नेपाळी मजुरांनी दोन हजाराने वाढविली मजुरी, आंबा बागायतदारांना आर्थिक भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:31 PM2023-12-25T12:31:48+5:302023-12-25T12:32:03+5:30

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असतानाच आंबा काढणी, फवारणी व अन्य कामांसाठी स्थानिक मजूर उपलब्ध होत ...

Nepalese laborers have increased their wages by two thousand, mango farmers are in financial trouble | नेपाळी मजुरांनी दोन हजाराने वाढविली मजुरी, आंबा बागायतदारांना आर्थिक भुर्दंड

नेपाळी मजुरांनी दोन हजाराने वाढविली मजुरी, आंबा बागायतदारांना आर्थिक भुर्दंड

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असतानाच आंबा काढणी, फवारणी व अन्य कामांसाठी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने परराज्यातील नेपाळी मजुरांवर येथील बागायतदारांना अवलंबून राहावे लागत आहे. यावर्षी नेपाळी कमी संख्येने दाखल झाले आहेत. त्यातच गतवर्षीपेक्षा दोन हजार रुपये मजुरीत वाढवून मागत आहेत. मजूर उपलब्ध होत नसल्याने नेपाळ्यांना जास्त पैसे देणे बागायतदारांना भाग पडत आहे.

डिसेंबरपासून नेपाळी मजूर यायला सुरुवात होते. माकडे, वानर, आंबा मोहर, फळे खात असल्याने बागायतीचे संरक्षण करण्यासाठी बागांमध्ये नेपाळी सुरक्षारक्षक म्हणून नेमण्यात येतात. केवळ बागेची वन्यप्राण्यांपासून देखरेख करण्यासाठी त्यांना दहा हजार रुपये दिले जात हाेते. मात्र, त्यासाठी या वर्षी बारा हजारांची मागणी केली आहे. बागेच्या देखरेखीसह मजुरीच्या कामासाठी १२ हजार दिले जात हाेते, तिथे आता १४ हजार रुपये महिन्याचा पगार मागत आहेत.

फवारणी असो वा झाडावर चढून आंबे काढण्याच्या कामाला स्थानिक मजूर मिळत नसल्याने अखेर नेपाळी मजुरांना दोन हजार रुपये वाढवून देण्याची तयारी बागायतदारांनी केली आहे.
बागेच्या रक्षण करण्याच्या कामासह फवारणी असो वा आंबा काढणी किंवा पॅकिंगच्या कामाला तयार होत असल्याने नेपाळी कामगारांना सध्या मागणी अधिक आहे. अनेक नेपाळी ठरावीक बागायतदारांकडे वर्षानुवर्षे कामाला येत आहेत. त्यामुळे बागायतदारांनी केवळ मोबाइलवर संपर्क साधल्यास कामावर हजर होत आहेत. बागेच्या संरक्षणासह साफसफाई, फवारणीच्या कामासाठी नेपाळी दाम्पत्याची नियुक्ती केली जात आहे.

स्थानिकांना रात्रीच्या पहाऱ्याची भीती

आंबा मोहराच्या संरक्षणासाठी फवारणी असो वा आंबा काढणी वेळेवर करणे आवश्यक आहे. अन्यथा बागायतदारांचे नुकसान होते. त्यामुळे सध्या पीक वाचविण्यासाठी बागायतदार खर्च करीत आहेत. आंबा बागेत राहून फळांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक मजूर तयार होत नाहीत. दिवसभर राखण करण्याची तयारी एकवेळ दाखविली जात असली, तरी रात्री मात्र पहारा देण्यासाठी वन्यप्राण्यांच्या भीतीने काेणी तयार होत नाही. नेपाळी मात्र बागेतच राहतात. त्यामुळे नेपाळींना बागेच्या संरक्षणासाठी नियुक्त केली जात आहे.

नवीन पिढी मजूर कामासाठी निरुत्साही असल्याने स्थानिक मजूर मिळत नाहीत. त्यामुळे नेपाळी व उत्तर प्रदेशातील कामगारांवर अवलंबून राहावे लागते. यावर्षी नेपाळी कामगार कमी संख्येने आले असून पगारही वाढवून मागत आहेत. मजुरांची समस्या भासत असल्याने बागायतदारांना नेपाळी मजुरांना वाढीव पगार देणे भाग पडत आहे. - राजन कदम, बागायतदार

Web Title: Nepalese laborers have increased their wages by two thousand, mango farmers are in financial trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.