एक संग्रहालय.. कलेचं, हौसेचं अन् जिद्दीचं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:06 PM2018-05-20T13:06:53+5:302018-05-20T13:06:53+5:30

मनात जिद्द असेल आणि काहीतरी नवीन करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते.

A museum .. art, passion and stubborn! | एक संग्रहालय.. कलेचं, हौसेचं अन् जिद्दीचं!

एक संग्रहालय.. कलेचं, हौसेचं अन् जिद्दीचं!

Next

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : मनात जिद्द असेल आणि काहीतरी नवीन करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपल्या घराचे आणि आपल्या माणसांचे नाव मोठे करण्याची तळमळच आपल्याला काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा देते. आपल्या हौसेला मिळालेली जिद्दीची साथ या जोरावरच सोगमवाडी (ता. राजापूर)सारख्या दुर्गम गावात कला, वस्तू आणि काष्ठशिल्पांचे संग्रहालय उभे राहिले आहे. 

 

राजापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा सोगमवाडी गावात १८९० साली बांधण्यात आलेला एक बंगला आहे. हा बंगला म्हणजे त्याकाळचा वकील बंगला, बाग बंगला किंवा सावकाराचा बंगला होय. या बंगल्याची रचना पाहिली तर ब्रिटीशकालीन बांधकाम आजही तग धरून असल्याचे दिसून येईल. याच बंगल्याच्या दिवाणखान्यात बबन नारकर यांनी हे संग्रहालय उभारले आहे. 

 

घरात असलेल्या वडिलोपार्जित वस्तूंचे जतन झाले पाहिजे, असे त्यांनी मनाशी ठरविले. पणजोबांपासून असलेली तांबे, पितळेची भांडी त्यांनी जपून ठेवली. पण केवळ ही जपून न ठेवता कालबाह्य झालेली आणि आज दृष्टीस न पडणारी ही भांडी इतरांनाही पाहता यावीत, त्याची माहिती त्यांना मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरू होती. त्यासाठी काही करता येईल का, असा विचार त्यांच्या मनात येताच पुणे येथील एका अशाच पुरातन वस्तूंच्या संग्रहालयाची माहिती त्यांना मिळाली. याच संग्रहालयापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपला हा पुरातन बंगला संग्रहालय म्हणून नावारूपाला आणण्याचा निश्चय केला. अनेक ठिकाणी संग्रहालयांमध्ये वस्तूंपेक्षा त्यांचे काठ किंवा एखादा अवशेषच शिल्लक आहे. पण बबन नारकर यांच्या या संग्रहालयात पूर्ण भांडी असल्याचे पाहायला मिळते. या संग्रहालयात पणजोबांच्या पायातील खडाव्यापासून दळणाचं जातं, पाणी तापविण्याचं तपेलं, बुंदी काढण्याचा झारा, पाटा - वरवंटा, शेवया करावयाचा लाकडी साच्या, काटवट, व्यायामासाठी वापरण्यात येणारी लाकडी मगदूल जोडी, मोदक तयार करण्याचे भगून, पितळेची किसनी अशा नाना तºहेच्या वस्तू आहेत.

 

जे काही करायचं ते जुन्याला धरूनच करायचं, या उद्देशाने त्यांनी पुरातन वस्तूंबरोबरच काष्ठशिल्पाची निर्मिती केली आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्यांनी या वस्तू जतन केल्या आहेत. अगदी चुलीसाठी जळावू म्हणून वापरण्यात येणाºया लाकडांचाही त्यात समावेश आहे. करवंटीपासून गणेशमूर्ती त्याचबरोबर सोडणे, बांबूमूळ, नारळ, शिंपले, झाडांची पाळे, फांद्या, खोड, बांद बांडगूळ यापासून प्राणी, पक्षी, सर्प, मासे, खेकडे, झिंगे, तलवारी, कासवे त्यांनी तयार केली आहेत.

