श्रीवर्धनमध्ये वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:08 AM2018-06-18T03:08:17+5:302018-06-18T03:08:17+5:30

श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जीवना बंदर परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले.

Windy rain in Shrivardhan | श्रीवर्धनमध्ये वादळी पावसाचा तडाखा

श्रीवर्धनमध्ये वादळी पावसाचा तडाखा

Next

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जीवना बंदर परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. घरांचे कौले व पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. श्रीवर्धनमध्ये शनिवारी सायंकाळपासूनच पावसाने थैमान घातले आहे. रात्रभर तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. तालुक्यातील जीवना बंदर भागात अनेक घरांना वादळाचा तडाखा बसला. घरांचे पत्रे, कौले उडाल्याने नागरिकांना भरपावसात निवाºयासाठी अन्यत्र आसरा घ्यावा लागला. परिसरातील घरे, शासकीय गोदामांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात आहे.
संजय दत्ताराम पिटनाईक, अनंता चाफेकर, दीपेंद्र शिवलकर, अमनउल्हा घनसार या नागरिकांना वादळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यांची घरे व दुकानांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचले आहे. वादळी पावसाने केलेल्या नुकसानीची दखल तहसीलदार कार्यालयाकडून घेण्यात आली. स्थानिक पातळीवर लोकांनी तत्काळ मदत केली. वादळात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी संजय पिटनाईक दुकानात काम करत असताना, पत्रे अचानक तुटल्याने हाताला व पायाला दुखापत झाली. मोबाइल दुकानदार दीपेंद्र शिवलकर यांच्या दुकानातील अनेक मोबाइल पावसाचे पाणी दुकानात शिरल्यामुळे खराब झाले. तसेच दुकानाच्या शेजारी असलेल्या दुचाकींचे नुकसान झाले.
>संततधार सुरूच
पनवेल : रविवारी पहाटेपासून पावसाने दमदार सुरु वात केली. मृगाची पहिली सलामी दिल्यानंतर काहीशा रुसलेल्या पावसाने पनवेल शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार धरली. रविवारी पहाटेच्या सुमारास पनवेलमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत ही संततधार सुरू होती. तालुक्यात पावसाने चांगला जोर धरला असून काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. तालुक्यातील धरणे भरण्यासाठी या पावसाचा फारसा उपयोग नसला तरी शेतीसाठी हा पाऊस चांगला मानला जात आहे. सकाळपासून पावसाला बºयापैकी सुरुवात झाली. अधूनमधून जोरदार सरींसह संततधार सुरू होती. आठवड्यापूर्वी पावसाने तालुक्यात सुरु वात केली होती. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला होता. पावसाने दडी मारल्याने शेतकरी नाराज झाला होता त्याचे लक्ष आभाळाकडे लागून राहिले होते. धान्य पेरलेले असल्याने ते वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र रविवारी पावसाने सुरु वात केल्याने शेतकरीवर्ग सुखावला.
>लावणीची कामे पूर्ण : वर्षासहलीसाठी गर्दी
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये फक्त ३३४.९० मि.मी. पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने अनेकांनी सहलीचे बेत आखले होते. त्यामुळे अलिबाग, मुरु ड येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले होते. पावसाने तीन-चार दिवस विश्रांती घेतल्याने तापमान वाढले होते. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. कधी पाऊस तर, कधी ऊन असा खेळ दिवसभर सुरू होता. रविवारी मात्र सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना हायसे वाटले.गेल्या २४ तासांमध्ये अलिबाग-२० मिमी, पेण-२७ मिमी, मुरु ड-१५ मिमी, पनवेल-३९.८० मिमी, उरण-४२ मिमी, कर्जत - ७ मिमी, खालापूर-६ मिमी, माणगाव- २४ मिमी, रोहे- २० मिमी, सुधागड-१२.५० मिमी, तळा- २७ मिमी, महाड, २.२०मिमी, पोलादपूर-१८ मिमी, म्हसळा- २७.४० मिमी, श्रीवर्धन- २७ मिमी, माथेरान -२० मिमी एकूण ३३४.९० मिमी पाऊस पडला.यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.पावसाळी सहलींमुळे अलिबाग, वरसोली, किहीम, नागाव, मुरु ड, काशिद येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले होते. प्रशासनाने समुद्राच्या पाण्यात जाण्यावर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे तेथील जीवरक्षक, बचाव पथक पर्यटकांना खोल पाण्यात जाण्यापासून सूचित करत होते.

Web Title: Windy rain in Shrivardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.