स्वच्छता अभियान ठरले केवळ देखावा

By admin | Published: June 4, 2015 11:23 PM2015-06-04T23:23:20+5:302015-06-05T00:18:14+5:30

वाजले की बारा : काही महिन्यातच उडाला मोहीमेचा फज्जा...

Cleanliness campaign only became visible | स्वच्छता अभियान ठरले केवळ देखावा

स्वच्छता अभियान ठरले केवळ देखावा

Next

देवरूख : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा संगमेश्वर तालुक्यात पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे हे स्वच्छता अभियान म्हणजे केवळ देखावा ठरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून ऐकू येऊ लागली आहे.
देशात संपूर्ण बहुमत प्राप्त करून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यावर काही काळातच स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता. स्वत: हातात झाडू घेऊन मोदी रस्त्यावर उतरल्याने याची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. झालेही तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांच्याबरोबरीने नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये, सर्व पोलीस ठाणे आदी शासकीय खात्यांनी या मोहिमेत उडी घेतली. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर या स्वच्छता अभियानाचे नियोजन करून त्या - त्या विभागाकडे याची जबाबादारी देण्यात आली होती. यातून सुमारे दोन महिने तरी गावोगावी स्वच्छतेचा नारा ऐकू येत होता. शालेय विद्यार्थ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेत लोकसहभागातून हे मिशन स्वच्छता अभियान यशस्वी होण्याची चिन्हे होती. दोन - तीन महिने चालू असलेला स्वच्छतेचा डंका अचानक बंद झाला, शासकीय खातेप्रमुखांसह लोकप्रतिनिधींनीही यातून अंग काढून घेतले आणि मग हेच का ते स्वच्छ कार्यालय अशी विचारणा करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
या अभियानातून तहसील कार्यालय, पंचायत समिती आवार, गावागावातील ग्रामपंचायतींचा परिसर, आरोग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, बाजारपेठा अशा ठिकाणी राबवलेली स्वच्छता मोहीम आजघडीला केवळ कागदोपत्री राहिल्याचे दिसत आहे. तीन - चार महिन्यांनंतर हे अभियान कधी राबवले होते, असे विचारण्याची वेळ आता सर्वांवर आली आहे. या अस्वच्छतेला जबाबदार कोणाला धरणार व धरल्यास कारवाई काय, असा सवाल विचारला जात आहे. देवरूखमध्ये अनेक ठिकाणी या अभियानाचे आता बारा वाजले असल्याचे पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)


देवरूख शहरात स्वच्छता अभियान मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. मात्र, काही कालावधीनंतर या परिसरातच कमालीची अस्वच्छता निर्माण झाल्याने याच परिसरात ही मोहीम राबविण्यात आली होती काय, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. केवळ कागदोपत्री ही मोहीम राबवू नये, असा प्रयत्न होणे आवश्यक आहे.

Web Title: Cleanliness campaign only became visible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.