जिल्ह्यात ५५० गावांत पाणी योजना यशस्वी; लोकवर्गणी आणि श्रमदानामुळे अचूक नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 04:05 AM2018-06-05T04:05:49+5:302018-06-05T04:05:49+5:30

रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन, तळा या सहा तालुक्यांतील १८५ ग्रामपंचायतींमधील ५५० गावांमध्ये पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्या आहेत.

Water scheme successful in 550 villages; Accurate planning due to public education and labor | जिल्ह्यात ५५० गावांत पाणी योजना यशस्वी; लोकवर्गणी आणि श्रमदानामुळे अचूक नियोजन

जिल्ह्यात ५५० गावांत पाणी योजना यशस्वी; लोकवर्गणी आणि श्रमदानामुळे अचूक नियोजन

Next

- जयंत धुळप

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन, तळा या सहा तालुक्यांतील १८५ ग्रामपंचायतींमधील ५५० गावांमध्ये पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्या आहेत. या उपक्रमातून २९ हजार ९५३ घरांना व १ लाख ५० हजारपेक्षा अधिक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठीची वर्षानुवर्षांची पायपीट आता थांबल्यामुळे या सर्व गावांतील महिलावर्ग सुखावला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध समस्या सोडविण्याच्या हेतूने ‘स्वदेस फाउंडेशन’ या अशासकीय स्वयंसेवी संस्थेमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक घरामध्ये वर्षभर स्वच्छ व पुरेसे पिण्यायोग्य पाणी नळाद्वारे पुरविणे,गाव पातळीवरील पाण्याचे नियोजन व बळकटीकरण करण्यासाठी पाणी समितीची स्थापना करणे व सक्षमीकरण करणे आणि शासकीय व उपलब्ध साधनसामग्री आणि स्रोताचा योग्यरीत्या वापर करणे अशी तीन उद्दिष्टे प्रकल्पाची आहेत.
पाणी प्रकल्पासाठी ग्रामस्थांचा विनंती अर्ज प्राप्त होताच, स्वदेस टीम संपूर्ण गावाची सभा घेवून पाणी प्रकल्पाच्या रचनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाते. प्रत्येक घराला किमान २०० लिटर स्वच्छ पाणी दर दिवशी नळाद्वारे पुरविणे हा मुख्य उद्देश ठेवून प्रकल्पाची रचना करण्यात येते. तज्ज्ञ अभियंत्यांकडून गावातील अस्तित्वात असणाऱ्या व परिसरातील पाणी स्रोताचे सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने सर्वेक्षण करण्यात येते. त्यानंतर पाणी प्रकल्प आराखडा तयार करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी विहीर, बोअरवेल, झºयाचे बांधकाम, साठवण टाकी, प्रत्येक घरामध्ये नळ कनेक्शन, गरजेनुसार पाणी उपसण्यासाठी सौर पंप अशा प्रकारची कामे सुचविण्यात येतात. आराखड्यामध्ये सुचविलेल्या उपायाची माहिती ग्रामस्थांना देण्यात येते. ग्रामस्थांच्या संमतीने कोणत्या प्रकारची कामे करायची हे ठरवून आणि जागा मालकाची ना हरकत घेऊन काम केले जाते. नवीन पाणी योजनेसाठी प्रत्येक कुटुंबाकडून ४ हजार रुपये तर आदिवासी व धनगर कुटुंबाकडून ५०० रु पये लोकवर्गणी घेण्यात येते. फक्त नळ कनेक्शन करायचे असल्यास २ हजार रुपये वर्गणी घेण्यात येते. प्रकल्प अंमलबजावणीसाठी महिलांच्या सहभागासह पाणी समिती स्थापना करण्यात येते. प्रकल्प पूर्व आणि प्रकल्प पश्चात प्रशिक्षण देण्यात येते. सर्व ना हरकत दाखले व लोकवर्गणी स्वदेसकडे आल्यानंतर ठेकेदार नियुक्तीनंतर काम सुरु होते. समिती सदस्य देखरेख करतात. मुख्य पाइपलाइनपासून घरापर्यंतच्या पाइपलाइनसाठी ग्रामस्थ श्रमदान करतात. ग्रामस्थ श्रमदान करून साहित्याची वाहतूक करतात. पाणी प्रकल्प झाल्यावर तीन महिने देखभाल दुरुस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पाणी समिती आणि ग्रामस्थांची असते. पाणी साठवण टाकीजवळच पाणी शुद्धीकरण सयंत्र बसविण्यात येते. स्वदेसने राबवण्यात आलेल्या योजनामध्ये ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असतो व यामुळेच पाणी प्रकल्प यशस्वी होत आहेत. काही प्रकल्पामध्ये पाणी स्रोताची कमतरता असल्यामुळे इतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुनर्सर्वेक्षण करून पाणी समस्या सोडवण्यात येत आहे.

१९ गावांत सौरऊर्जेवर चालणारे पंप
विजेच्या जोडणीच्या समस्येवर मात करण्यासाठी १९ गावांत स्वदेसने अतिरिक्त खर्च करून सौरऊर्जेवर चालणारे पंप बसवून पाणीपुरवठा योजना राबवली आहे. स्वदेसचे विश्वस्त रॉनी स्क्रूवाला व झारिना स्कू्रवाला यांनी प्रकल्प यशस्वी झालेल्या गावांत जावून ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. स्वदेसने राबवण्यात आलेल्या योजनामध्ये ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असतो व यामुळेच पाणी योजना यशस्वी होत आहेत. दक्षिण रायगडमध्ये पाणीटंचाई असणाºया गावांनी स्वदेसजवळ संपर्क साधून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन स्वदेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी केले आहे.

Web Title: Water scheme successful in 550 villages; Accurate planning due to public education and labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी