रत्नागिरी : नेत्यांच्या डोक्यात हवा : भाजपच्या विनय नातूंकडून घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:12 PM2018-06-18T17:12:26+5:302018-06-18T17:12:26+5:30

सध्या सत्तेमुळे जिल्ह्यात काही नेत्यांच्या डोक्यात हवा शिरली असल्याचा उल्लेख कोणाचेही नाव न घेता डॉ. विनय नातू यांनी करताना त्यांचा आणि त्यांना साथ देणाऱ्या काही मंडळीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

Ratnagiri: Head of the leaders in the head: Vinay's grandson of BJP is away from home | रत्नागिरी : नेत्यांच्या डोक्यात हवा : भाजपच्या विनय नातूंकडून घरचा आहेर

रत्नागिरी : नेत्यांच्या डोक्यात हवा : भाजपच्या विनय नातूंकडून घरचा आहेर

googlenewsNext
ठळक मुद्देसत्तेमुळे जिल्ह्यात काही नेत्यांच्या डोक्यात हवा भाजपच्या विनय नातूंकडून घरचा आहेर

गुहागर : सध्या सत्तेमुळे जिल्ह्यात काही नेत्यांच्या डोक्यात हवा शिरली असल्याचा उल्लेख कोणाचेही नाव न घेता डॉ. विनय नातू यांनी करताना त्यांचा आणि त्यांना साथ देणाऱ्या काही मंडळीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

या बैठक घेऊन अशा लोकांवर योग्यवेळी पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. परंतु, अशा लोकांच्या चुकीच्या गोष्टीमुळे पक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, ते कधीही भरून काढता येणार नाही. या गोष्टी गुहागर मतदारसंघात तरी यापुढच्या काळात थांबवायला हव्यात, असा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी दिला आहे.

गुहागर भंडारी भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेश चिटणीस डॉ. नातू बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघात पक्षाने दिलेला उमेदवार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांना निवडून आणण्यासाठी तसेच लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

व्यासपीठावर तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नीलम गोंधळी, शशिकांत चव्हाण, रामदास राणे, यशवंत बाईत, संतोष जैतापकर, बावा भालेकर, राजू रेडीज, सतीश मोरे, नंदू गोंधळी, श्रीकांत महाजन, सुरेश वरेकर, संतोष भडवलकर आदी प्रमुख पदाधिकारी, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

नातू म्हणाले की, पक्षाला आणि स्वत:लाही भविष्यात पुन्हा सुगीचे दिवस आणायचे असतील तर कार्यकर्त्यांनी अशा अपप्रवृत्तींना जिथल्या तिथे रोखून ठेचण्याची तयारी दाखविली पाहिजे.

एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये आता हे मागे राहिलेले नाहीत, हा अनुभव पदवीधरची मतदार नोंदणीचा कार्यक्रम कोकणात राबवताना गेल्या दीड वर्षात माझ्या वाट्याला आला. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये गुहागर मतदार संघातही काही नावे पुढे करून नवे षड्यंत्र रचण्याचे काम हे करीत असल्याचे ते म्हणाले.

नातू पुढे म्हणाले की, पत्रकांमध्ये फोटो नाही म्हणून रामायण करणारे हे नेते, आमचे कुठे आणि कसे फोटो नव्हते आणि नावे नव्हती, हे सांगितले तर मोठी यादी होईल. परंतु आपले फोटो आणि नावे छापली नाहीत म्हणून आपली लोक प्रियता कधी कमी होणार नाही, हे यांना माहीत नाही.

राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही आपला पक्ष कोकणात अजून जो अपयशी ठरलाय, याला संघटना किंवा कार्यकर्ते कारणीभूत नाहीत, तर असे नेते कारणीभूत असल्याचा आरोपही यावेळी केला.

साधारणपणे प्रदेश कार्यकारिणी झाली की, आठवडाभरात जिल्हा व तालुका कार्यकारिणी बोलावण्याची संघटनेची पध्दत आहे. येणारे २०१९ हे वर्ष निवडणूक वर्ष असून, त्यासाठी प्रदेश कार्यालयाकडून संघटनावाढीसाठी अनेक कार्यक्रम घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सन २००९ पर्यंत मी आमदार म्हणून सक्रिय होतो. तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही, असा आपला समज होता. परंतु काही वादळे आली आणि त्यानंतरच्या प्रत्येक लहान-मोठ्या निवडणुकीत आपल्याला सातत्याने पराभवाचा सामना सहन करावा लागला.

या अपयशामधून बाहेर पडण्यासाठी बराच कालावधीनंतर मी जरा शांत राहून, विचारपूर्वक गुहागर नगरपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीला सामोरे गेलो. माझी वेगळी भूमिका शहरातील काहींनी समजून घेतली म्हणून पक्षाला हे यश तरी मिळाले, असे नातू यांनी सांगितले. या बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी केले. नीलेश सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

... तर उपनगराध्यक्षही असता

नगरपंचायतीच्या निवडणुकीत काहींनी मी घेतलेल्या भूमिकेविरोधात जाऊन काम केले, त्यांना माझा विचारच लक्षात आला नाही. यातच गुहागरमध्ये भाजपची सत्ता कशी येणार? यापेक्षा ती कशी येणार नाही, यासाठी पक्षातील काही मंडळी सक्रिय होती.

त्यांच्या कारस्थानाला काहीजण बळी पडले. अन्यथा आज गुहागरचा उपनगराध्यक्षही हक्काने बसविण्याचा सन्मान पक्षाला मिळाला असता आणि सत्ताधारी राष्ट्रवादीला आपला भोपळाही फोडून दिला नसता, असे सांगून कार्यकर्त्यांच्या काही गोष्टी लक्षात आणून दिल्या.

पक्षाची गरज ओळखून काम करा

सध्या राज्यात आणि केंद्रात आपली सत्ता येऊन साडेतीन-चार वर्षे पूर्ण झाली आहेत. कोकणात अनेक चांगली मंडळी आणि नेते आपल्या पक्षात आले आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणारी रामदास राणे, शशिकांत चव्हाण, सुरेश सावंत यांच्यासारखी ग्रासरूटला जाऊन काम करणारी मंडळी आपल्याबरोबर आली आहेत. त्यामुळे इतर कोण काय करते, यापेक्षा पक्षाची गरज काय आहे आणि त्यासाठीची ध्येय धोरण कशा पध्दतीने राबविली पाहिजेत, हे लक्षात घेऊन आपण काम केले पाहिजे.

Web Title: Ratnagiri: Head of the leaders in the head: Vinay's grandson of BJP is away from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.