..पण गायींचा सांभाळ करायचा तरी कसा? गोहत्या बंदीमुळे गोशाळा फूल्ल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 01:57 PM2018-03-04T13:57:07+5:302018-03-04T13:57:07+5:30

सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. गाय कामधेनू आहे, तिला मातेचे स्थान दिले आहे, त्यामुळे तिची हत्या करू नये, यासाठी हा कायदा केला गेला. त्याचे स्वागतही झाले. कधीकाळी कत्तलखात्याकडे जाणा-या गायींना आता गोशाळेचा मार्ग दाखवला जात आहे.

How to maintain cows? Gowhali bunked due to cow slaughter | ..पण गायींचा सांभाळ करायचा तरी कसा? गोहत्या बंदीमुळे गोशाळा फूल्ल 

..पण गायींचा सांभाळ करायचा तरी कसा? गोहत्या बंदीमुळे गोशाळा फूल्ल 

googlenewsNext

- शिवाजी गोरे 

दापोली : सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. गाय कामधेनू आहे, तिला मातेचे स्थान दिले आहे, त्यामुळे तिची हत्या करू नये, यासाठी हा कायदा केला गेला. त्याचे स्वागतही झाले. कधीकाळी कत्तलखात्याकडे जाणा-या गायींना आता गोशाळेचा मार्ग दाखवला जात आहे. पण त्याने प्रश्न सुटला आहे का? गेल्या काही वर्षात गोशाळांमधील गायींची विशेषत: भाकड गायींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि आता त्यांच्या पालनाचा मोठा प्रश्न गोशाळा चालकांसमोर उभा राहिला आहे. गोशाळांसाठी प्रत्येक जिल्ह्याला अनुदान देण्याचा निर्णय अजूनही कागदावरच असल्याने गायींचे पालन करायचे कसे, असा प्रश्न गोशाळा चालकांना पडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे -परशुराम येथील कर्मवीर श्रीहरी भक्त पारायण भगवान कोकरे महाराज यांची श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान या नावाची  गोशाळा आहे. ही गोशाळा २००८ साली सुरू झाली होती. सुरुवातीला या गोशाळेत केवळ ४ गायी होत्या. मात्र, गोवंश हत्याबंदी कायदा आल्यानंतर या गोशाळेतील गायींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. कत्तकखान्याकडे जाणाऱ्या व अपघातात जखमी झालेल्या गायींची त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे आता या गोशाळेतील गायींची संख्या चारशे पन्नास झाली आहे. या भाकड गायीच्या संगोपनाचा खर्च करताना तारेवरची कसरत कोकरे महाराज यांना करावी लागत आहे. या भाकड गायींच्या संगोपनासाठी त्यांनी कीर्तनसेवेचा आधार घेतला आहे. कीर्तनसेवेच्या माध्यमातून  मिळणाऱ्या मानधनातून ते या गोशाळेचा गाडा हाकत आहेत. त्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा त्यांना आहे.

गोवंश हत्याबंदी करून सरकारने जबाबदारी  झटकली. त्यामुळे गो मातेच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी आता गोशाळेवर येऊन पडली आहे. नोटबंदीनंतर अनेक आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे गोशाळेला समाजाकडून मिळणाºया मदतीचा ओघही कमी झाला आहे.

गायींच्या मृत्यूचे पाप नको

राज्यातील गोशाळांची भयावह स्थिती आहे. गोवंश हत्याबंदी कायदा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याला १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे . गोशाळेला अनुदान देण्यासंदर्भात प्रस्तावही मागविण्यात आले आहेत. मात्र, मागविण्यात आलेले प्रस्ताव धूळखात पडले आहेत. गोशाळा चालकांना गायीच्या संगोपनाकरिता मदतीची अत्यंत गरज आहे. परंतु, शासनाकडून अजूनही मदत मिळालेली नाही. आता आम्हीच आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. गायीच्या मृत्यूचे पाप डोक्यावर घेऊन जगण्यापेक्षा मरण पत्करेन.

