कोका-कोलासारखे आणखी मोठे प्रकल्प कोकणात येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:38 AM2023-12-01T11:38:47+5:302023-12-01T11:39:03+5:30

कोकणात केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायचा एवढेच आधीच्या सरकारने केले

More big projects like Coca-Cola will come to Konkan says Chief Minister Eknath Shinde | कोका-कोलासारखे आणखी मोठे प्रकल्प कोकणात येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोका-कोलासारखे आणखी मोठे प्रकल्प कोकणात येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चिपळूण / आवाशी: कोकणच्या भूमीतील आंबा, काजू, मासेमारीसारख्या पारंपरिक उद्योगांना चालना दिली पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. मात्र, त्याच्या जोडीला औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे. कोका-कोला कंपनीच्या माध्यमातून कोकणच्या आधुनिक विकासाची कास धरत असून, काेका-काेला सारखे आणखी माेठे प्रकल्प काेकणात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाेटे (ता. खेड) येथे केले.

लोटे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारित क्षेत्रात हिंदुस्थान कोकाकोला ब्रेव्हरेज कंपनीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी उद्याेगमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. रॉड्रिक, एचसीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुआन पाबलो रॉड्रिग्ज, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन शर्मा, एचसीसीबीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू प्रियदर्शी उपस्थित होते. कंपनीचे सप्लाय व्यवस्थापक आलोक शर्मा यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पर्यावरणपूरक उद्याेग आले पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा आता उद्याेग वाढीसाठी पुढे येत आहे. मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रामध्ये उद्याेग, व्यापार वाढविण्यासाठी गती दिली आहे. अवघ्या महिनाभरात काेका-काेला कंपनीला आवश्यक त्या परवानगी देण्यात आल्या. यालाच गतिमान सरकार म्हणतात. अशा उद्याेगांसाठी महाराष्ट्र ‘रेड कार्पेट’ टाकून तयार आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, कोका-कोला हा प्रकल्प आशियातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. या कंपनीत २५०० काेटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीत उत्पादित हाेणार आहेत. महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन असून, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर बनवण्याचे स्वप्न साकार करू, असे ते म्हणाले.

उद्याेगमंत्री उदय सामंत म्हणाले की, प्रकल्प सुरू झाल्यावर ८० टक्के स्थानिकांना नाेकऱ्या देण्याची मागणी आहे. या मागणीला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

ग्रीनफिल्ड राेडमुळे उद्याेग येतील

काेकणातील समुद्रकिनारा समृद्ध आहे. त्यामुळे पर्यटन आणि उद्याेग वाढीला चालना मिळेल. मुंबई-गाेवा ग्रीनफिल्ड रस्ता तयार हाेत आहे. त्यामुळे वेळ वाचणार असून, त्यामुळे उद्याेग येतील. कोकण विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ६७ टीएमसी पाणी कोकणात वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधीच्या सरकारने विराेधच केला

कोकणात केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायचा एवढेच आधीच्या सरकारने केले. आम्हाला बाळासाहेब किंवा दिघे साहेबांनी विकासाला विरोध करायचे शिकवले नाही. त्याउलट आपले सरकार विकास प्रकल्पांना गती देत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: More big projects like Coca-Cola will come to Konkan says Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.