जिल्ह्यातील १५ पैकी सात तालुक्यांत दूषित जलस्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:17 AM2019-05-16T00:17:08+5:302019-05-16T00:17:35+5:30

रायगड जिल्ह्याच्या उन्हाळी पाणीटंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या ५४० गावे आणि १४९३ वाड्या अशा २१३३ ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई राहणार आहे.

In seven talukas of 15 districts, contaminated water sources | जिल्ह्यातील १५ पैकी सात तालुक्यांत दूषित जलस्रोत

जिल्ह्यातील १५ पैकी सात तालुक्यांत दूषित जलस्रोत

Next

- जयंत धुळप

अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या उन्हाळी पाणीटंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या ५४० गावे आणि १४९३ वाड्या अशा २१३३ ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई राहणार आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ६० गावे आणि २०३ वाड्या अशा एकूण २६३ ठिकाणी प्रत्यक्षात २७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाढत्या उन्हाबरोबरच या टंचाईग्रस्त ठिकाणांमध्ये दिवसागणिक वाढ होत असतानाच, जिल्ह्यातील ११ टक्के जलस्रोत नमुने दूषित निष्पन्न झाले. पिण्याच्या पाण्याबाबत दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात एकूण ८ हजार २९० जलस्रोत आहेत. या जलस्रोतांतून उपलब्ध होणारे पाणी पिण्याकरिता योग्य आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी या जलस्रोतांतील पाण्याचे नमुने घेवून त्यांची अणुजैविक पाणी चाचणी प्रयोगशाळेत करण्यात येते. त्यात निष्पन्न होणारे दूषित जलस्रोत पिण्याच्या पाण्याकरिता बंद करून त्यांच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक ती प्र्रक्रिया संबंधित ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येते. ही प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात येतात व ते पिण्यायोग्य झाले असल्यास ते पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते.
जिल्ह्यातील जलस्रोतांचे नमुने घेवून त्यांची प्रयोगशाळेत अणुजैविक चाचणी करण्याचे काम जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा या दोन यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येते. एप्रिल २०१९ मध्ये रायगड जिल्ह्यातील या ८ हजार २९० जलस्रोतांपैकी मुळातच केवळ १०.१२ टक्के म्हणजे ८३९ जलस्रोतांचे नमुने तपासणीकरिता घेण्यात आले होते. त्यापैकी २१८ नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने घेतले होते, त्यातील १८ टक्के म्हणजे ३९ जलस्रोत नमुने दूषित निष्पन्न झाले आहेत. नमुने घेतलेल्या ८३९ जलस्रोत पाणी नमुन्यांपैकी उर्वरित ६२१ नमुने भूजल सर्वेक्षण यंत्रणेने घेतले होते. त्यापैकी ९ टक्के म्हणजे ५५ टक्के जलस्रोत नमुने दूषित निष्पन्न झाले आहेत. दोन्ही यंत्रणांकडून घेण्यात आलेल्या एकूण ८३९ पाणी नमुन्यांपैकी तब्बल ११ टक्के म्हणजे ९४ पाणी नमुने दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलादपूर, तळा तालुक्यातील पाणी नमुने घेतलेच नाही
पोलादपूर या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यांत १६० जलस्रोत आहेत तर जलदुर्भिक्ष असलेल्या तळा तालुक्यात ३५१ जलस्रोत आहेत.
मात्र या दोन्ही तालुक्यातील जलस्रोतांचे पाणी नमुने एप्रिल महिन्यात तपासणीकरिता घेण्यातच आले नाहीत.
या तालुक्यातील जलस्त्रोत पिण्यायोग्य आहेत वा नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही.

सात तालुक्यांत १५ ते ५० टक्के जलस्रोत दूषित असल्याचे निष्पन्न
रायगड जिल्हा परिषदेच्या अणुजैविक पाणी नमुने तपासणी अहवालानुसार उरण, श्रीवर्धन, पनवेल, म्हसळा, सुधागड, पेण आणि महाड या सात तालुक्यातील जलस्रोत १५ ते ५० टक्के या प्रमाणात दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जलसुरक्षकांच्या माध्यमातून दूषित जलस्रोतांचे शुद्धीकरण
दूषित निष्पन्न जलस्रोतांचे शुद्धीकरण ग्रामपंचायतींमध्ये तैनात जलसुरक्षकाच्या माध्यमातून करण्यात येते. दूषित जलस्रोतांमध्ये सुयोग्य प्रमाणात टीसीएल पावडरची मात्रा देवून पाणी शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर पाणी शुद्ध व पिण्यायोग्य झाले आहे याची खातरजमा करण्यासाठी जलसुरक्षकांच्या माध्यमातून ओ.टी.टेस्ट केली जाते. ती सकारात्मक आल्यास ते पाणी पिण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येते. दरम्यान, पावसाळ््यापूर्वी व पावसाळ््यानंतर जलस्रोतांच्या शुद्धता खातरजमेकरिता जलस्रोतांचे रासायनिक व जैविक परीक्षण देखील करण्यात येते.
- नंदकुमार गायकर,
अधीक्षक, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड

Web Title: In seven talukas of 15 districts, contaminated water sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड