रत्नागिरी : शालेय शिक्षण विभागाची शिक्षणाची वारी जानेवारीमध्ये रत्ननगरीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:17 PM2017-12-23T15:17:25+5:302017-12-23T15:20:21+5:30

शालेय शिक्षण विभागाचा एक अभिनव उपक्रम म्हणून ओळखली जाणारी शिक्षणाची वारी दिनांक ११ ते १३ जानेवारी २०१८ दरम्यान रत्नागिरीमध्ये संपन्न होणार आहे. रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा आहे ज्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय नसतानाही शिक्षण वारीचे आयोजन केले जात आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेला हा शैक्षणिक बहुमान समजला जात आहे.

Ratnagiri: Education Department of School Education Department, Ratnagiri in January! | रत्नागिरी : शालेय शिक्षण विभागाची शिक्षणाची वारी जानेवारीमध्ये रत्ननगरीत!

रत्नागिरी : शालेय शिक्षण विभागाची शिक्षणाची वारी जानेवारीमध्ये रत्ननगरीत!

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षणाची वारी : शालेय शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रम ६ जिल्ह्यांमधील १८०० शिक्षक वारीमध्ये सहभागी होणार रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला शैक्षणिक बहुमान

टेंभ्ये : शालेय शिक्षण विभागाचा एक अभिनव उपक्रम म्हणून ओळखली जाणारी शिक्षणाची वारी दिनांक ११ ते १३ जानेवारी २०१८ दरम्यान रत्नागिरीमध्ये संपन्न होणार आहे. रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा आहे ज्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय नसतानाही शिक्षण वारीचे आयोजन केले जात आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेला हा शैक्षणिक बहुमान समजला जात आहे.

पूर्वनियोजित ६ जिल्ह्यांमधील १८०० शिक्षक या वारीमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार व आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांचीही या वारीला उपस्थिती लाभणार आहे. वारीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्याबाबत विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचे डॉ. शेख यांनी यावेळी सांगितले.

ही वारी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेला शैक्षणिक बहुमान असून, वारीच्या यशस्वी आयोजनासाठी विविध १२ समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली.

रत्नागिरीत ही वारी आल्यानंतर प्रत्येक दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर ही वारी सर्वांसाठी खुली असल्याने जिल्ह्यातील शिक्षण प्रक्रिया गतिमान होण्यास वारीचा उपयोग होईल, असा विश्वास शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड उपस्थित होते. या वारीचा रत्नागिरीतील लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

रत्नागिरीत दाखल होणाऱ्या या शिक्षणाच्या वारीमध्ये गणित व भाषा वाचन विकास, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकांची बदलती भूमिका, मूल्यवर्धन, कला व कायार्नुभव, क्रीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण अशा शिक्षणक्षेत्राशी संबंधित राबविण्यात आलेले उपक्रम समाविष्ट होणार आहेत.

निश्चित केलेल्या ६ जिल्ह्यांमधील शैक्षणिक प्रगती साधण्यात अडचण येणाऱ्या शाळांमधील शिक्षणाधिकारी स्तरावरून निवडण्यात आलेले प्रातिनिधिक स्वरूपात २०० प्राथमिक शिक्षक, ५० माध्यमिक शिक्षक व ५० शाळा व्यवस्थापन समिती सदस्य या वारीला भेट देणार आहेत. रत्नागिरी येथील एम. डी. नाईक हॉल, उद्यमनगर येथे वारीचे आयोजन केले जाणार आहे. या वारीला रत्नागिरीतदेखील चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास यावेळी डॉ. आय. सी. शेख यांनी व्यक्त केला.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षणक्षेत्रात आगळेवेगळे प्रयोग राबवले आहेत. या प्रयोगांची फलनिष्पत्ती सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचावी व एकूणच शिक्षणक्षेत्राची गुणवत्ता वाढावी म्हणून राज्यांमध्ये शिक्षण वारीचे आयोजन करण्यात येते. सन २०१५पासून हा उपक्रम सुरू असून, प्रत्येक वर्षी चार ठिकाणी वारीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीची तिसरी वारी रत्नागिरी या ठिकाणी दिनांक ११ ते १३ जानेवारी २०१८ या कालावधीत आयोजित केली आहे.

या वारीमध्ये कोल्हापूर विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी तीनशे शिक्षक सहभागी होणार आहेत. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या उपक्रमात राज्यातील प्रयोगशील शिक्षकांनी अध्ययन अध्यापन पद्धती अधिक सोपी होण्याच्या दृष्टीने तयार केलेले नाविन्यपूर्ण ५५ प्रयोग सादर केले जाणार आहेत.
 

 

रत्नागिरी हा वर्क कल्चर जिल्हा असून, सर्व अधिकारी, मुख्याध्यापक ,शिक्षक, विद्यार्थी व पालक यांची त्यांच्या कामावर निष्ठा आहे. या वर्क कल्चर दृष्टीकोनामुळे हा जिल्हा राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर आहे. जिल्हा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असणारा समन्वय अप्रतिम आहे. यामुळे रत्नागिरीतील शिक्षण वारी राज्यात आदर्शवत होईल.
- डॉ. सुनील मगर,
संचालक, विश्वास विद्या प्राधिकरण

Web Title: Ratnagiri: Education Department of School Education Department, Ratnagiri in January!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.