- भगवान कोकरे महाराज

गोशाळेतील गायींची संख्या वाढली

भाकड गायी कत्तलखान्याला विकल्या जात होत्या. परंतु, भगवान कोकरे महाराजांच्या गोशाळेमुळे भाकड गायींना हक्काचा आसरा मिळाला. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या  गायी गोशाळेत दाखल होऊ लागल्या. ज्या शेतकऱ्यांना गायी सांभाळणे शक्य होत नाही, ते या गोशाळेत आणून सोडतात. गोशाळेत त्यांचे संगोपन व्यवस्थित होत आहे. चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायी पोलिसांच्या मदतीने सोडवून गोशाळेत ठेवल्या जात आहेत.

स्थानिक जातींचेच संगोपन व्हावे

गुजरात व राज्यस्थानमधून गायी आणून काही गोशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सरकारकडे अशा गोशाळा अनुदानाकरिता प्रस्तावही सादर झाले आहेत. मात्र, परराज्यातील गायी आणून गोशाळा काढण्यापेक्षा महाराष्ट्रीयन गायींचे संगोपन झाले पहिले, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रोज एक ट्रक पेंढा

श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान संचलित गोशाळा लोटे - परशुराम येथे साडेचारशे गायी आहेत. या गायींना पेंढा (सुकलेले गवत) विकत घेऊन घालावे लागते. दररोज एक ट्रक पेंढा घ्यावा लागतो.  वणवा लावला गेल्याने आजूबाजूच्या परिसरातीत सगळे गवत जळून गेले आहे. वणवा लागला नसता तर कदाचित या गायींना जंगलातील वाळलेला चारा तरी मिळाला असता. मात्र द्वेषापोटी आजूबाजूचा परिसर जाळला जात असून, गायींना पेंढा विकत घेण्याची वेळ गोशाळेवर आली आहे.

समाजाचा पुढाकार हवा

गायी जगल्या पाहिजेत, त्यांचे योग्य संगोपन झालं पाहिजे. गायीला मातेचा दर्जा आहे. त्यामुळे तिची हत्या रोखण्यासाठी आणि तिच्या संगोपनासाठी समाजातील प्रत्येक घटकानेच पुढे यायला हवे आणि गोशाळांना मदत करायला हवी, अशी अपेक्षा कोकरे महाराजांनी व्यक्त केली आहे. केवळ आर्थिक मदतच नाही तर पेंढा, भुशी, औषध, गूळ, पाणी अशी कोणत्याही स्वरूपात मदत मिळाली तर गोशाळेला त्याचा उपयोग होईल, असे ते म्हणाले.

खर्च परवडण्यापलिकडचा

कोकरे महाराज यांच्याकडे १२ कामगार आहेत. या गायींना दररोज एक ट्रक पेंढा लागतो. त्यामुळे महिन्याचा खर्च साडेचार लाख रूपयांवर जातो. त्यामुळेच आता गोशाळा चालवणे अवघड होऊ लागले आहे. कोकरे महाराजांनी गायींच्या संगोपनासाठी बँकेकडून १५ लाख रुपये कर्ज काढले. आपली जमीन विकली, पत्नीचे मंगळसूत्रही गहाण ठेवले. 

संगोपन सोडणार नाही

कठीण परिस्थितीतही एकही गाय कत्तलखान्यात जाऊ नये, अशी कोकरे महाराज यांची इच्छा आहे. त्यासाठी अखेरपर्यंत आपण गायींचे संगोपन करतच राहू, असे ते सांगतात. शेतकऱ्याला गायीचे संगोपन करता येत नसेल त्यांनी  गोशाळेत आणून सोडावी. जेव्हा गाय हवी असेल तेव्हा शेतकरी ती परत घेऊ जाऊ शकतात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: How to maintain cows? Gowhali bunked due to cow slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.