देवरुखमध्ये भाजप, गुहागरला आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:07 AM2018-04-13T00:07:33+5:302018-04-13T00:07:33+5:30

In Devrukh, BJP, Guhagar's alliance | देवरुखमध्ये भाजप, गुहागरला आघाडी

देवरुखमध्ये भाजप, गुहागरला आघाडी

Next


रत्नागिरी : देवरुख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरीत्या भाजपने बाजी मारली असून, नगराध्यक्षपदासह सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत. गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १७ पैकी केवळ एकच जागा जिंकता आली असल्याने हा माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव यांना जोरदार धक्का मानला जात आहे. रत्नागिरीत एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपली जागा राखली आहे.
प्रत्येकी १७ जागांसाठी देवरुख आणि गुहागर नगर पंचायतीसाठी बुधवारी मतदान झाले. गुरुवारी मतमोजणी झाली. देवरुखमध्ये नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या मृणाल शेट्ये विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या धनश्री बोरूकर, राष्ट्रवादीच्या स्मिता लाड, स्वाभिमानच्या मिताली तळेकर यांचा पराभव केला. नगरसेवकांच्या १७ पैकी आठ जागा भाजप, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आणि मनसे आघाडीने जिंकल्या आहेत. त्यातील सात जागा भाजपने, तर एक जागा मनसेने जिंकली आहे. शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. एक अपक्ष उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आला आहे. गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यासह सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, शहर विकास आघाडी आणि शिवसेनेने हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. गतवेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा जिंकता आली. शिवसेनेचाही एकच उमेदवार निवडून आला असला तरी शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीचे ९ उमेदवार निवडून आले आहेत. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे राजेश बेंडल हे शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या दीपक कनगुटकर यांना पराभूत केले. येथे भाजपला विजयाची मोठी आशा होती. मात्र, भाजपला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.
रत्नागिरीत शिवसेनेचे नगरसेवक राजेश सावंत यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्या रिक्त जागी पुन्हा शिवसेनाच विजयी झाली आहे. शिवसेनेच्या राजन शेट्ये यांनी भाजपचे वसंत पाटील आणि राष्ट्रवादीचे सनिफ गवाणकर यांचा पराभव केला.

Web Title: In Devrukh, BJP, Guhagar's alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.