रायगडचा एसएससी निकाल ८९.३७ टक्के, मुलीनींच मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 05:20 AM2018-06-09T05:20:28+5:302018-06-09T05:20:28+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाइन जाहीर झाला. यात रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के लागला असून, बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

 Raigad's SSC results were 9.87 percent, girls' beat | रायगडचा एसएससी निकाल ८९.३७ टक्के, मुलीनींच मारली बाजी

रायगडचा एसएससी निकाल ८९.३७ टक्के, मुलीनींच मारली बाजी

Next

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाइन जाहीर झाला. यात रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के लागला असून, बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९१.४९ टक्के तर मुलांचा निकाल ८७.४७ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील ५३४ शाळांपैकी ११२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
संपूर्ण जिल्ह्यातून एकूण ३६ हजार ५४९ नोंदणीकृत परीक्षार्थी होते. त्यापैकी ३६ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७ हजार १२२ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत, ११ हजार २९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १० हजार ९१७ द्वितीय श्रेणीत तर ३ हजार २३० उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ३२ हजार ५६१ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
जिल्ह्यात ३ हजार ११६ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी नोंदणीकृत होते, त्यापैकी ३ हजार ८१ प्रत्यक्ष परीक्षेस बसले. त्यापैकी ४७.१९ टक्के म्हणजे १ हजार ४५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १० विशेष गुणवत्ता श्रेणीत, १७६ प्रथम श्रेणीत, ५१२ द्वितीय श्रेणीत, ७५६ तृतीय श्रेणीत असे एकूण १ हजार ४५४ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या प्रयत्नात यशस्वी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी जिद्दीने परत प्रयत्न करून यश मिळवावे, असे आवाहन शाळांतील शिक्षकांनी केले आहे.

होली एंजल्स, परमारचा निकाल १०० टक्के
नागोठणे : अग्रवाल विद्यामंदिरची विद्यार्थिनी संयुजा टिळक खाडे ही ९७.८० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. शाळेत १६९ पैकी १४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ८८.१६ इतकी आहे. बीईएसच्या परमार इंग्लिश मिडीयम स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. सारा लेंडी ८२.४० टक्के (प्रथम), दीक्षिता जैन ८१.६० टक्के (द्वितीय) आणि जैनम जैन ८१ टक्के (तृतीय). उर्दू हायस्कूलचा निकाल ९१.८९ टक्के लागला.

अलिबागचा ८७.७६ टक्के
अलिबाग : अलिबाग तालुक्याचा निकाल ८७.७६ लागला. यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. ९०.६५ टक्के मुली तर, ८४.८८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. एक हजार ५५१ मुले आणि एक हजार ५५४ मुली परीक्षेला बसल्या होत्या. पैकी एक हजार ३१९ मुले एक हजार ४०६ मुली पास झाल्या आहेत.
सेंट मेरी स्कूलची रिया सुबोध माळी ९७.८० गुण मिळवून शाळेत पहिली आली आहे. अलिबाग येथील सेंट मेरी स्कूलची रिया सुबोध माळी हिला सर्वाधिक ९७.८० टक्के गुण प्राप्त झाले, तर अलिबागच्या जा.र.ह.कन्या शाळेची विद्यार्थिनी साक्षी जाधव हिला ८९ टक्के गुण मिळवले.

नवयुग @ १०० टक्के
महाड : नवयुग मराठी माध्यमिक विद्यालयाच्या सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला असून क्षितिजा शेलार ही सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनी ९४.२४ टक्के गुण मिळवून नवयुग मधून सर्वप्रथम आली आहे.तर आदित्य मोटे व संदेश पाटील हे विद्यार्थी ८८.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर यश धरणे ८७.४० टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. मराठी माध्यमातून विभागातून नेहा जाधव ही ८३ टक्के गुण मिळवून प्रथम आली.

केळकर विद्यालयाची दुसऱ्यांदा हॅट्ट्रिक
अलिबाग : शहरातील चिंतामणराव केळकर विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला. दहावीच्या परीक्षेत शाळेचा शंभर टक्के निकाल लागण्याचे हे सहावे वर्ष आहे. गौरी राजेंद्र चवरकर हिने ९८.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. इंग्रजी माध्यमात विधी विजय भगत शाळेत पहिली आली. तिने ९६.४० टक्के मिळवले.

महाड तालुक्यात शुभम जाधव प्रथम
महाड : शालान्त परीक्षेत वि.ह.परांजपे विद्यामंदिर शाळेचा शुभम बाळकृष्ण जाधव हा विद्यार्थी ९७.८० टक्के गुण मिळवून महाड तालुक्यात पहिला तर सेंट झेविअर्स स्कूलची तन्वी नितीन मिंडे ही ९७.६० गुण मिळवून दुसरी तर केईएस दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यम शाळेचा दीप सुशील गांधी हा ९७.२० टक्के गुण मिळवून तिसरा आला. सेंट झेविअर्स स्कूलचा निकाल ९८.८७ टक्के लागला. दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यम शाळेचा निकाल ९७.८४ टक्के , वि. ह. परांजपे विद्यालयाचा निकाल ९१.६२ टक्के लागला. नवयुग विद्यापीठाची क्षितिजा शेलार ९४.२० टक्के ही शाळेत पहिली आली.

म्हसळ्याचा निकाल ८९.६८ टक्के
म्हसळा : तालुक्यातील २० शाळांतील ९४० विद्यार्थ्यांपैकी ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ८९.६८ टक्के लागला आहे. तालुक्यातील कायम विनाअनुदानित जिजामाता माध्यमिक विद्यालय वरवठणे-आगरवाडाचा शुभम नाक्ती याने ९३.२० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. न्यू इंग्लिश स्कूल म्हसळाचा निकाल ९०.६ टक्के लागला असून हर्षला महेश म्हात्रे ९२.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली.

कुरुळ विद्यालयाचा ८५.७१ टक्के निकाल
अलिबाग : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी विविध राज्यातील बहुभाषिक विद्यार्थ्यांची शाळा असलेल्या कुरुळ येथील सुधागड एज्यु. सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ८५.७१ टक्के लागला असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी दिली आहे.
शाळेचे एकूण २८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात सात विद्यार्थी अमराठी आहेत. साक्षी संतोष पाटील ही ८४ टक्के मिळवून शाळेत प्रथम आली आहे. मूळ कर्नाटक राज्यातील समर्थ शिवप्पा कोंडगुळी याने ८३ टक्के गुण मिळवून तो दुसरा आला आहे. तर वैदेही अजित पाटील हिने ७९.६० टक्के गुण मिळवून ती तिसरी आली आहे. अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पेणमधील सात शाळांनी गाठली शंभरी
पेण : तालुक्यातील एकूण ४२ माध्यमिक हायस्कूलच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील एसएससी परीक्षेच्या २४०३ विद्यार्थ्यांपैकी २१८० विद्यार्थी शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाले असून निकाल ९०.७१ टक्के इतका लागला आहे. निकालात मुलींनीच बाजी मारती आपली बौद्धिक क्षमता याही निकालात दाखवून दिली आहे. निकालात पेणच्या ७ प्रशालांचा निकाल १०० टक्के लागला असून ९५ टक्के निकाल लागलेल्या पाच प्रशाला तर ९० टक्के निकाल लागलेल्या १२ प्रशालांचा समावेश आहे. एकूण उत्तीर्ण विद्यार्थी, फस्टग्रेडमध्ये ७१८ तर सेकंडक्लास ग्रेडमध्ये ७८१ तर पास ग्रेडचे १९८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकंदर निकाल समाधानकारक लागल्याचे चित्र पेणमध्ये आहे.

