रत्नागिरी : थराजापुरातील महावितरणचे कार्यालय रातोरात हलविले, ग्राहकांना रिक्षाला मोजावे लागणार पन्नास रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:06 PM2017-12-23T15:06:34+5:302017-12-23T15:13:27+5:30

तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले.

MahaVitran's office in Rajapur moved overnight, customers will have to pay fifty rupees to the autorickshaw | रत्नागिरी : थराजापुरातील महावितरणचे कार्यालय रातोरात हलविले, ग्राहकांना रिक्षाला मोजावे लागणार पन्नास रूपये

रत्नागिरी : थराजापुरातील महावितरणचे कार्यालय रातोरात हलविले, ग्राहकांना रिक्षाला मोजावे लागणार पन्नास रूपये

Next
ठळक मुद्देकार्यालय ग्रामपंचायत हद्दीत नेल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोठे शोधणार ग्राहकांना पन्नास रूपये रिक्षाला मोजावे लागणार महावितरणने ग्राहकांना जणू झिडकारले कार्यालय तातडीने राजापूर शहरात आणण्यात यावे, अशी मागणी

राजापूर : तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले.

विशेष म्हणजे विधानपरिषद सदस्या हुस्नबानू खलिफे यांच्या इमारतीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय होते. मात्र, आता राजापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर कोदवली ग्रामपंचायत हद्दीत हे कार्यालय नेण्यात आले आहे.

ज्याठिकाणी जाण्यासाठी आता ग्राहकांना पन्नास रूपये रिक्षाला मोजावे लागणार आहेत. तसेच झेरॉक्स, चहा वा परतीच्या प्रवासाची सुविधादेखील उपलब्ध नाही, अशा ठिकाणी कोदवली येथील पॉवर हाऊसच्या स्टोअर रूममध्ये हे कार्यालय महावितरणने स्थलांतरित केले आहे.

याआधी दोन वर्षांपूर्वी शहर कार्यालयही असेच हलविण्यात आले असून, आता भाग एक व भाग दोन कार्यालये हलवून महावितरणने ग्राहकांना जणू झिडकारले आहे. महावितरणचे राजापूर शहर कार्यालय तातडीने शहरात आणण्यात यावे, अशी ग्राहकांची मागणी आहे.

शहरासह तालुक्यातील वीज समस्यांबाबत माजी आमदार गणपत कदम, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी १३ आॅक्टोबर रोजी महावितरण कार्यालयावर धडक देत जाबही विचारला होता.

विशेष म्हणजे राजापूरमधील कोणत्याही आमदाराने या महत्त्वाच्या विषयाकडे त्यावेळी लक्ष दिले नव्हते. महावितरण कडून ग्राहकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असून, जीर्ण वीजवाहिन्या, कमी-अधिक दाबाचा व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा याबाबत उपस्थित लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

याचवेळी महावितरणच्या मनमानी कारभारामुळे राजापूरकरांना कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर प्रगत राजापूर संघटनेने उठाव केल्यावर माजी आमदार गणपत कदम यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली होती.

महावितरणचे अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याची कायम ओरड होत असतानाच आता शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर हे कार्यालय नेण्यात आल्याने या अधिकाऱ्यांचे फावणार आहे. यापूर्वीच शहर कार्यालय पॉवर हाऊस येथे हलविण्यात आल्याने तांत्रिक कर्मचारी शहरातील भाग एक कार्यालयात बसत असत.

मात्र, आता हे कार्यालयदेखील ग्रामपंचायत हद्दीत नेण्यात आल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोठे शोधावे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. महावितरणने शहर कार्यालय तातडीने राजापूर शहरात न आणल्यास वीज बिले न भरण्याबरोबरच नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

 

 

Web Title: MahaVitran's office in Rajapur moved overnight, customers will have to pay fifty rupees to the autorickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.