मुलाचं भाषण, भास्कर जाधवांना अश्रू अनावर; शिवसेनेचा मेळावा बनला भावनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 12:57 PM2024-03-10T12:57:03+5:302024-03-10T12:57:38+5:30

भास्कर जाधव यांचे चिरंजीव यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच आजच्या मेळाव्याचं कारण सांगितलं.

Child's speech, Bhaskar Jadhav moved to tears; The gathering of activists is emotional of Shivsena | मुलाचं भाषण, भास्कर जाधवांना अश्रू अनावर; शिवसेनेचा मेळावा बनला भावनिक

मुलाचं भाषण, भास्कर जाधवांना अश्रू अनावर; शिवसेनेचा मेळावा बनला भावनिक

मुंबई/रत्नागिरी - राज्यात निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापलं असून कोकणातील राजकारणातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकीकडे भाजपाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर दावा केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. दुसरीकेड शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं होतं. मला तुम्हाला बोलायंचं आहे, १० मार्च रोजी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, असे म्हणत जाधव यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहलं होतं. त्यानुसार, आज सुरु असलेल्या भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील मेळाव्यात त्यांना व्यासपीठावरच अश्रू अनावर झाले. 

भास्कर जाधव यांचे चिरंजीव यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच आजच्या मेळाव्याचं कारण सांगितलं. यावेळी, एका कार्यकर्त्याच्या मेसेजचा संदर्भ देत भास्कर जाधवांना जीवे माऱण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचं विक्रांत जाधव यांनी म्हटलं. एक वेळचा आमदार वाट्टेल ते बोलत आहे. त्यामुळे, आज लढण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येण्याचा निर्धार करायचा आहे. भास्कर जाधव हे एवढे हलके नाहीत की, कोणाच्या धक्क्याने ते पडतील. पण, त्यांनी भल्या भल्यांना धक्के देऊन पाडलं आहे. मी भास्कर जाधवांचा मुलगा आहे, जेव्हा तुमच्यावर एखादी वेळ येईल, तेव्हा छातीचा कोट करुन मी सर्वात अगोदर तुमच्यापुढे असेल, असा विश्वास माझ्या तरुण मित्रांना मी देतो, असे विक्रांत जाधव यांनी म्हटले. स्थानिक राजकारणात घडलेल्या घडामोडी, राडा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विक्रांत यांनी भाष्य केलं. त्यावेळी, भास्कर जाधवांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं. वडिलांसाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना विक्रांत जाधव यांनी केलं. 

भास्कर जाधवांचे भावनिक पत्र

भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना आजच्या मेळाव्यासाठी भावनिक पत्र लिहिलं होतं. ''वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धवसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे.हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत. आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे. अशातच 40 वर्षांपासूनचे माझे जुने-जाणते वयोवृध्द तसेच नवीन व ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे पाहिल्यावर माझा उर भरून येतो व आजही आपण अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे, ही उर्जा मिळते. मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळूण येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया..
मी आपली वाट पाहतोय..!! भास्कर जाधव.

योगेश कदमांचा आरोप

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी मोठा दावा केला आहे. आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. ही गोष्ट एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि मला माहिती आहे. तेव्हा एकनाथ शिंदेंनी आम्हाला दोघांना बाजूला घेऊन विचारले होते की काय करायचे?, भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत. तेव्हा भास्कर जाधव यांच्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही मांडली होती, असं योगेश कदम यांनी सांगितले. स्वतःचे कसे खरे आहे हे रेटून न्यायचे आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करायचे या व्यतिरिक्त भास्कर जाधव यांना काही येत नाही, अशी टीका योगेश कदम यांनी केली. मविआ मध्ये असताना दापोली मतदारसंघ हा विकास कामांच्या बाबतीत मागे जात होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व विकासकामांना गती मिळाली. महात्त्वाच्या विकास कामांचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन होत आहे, असं योगेश कमद यावेळी म्हणाले.

Web Title: Child's speech, Bhaskar Jadhav moved to tears; The gathering of activists is emotional of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.