खेडमध्ये पंधरा वाड्यात केवळ एकच टँकर-लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 02:34 PM2019-04-19T14:34:39+5:302019-04-19T14:36:49+5:30

खेड : तालुक्यात पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. सध्या तालुक्यातील आठ गावातील पंधरा वाड्यांमध्ये एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ...

Only one Tanker-Lanja taluka in Kadh village in fifteen Wadas: aggressive due to lack of water supply | खेडमध्ये पंधरा वाड्यात केवळ एकच टँकर-लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक

खेडमध्ये पंधरा वाड्यात केवळ एकच टँकर-लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीटंचाईची झळ : प्रशासनाची दमछाकलांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक  पालू ग्रामस्थांनी टँकर अडवला

खेड : तालुक्यात पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. सध्या तालुक्यातील आठ गावातील पंधरा वाड्यांमध्ये एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. साडेपाच हजार लीटर क्षमतेचा एकच टँकर उपलब्ध असल्याने प्रशासनाची टँचाईग्रस्त गावातील जनतेला पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे. त्यामुळे दोन खासगी टँकरची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी जिल्ह्यातील पहिला टँकर खेड तालुक्यात धावतो. मात्र, यावर्षी यामध्ये खंड पडला आहे. सध्या उन्हाळा वाढला असल्याने ग्रामीण भागातील जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. उन्हाच्या तीव्रतेने ग्रामीण भागातील जलस्रोत झपाट्याने आटत आहेत. परिणामी तालुक्यात सध्या आठ गावे व १५ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, प्रशासनाकडे साडेपाच हजार लीटरचा एकच टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे टँचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. टँचाईग्रस्त गावांना चोरद नदीपात्रातून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

दिवसागणिक टंचाईग्रस्त गावे व त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे टँकरद्वारे तालुक्यातील सर्व गावांना पाणी पुरवठा कसा करावा, हा प्रश्न पंचायत समिती प्रशासनासमोर उभा राहिला आहे. सध्या प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने व तहसीलदार शिवाजी जाधव लोकसभा निवडणूक प्रक्रियेत गुंतले असल्याने खासगी टँकरच्या उपलब्धतेसाठी विलंब होत असल्याचे समजते. तालुक्यातील जनतेसाठी दोन खासगी टँकर उपलब्ध झाल्यास टँचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे.

 

लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक  पालू ग्रामस्थांनी टँकर अडवला

लोकमत न्यूज नेटवर्क

लांजा : तालुक्यातील पालू गावामध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, ग्रामस्थांनी मागणी करुनही प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे बुधवारी हुंबरवणे येथे पाणीपुरवठा करण्यासाठी आलेल्या शासकीय टँकरला ग्रामस्थांनी दिवसभर घेराओ घालत अडवून धरले होते. जोपर्यंत प्रशासन पालू गावाला पाणी देत नाही, तोपर्यंत टँकर न सोडण्याचा पवित्रा पालू ग्रामस्थांनी घेतला होता.

तालुक्यातील हुंबरवणे गावामध्येही भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांची  मागणी लक्षात घेत प्रशासनाने एक दिवस आड करून गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रथम चिंचुर्टी व त्यानंतर हुंबरवणे गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, त्या शेजारीच असणाºया पालू येथील ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

पालू गावातील सात वाड्यांवर दोन ते तीन दिवस आड करुन पाणी पिण्याची वेळ आली आहे. पालू गावामध्ये चार विहिरी असून, या विहिरी पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. याच विहिरींवर ग्रामपंचायतीची नळपाणी योजना अवलंबून आहे. 

पालू गावातील गावकारवाडी, दंडावरचीवाडी, बौद्धवाडी, गाडेवाडी, रामवाडी, पानंदी खालचीवाडी, नामेवाडी अशा सात वाड्यांतील ग्रामस्थांच्या घशाला पाण्याविना कोरड पडली आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

दरम्यान, हुंबरवणे येथे बुधवारी सकाळी शासकीय टँकर पाणी घेऊन गेला होता. यावेळी संतप्त झालेल्या पालू येथील ग्रामस्थांनी या  टँकरला अडवले. जोपर्यंत प्रशासन पालू गावात पाण्याचा टँकर पाठवत नाही, तोपर्यंत आम्ही हा टँकर सोडणार नाही, असा पवित्रा पालू ग्रामस्थांनी घेतला होता. त्यामुळे टँकर दिवसभर जाग्यावरच उभा होता. याबाबतची माहिती लांजा पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाला दिल्याची माहिती सरपंच सुहास नामे यांनी दिली.

पालू गावातील विहिरींमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाला कळवल्यामुळेच तालुका प्रशासनाने पालू गावामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केलेला नाही. मात्र, प्रत्यक्षात ग्रामस्थ पाणी नसल्याने पाणी पाणी करत आहेत.पालू गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असून, आतापर्यंत अनेकवेळा मागणी करूनही प्रशासनाने या गावासाठी टँकर पुरवलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

Web Title: Only one Tanker-Lanja taluka in Kadh village in fifteen Wadas: aggressive due to lack of water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.