किल्ले रायगडाची गडदेवता श्री शिर्काई देवी; शिवपूर्वकालीन दगडी मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:10 AM2018-10-11T00:10:36+5:302018-10-11T00:10:48+5:30

हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिर्काई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली.

Shri Shirikai Devi, Goddess of the fort Raigad; Shastri | किल्ले रायगडाची गडदेवता श्री शिर्काई देवी; शिवपूर्वकालीन दगडी मूर्ती

किल्ले रायगडाची गडदेवता श्री शिर्काई देवी; शिवपूर्वकालीन दगडी मूर्ती

googlenewsNext

- जयंत धुळप

अलिबाग : हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिर्काई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. रायगडावरील कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी श्री शिर्काई देवीची विधिवत पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा आजही अबाधित आहे. गडदेवता म्हणून पेशवेकालीन दप्तरांमध्ये देखील शिर्काई देवीची नोंद आहे. शिर्काई म्हणजे महिषासुरमर्दिनीची अत्यंत रेखीव दगडी मूर्ती मंदिरामध्ये आहे. दररोज देवीची विधिवत पूजा करण्यात येते.
किल्ले रायगडावरील गंगासागर तलावाकडून नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर शिर्काई देवीचे मंदिर आहे. देवीच्या मंदिरासमोरच होळीचा माळ असून डाव्या बाजूस असलेला चौथरा शिर्काई देवीचा घरटा म्हणून ओळखला जातो. घरट्याच्या मागे उंबराच्या झाडांच्या दाटींमध्ये शिर्काई देवीचे मंदिर आहे. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता मानली जाते. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिर्काई पडले असावे, असा संदर्भ इतिहासात आहे.
शिर्काई देवीची मूर्ती अष्टभूजा असलेली महिषासुरमर्दिनी भवानीची आहे. मूर्ती शिवपूर्वकालातील असावी, माधवराव पेशव्यांचे सरदार आपाजी हरी यांनी १७७३ मध्ये रायगड किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा प्रथम शिर्काई देवीचे दर्शन घेतल्याची, नव चंडिकायाग केल्याचा उल्लेख आहे. नवरात्रामध्ये घट उठल्यानंतर शिर्काई देवीच्या गोंधळ होई. १७८६ मध्ये हा गोंधळ विधी बंद करण्यात आला.

गुहेतील स्वयंभू भवानी देवी
किल्ले रायगडावर देवीचे दुसरे स्वयंभू स्थान असून ती भवानी देवी म्हणून ओळखली जाते. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेस असलेल्या डोंगराच्या टोकदार आकाराला भवानी टोक असे म्हटले जाते.जुन्या दस्तांमध्ये श्री देवी भवानी राजहुडा असा उल्लेख आढळून येतो. भवानी मंदिराकडे जाणारी पायवाट अत्यंत अवघड, तसेच धोकादायक आहे. दगडी गुहेत देवीची स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात येते. या ठिकाणी एक शिवलिंग देखील असून पेशवेकाळांमध्ये या मंदिराच्या पूजेची व्यवस्था करण्यात आली होती, अशी पेशवे दप्तरामध्ये नोंद आहे. नवरात्रौत्सवात गडावर येणारे भाविक आणि शिवप्रेमी शिर्काई आणि भवानी देवीचे दर्शन आवर्जून घेतात.

Web Title: Shri Shirikai Devi, Goddess of the fort Raigad; Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड