ठळक मुद्देजिल्ह्यात सुमारे ४० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक ३५ किलो धान्याला कात्री लागणार असल्याने नाराजी

रत्नागिरी , दि. २८ :  दोन माणसे असतील तर दहा किलो धान्य आणि तीन किंवा जास्त माणसे असतील तर ३५ किलो धान्य असा अजब निकष सध्या सरकारने लावला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अंत्योदय योजनेबाबत संभ्रमाचे चित्र निर्माण झाले आहे.

नव्या अध्यादेशामुळे अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या पण घरात दोनच माणसे असलेल्या लोकांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. प्राधान्य गटातील लोकांना मात्र सरकारने दिलासा दिला असून, त्यातील ज्या लोकांच्या शिधापत्रिकेवर पाच किंवा अधिक माणसे असतील त्यांना कमी दरात धान्य मिळणार आहे.


जिल्ह्यात सुमारे ४० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. सध्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड ३५ किलो धान्य मिळत आहे. यात २० किलो तांदूळ, तर १५ किलो गहू याचा समावेश आहे.

तसेच हे धान्य कमी दरात दिले जात आहे, तर अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या प्राधान्य गटातील व्यक्तिंना प्रतिमाणशी पाच किलो धान्य मिळत आहे. दारिद्र्यरेषेखालील व्यक्तिंसाठी धान्याचा दर कमी असून, प्राधान्य गटासाठी अधिक आहे.


मात्र, आता शासनाने पुन्हा सुधारित अध्यादेश नुकताच काढला आहे. त्यानुसार अंत्योदयसाठी असलेल्या शिधापत्रिकेवर तीन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असल्या तरच त्यांना ३५ किलो धान्य द्यावे. मात्र, एक किंवा दोन व्यक्ती असल्यास त्यांना प्राधान्य गटाप्रमाणे प्रतिमाणशी पाच किलो धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आदिवासी कुटुंबांच्या नियतनात कुठलाही बदल करण्यात येणार नाही


अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांच्या या निर्णयामुळे ज्या शिधापत्रिकेवर तीन व्यक्ती असल्या तरी त्यांना ३५ किलो धान्य मिळणार आहे. पण, दोनच व्यक्ती असतील, तर त्यांना केवळ दहा किलो धान्य मिळणार आहे. त्यामुळे हे धान्य कसे काय पुरणार, असा सवाल केला जात आहे.


या निर्णयाने प्राधान्य गटातील पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असलेल्या कुटुंबांचा समावेश अंत्योदयमध्ये करण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाने या अध्यादेशाद्वारे जाहीर केला असल्याने या निर्णयाचा फायदा अशा प्राधान्य कुटुंबांना मिळणार आहे. या कुटुंबांना सरसकट ३५ किलो धान्य अंत्योदयप्रमाणे कमी दरात मिळणार आहे.


याबाबतचा अध्यादेश सरकारने काढला असून, याप्रमाणे शिधापत्रिका देण्यात याव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, नव्या शासननिर्णयानुसार अंत्योदय गटातील कुटुंबातील एक किंवा दोनच व्यक्ती असलेल्या कुटुंबाची शिधापत्रिका तसेच प्राधान्य गटातील पाच किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या शिधापत्रिका या दुकानदारांना संकलित करून मग त्यानंतर त्यांना नवीन शिधापत्रिका द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे निर्णय झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी बराच काळ जाण्याची शक्यता आहे.


अंत्योदय शिधापत्रिकाधारकांबाबत शासनाने नवीन अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. त्यात या शिधापत्रिकेवर एक किंवा दोन व्यक्ती असतील तर त्यांना प्राधान्य गटाप्रमाणे प्रतिमाणशी पाच किलो धान्य मिळणार आहे. मात्र, तीन व्यक्ती असल्या तर त्यांना मात्र ३५ किलो धान्य मिळणार आहे. या निर्णयामुळे एक किंवा दोन व्यक्ती असलेल्या कुटुंबांच्या आधीच्या ३५ किलो धान्याला कात्री लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.