टन कांदा त्यामध्ये असतो. चार - पाच दिवसात कांदा संपला की, घर गाठतो. यावर्षीच्या हंगामात कांदा विक्रीसाठी आणलेली ही सहावी गाडी आहे. गाडीचे भाडे देणे परवडते. शिवाय कांदा विक्रीतून आपला फायदाही होतो. ग्राहकांना दुकानात किंवा बाजारात १० ते १५ रूपयांना मिळणारा कांदा जेव्हा ८ ते १० रूपयात मिळतो, याचे समाधान अधिक मिळत असते.
- रावसाहेब दादा बरवे,
गिरवे, माळशिरस (जि.सोलापूर)

Web Title: Ratnagiri: Marketing connectivity to the labor: Onion merchandise of Solapur reached Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.