अभिनव ज्ञान मंदिरचा शुभम मोरे प्रथम
कर्जत : शहरातील अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेमध्ये शुभम राजेश मोरे याने ९७.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. रेश्मा रघुनाथ कडलक हिने ९७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. गतवर्षी या विद्यालयाचा निकाल ९२.५५ टक्के लागला होता, मात्र यंदा विद्यालयाचा निकाल ९६.१४ टक्के लागल्याने ३.५९ टक्क्याने वाढ झाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
कर्जत तालुक्यातील ज्ञान मकरंद विद्यालय - खांडपेचा निकाल (९५.९६)टक्के टाकला आहे. भाऊसाहेब राऊत विद्या मंदिर- कशेळे (८४.९६) टक्के तर कालभैरव माध्यमिक विद्यालय - बामणोली (८२.00) आणि ओंकार माध्यमिक विद्यालय- शेलूचा निकाल (७0.९0) लागला आहे.

सुधागड निकाल ८४%
पाली : सुधागड तालुक्यात अठरा विद्यालयातील ८२८ विद्यार्थ्यांपैकी ८२० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यात ६९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ८४.५१ टक्के लागला आहे. तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे टॉप वर्थ इंग्लिश स्कूल आणि मजरे जांभूळपाडा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.
चिवे येथील अनुदानित आश्रमशाळेचा निकाल ९६.६६ टक्के तर पडसरे येथील अनुदानित आश्रमशाळेचा निकाल ९७.६१ टक्के लागला आहे तर माणगाव (बु.) येथील प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.७४ टक्के, माध्यमिक विद्यालय पाच्छापूर शाळेचा निकाल ९३.३३ टक्के लागला आहे.

पीएनपी इंग्रजी माध्यमाचा १00 टक्के तर मराठीचा ८३.८० टक्के निकाल
अलिबाग : पीएनपी एज्युकेशन सोसायटी दहावीचा मराठी माध्यमाचा एकूण निकाल ८३.८० टक्के लागला असून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

नूतन विद्यालयाचा निकाल ७७.८४ टक्के
मुरु ड जंजिरा : श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाचा निकाल ७७.८४ टक्के एवढा लागला असून या शाळेतून सानिका संतोष चौलकर या विद्यार्थिनीने ८६ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक मिळवला. कृतिका भालचंद्र जोशी हिने ८५ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेतील इयत्ता दहावीचे १६७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

४५% गुण मिळवलेल्या प्रथमेशची मिरवणूक
महाड : शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऐंशी-नव्वद टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी आपल्या यशाचा आनंद साजरा करीत असतानाच महाडमध्ये ४५ टक्के गुण मिळवलेल्या एका सामान्य विद्यार्थ्यानेही नाउमेद न होता मिळालेल्या यशाचा आनंद उत्साहात साजरा केला. ४५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला आपण दहावी परीक्षेत पास झाल्याने आश्चर्याचा धक्काच बसला. या यशस्वी विद्यार्थ्याची त्याच्या मित्रांनी चक्क मोटारसायकलवरून मिरवणूक काढली.
प्रथमेश राजेश डोळस असे विद्यार्थ्याचे नाव असून तो महाडमधील कोएसोच्या वि. ह. परांजपे विद्यालयाचा विद्यार्थी आहे. प्रथमेश पास झाल्याची माहिती त्याच्या मित्रांना समजताच त्याच्या मित्रांनी प्रथमेशच्या गळ्यात शाल, हार घालून सत्कार केला. त्यानंतर जल्लोषात मोटारसायकलवरून चक्क बाजारपेठेतून मिरवणूक काढली. शालान्त परीक्षेत ९५ टक्के वा त्याहून अधिक गुण कोणाला मिळाले त्यापेक्षा ४५ टक्के गुण मिळवणाºया प्रथमेशच्या यशाच्या कौतुकाचीच चर्चा महाड शहरात रंगली आहे.

Web Title:  Raigad's SSC results were 9.87 percent, girls' beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.