 

याचबरोबरच त्यांच्या या संग्रहालयात जुने ग्रंथ आणि कायदा पुस्तकांचाही समावेश आहे. ‘शेगावचे गजानन महाराज, योगविशिष्ठी, रामायण, महाभारत, हरी विजय’ यासारखे ग्रंथ याठिकाणी पाहायला मिळतात. हे ग्रंथ चित्र स्वरूपात असल्याचे बबन नारकर सांगतात. एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर ती शिक्षा कोणत्या स्वरूपाची आहे, हे दर्शविणारी चित्रे यामध्ये आहेत. 

 

रिटायर व्हायचं नाही

आयुष्यात कधीच रिटायर व्हायचं नाही, असे मी ठरवले होते. त्यामुळेच ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ या कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्या आजूबाजूला भरपूर काही आहे, फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी हवी. निसर्गात ५० ते ८० टक्के काष्ठशिल्प असतात. फक्त आपण त्याकडे बारकाईने पाहून त्याला योग्य तो आकार दिला पाहिजे. जुन्या वस्तूंचे मोल न कळल्यामुळेच त्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यांचे जतन करण्याची गरज आहे.

- बबन नारकर

 

ग्रंथ  संपदा

जुन्या ग्रंथांचाही ठेवा बबन नारकर यांनी जपून ठेवला आहे.  ग्रंथांमध्ये मोडीमधील हिशोबाची नोंदवही आहे. या ग्रंथांच्या छपाईच्या अगोदर २ रूपये, ३ रूपये, ५ रूपये आगाऊ  दिले जात होते. त्याचा उल्लेखही या ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. त्याकाळातील कायद्याची पुस्तकेही याठिकाणी असून, गुन्हे तेच पण गाव, नाव, वाडी, कायदे कलमे आता बदलली आहेत.

 

स्वातंत्र्याची बैठक याच घरात

ज्या दिवाणखान्यात हे संग्रहालय उभारण्यात आले आहे, त्याच दिवाणखान्यात ब्रिटीशांना एकजूट दाखविण्यासाठी दिनांक २६ जानेवारी १९४० रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. याबाबत कै. भानू परशुराम सोगम यांना दिनांक १९ जानेवारी १९४० रोजी पत्र आले होते. हे पत्र आजही पाहायला मिळते.

 

बाळासाहेबांचे पहिले सैनिक

बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत त्यांनी काम केले आहे. १९६२पासून ते त्यांच्या प्रत्येक सभा, दौºयांमध्ये सोबत होते. अगदी सन १९९२पर्यंत ते बाळासाहेबांबरोबर होते. व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांची आणि बाळासाहेबांची ओळख झाली. बाळासाहेबांनी संघटना स्थापन केल्यानंतर ते त्याचे पहिले सैनिक होते.

 

बाग म्हणजे कृषी विद्यापीठच

याच बंगल्याच्या पाठीमागे बाग आहे. ही बाग म्हणजे त्यावेळचे कृषी विद्यापीठच होते. या बागेत पेरूची सर्व प्रकारची झाडे, जायफळाचे २०० फूट उंच झाड, मोसंबी, नारंगी, संत्रा, डाळिंब, म्हावळुंग, कॉफी, पोपनीस, लिंबू अशी झाडे होती. तर जाई, जुई, मोगरा, कृष्णकमळ, सोनचाफा, नागवेल, नागचाफा, सफेद चाफा, आंब्याची सर्व प्रकारची झाडे होती. याच बागेत ब्रिटीशकालीन तळे असून, त्याकाळी पिण्यासाठी त्याचे पाणी वापरले जात होते.

 

कसे जायचे?

याठिकाणी राजापूर आणि रत्नागिरीहून जाता येते. राजापूर जवाहर चौकातून धोपेश्वर गोवळ, शिवणे मार्गाने सोगमवाडीकडे जाता येते. तर रत्नागिरीहून जाताना सोलगाव तिठ्यावरून देवाचेगोठणे गावच्या आधी सोगमवाडीकडे जाण्यासाठी रस्ता आहे.

Web Title: A museum .. art, passion and stubborn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.