वृक्षांच्या जागी उभे राहिले विजेचे खांब, वृक्षलागवड होणार कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 12:07 AM2019-05-02T00:07:32+5:302019-05-02T06:13:25+5:30

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडली झाडे

Standing in the place of power, the pillars of water, and where will the tree be grown? | वृक्षांच्या जागी उभे राहिले विजेचे खांब, वृक्षलागवड होणार कुठे?

वृक्षांच्या जागी उभे राहिले विजेचे खांब, वृक्षलागवड होणार कुठे?

सिकंदर अनवारे 

दासगाव : मुंबई-गोवामहामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू झाल्यानंतर रस्त्यालगत असलेले महाकाय वृक्ष तोडण्यात आले. मात्र, तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या जागी नवे वृक्ष लावण्याच्या जागी संबंधित ठेकेदार कंपनीने विजेचे खांब उभे केल्याने आता वृक्षलागवड होणार कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महावितरण कंपनीनेही या विजेच्या खांबाखाली वृक्षलागवड होऊ दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

मुंबई-गोवामहामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली. यातून कोकणातून जाणारा हा मार्ग चौपदरीकरण करण्यास मंजुरी मिळाली आणि कोकणातील या महामार्गावरील वृक्षांची सावली कायमची नष्ट झाली. महाकाय वृक्ष या चौपदरीकरणात बाधित झाले. हजारो वृक्ष या कामात तोडण्यात आले.

शासनाच्या नियमानुसार वृक्षतोड केल्यानंतर नवीन वृक्ष लावण्यास प्रत्येक जण बांधील राहतो. याप्रमाणे महामार्गावर ज्या ठेकेदार कंपनी काम करत आहेत, त्या कंपनी वृक्षलागवड करण्यास बांधील आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सहापदरी मंजूर झाले. मात्र, निधीअभावी हे काम चौपदरीकरणावर आले, यामुळे शेतकऱ्यांकडून सहापदरीसाठी भू-संपादन केले आहे. या सहापदरीमधून रस्त्यालगत असलेले वृक्ष तोडण्यात आले, याकरिता वनविभागाकडून परवानगी दिली असली तरी अद्याप या वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आलेले नाही.

पनवेलपासून थेट तळकोकणात हा मार्ग जात असून कोकणातील वन्य संपत्ती यामध्ये बाधित झाली आहे. पनवेल ते तळकोकणात जाणाऱ्या या मार्गावर रस्त्यालगत गेल्या अनेक वर्षांचे जुने वृक्ष होते. हे वृक्ष यामुळे बाधित झाले. नव्याने वृक्षलागवड झाल्यास हे वृक्ष डेरेदार होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जाणार आहे. मे महिना सुरू झाला असून काही दिवसांतच मान्सूनचे आगमन होईल. मान्सूनच्या सुरुवातीलाच वृक्षलागवड करणे अपेक्षित आहे. मात्र, महामार्ग ठेकेदाराने वृक्षलागवड करण्याच्या जागी विजेचे खांब उभे केले आहेत. महामार्गालगत असलेल्या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी हे खांब उभारण्यात आले आहेत. मात्र, ज्या जागेवर वृक्षलागवड होणे अपेक्षित आहे, त्या ठिकाणी विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत, त्यामुळे आता वृक्षलागवड कुठे करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे नियोजन दिसून येत नाही.

कोकणातील वनसंपदा अडचणीत येण्याची शक्यता
एकीकडे वनविभाग वृक्षतोड करण्यास सर्वसामान्य नागरिकास आडकाठी आणतोच, शिवाय वृक्षलागवड करण्यास महिन्याचा कालावधीदेखील होतो. मात्र, या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवल्याने दिसून येत आहे.

भविष्यात या ठिकाणी वृक्षलागवड केल्यास या विजेच्या तारांना अडथळा येणार आहे. यामुळे या विजेच्या खांबाजवळ वृक्षलागवड करू दिली जाणार नाही, अशी माहिती महावितरण कार्यालयाने दिली आहे. चौपदरीकरणाच्या लगत वृक्षलागवड केल्यास पुन्हा सहापदरीच्या कामा वेळी वृक्षतोड केली जाण्याची शक्यता आहे, यामुळे कोकणातील वृक्षसंपदा यापुढेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महामार्ग चौपदरीकरण होत असले तरी सहापदरीसाठी भूसंपादन केले आहे, यामुळे उर्वरित ३० मीटरमध्ये वृक्षलागवड केले जाईल. - प्रकाश गायकवाड, महामार्ग अधिकारी

वृक्षलागवड करण्याबाबत ठेकेदाराकडून लिखित स्वरूपात करारपत्र लिहून घेतले जाते. शिवाय, या प्रकल्पाशी वृक्षलागवडीबाबत वनविभागाचा थेट संबंध येत नाही. - प्रशांत शिंदे, वनक्षेत्रपाल, महाड

महामार्गालगत ज्या ठिकाणी वृक्षलागवड करणे अपेक्षित आहे, त्या ठिकाणी वीज पोल उभे केले आहेत, यामुळे भविष्यात या ठिकाणी वृक्षांचा अडथळा होणार आहे. विजेची समस्या यामुळे निर्माण होणार असल्याने या ठिकाणी आता वृक्षलागवड करू दिली जाणार नाही. - राजेश खोराटे, कनिष्ठ अभियंता, महावितरण

Web Title: Standing in the place of power, the pillars of water, and where will the tree be grown?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.